शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

वर्ष होऊन गेलं असेल.

माधवराव गाडगीळांची मुलाखत घेऊन खाली उतरलो तर धोधो पाऊस पडत होता. हे पावसाचे दिवस नव्हेत, त्यामुळे छत्री घेण्याचा प्रश्न नव्हता. पाऊस सुरू झाला तो थांबेचना. कसा बसा एका आडोश्याला उभा होतो. बघता बघता रस्ता भरून गेला आणि पाणी फुटपाथला लागलं. दूरवर कुठे रिक्शा दिसत नव्हती. त्यात पाषाणहून स्टेशनला जायला थेट बस नाही, मध्ये पालिकेजवळ उतरून चेंज करायला हवी. घड्याळात पहिलं तर सात वाजले होते. म्हटलं शेवटची पावणे आठची गाडी चुकली. मग आरामात त्या बेमोसमी पावसाची गंमत अनुभवत उभा होतो. शेवटी कसाबसा स्टेशनला पोहोचलो तेव्हा आठ वाजून गेले होते, पाऊस थांबला होता. पुण्यात एक प्रॉब्लेम म्हणजे पावणे आठची अहमदाबाद गेली की नंतर मुंबईला जायला पुढची गाडी थेट मध्यरात्री सुटणारी कोणार्क. मग प्लॅटफॉर्मवरचा एक निवांत बेंच गाठला आणि सॅक मधून पुस्तक काढून वाचू लागलो. बराच वेळ झाला. थोड्या वेळाने लक्षात आलं माझ्या शेजारी कुणीतरी बसलं होतं. 


मध्येच काहीतरी गडबड ऐकायला आली. पाहिलं तर बाजूला दोन पोलिस नशेत बरळणार्‍या एका भिकार्‍याला तिथून हटवित होते. काठीने ढोसल्यावर तो अधिकच हात पाय ताणून लोळत होता. 
काय राव हे, ही साली जिंदगी एकदाच भेटते, तिचा असा कचरा कश्यापाई करतात हे लोक?’

मी चमकून शेजारी पहिले, एक सतरा अठरा वर्षांचा पोरगा बाजूला बसला होता. अंगात वर भडक रंगाचं शर्ट खाली जिन. कपडे टपोरी असले तरी नवीन दिसत होते. उजव्या हातात लाल भगव्या रंगाचे गंडे दोरे गुंडाळलेले.  
आपल्याला म्हाराजांनी सांगितलय काय बी झालं तरी ताठ मानेनं जगायचं. साव्भिमान पायजेलच.

कोण महाराज?’ त्याच्या हातातले गंडे दोरे पाहून मला वाटलं असेल कुणीतरी बाबा बुवा.
म्हाराज . . म्हाराज  . . छत्रपती. 
गळ्यातल्या चेनच्या पेंडल मधला शिवाजी महाराजांचा फोटो माझ्या समोर धरत तो बोलला.  

मी म्हटलं, यांनी कसं काय सांगितल तुला?’

म्हंजे काय? वाचलाय ना आपन आनि आयक्लय बी.

कुठे ऐकलस?’

सायेब, बारा वर्सांचा होतो तेव्हा घर सोडलं. भटकत भटकत पुन्यात आलो. कायबी काम करायचो. हाटेलात कामं केली. तिथं आपल्याला येक गुरु भेटला. लय पोचलेला. म्हाराज म्हटलं की काय बी ईचारा, एकदाम रट्टाच मारनार. त्यानं आपल्याला म्हाराजास्नी भेटवला, बास्स सगळी साली जिंदगीच बदलून गेली.

आता मी जरा लक्ष देऊन ऐकू लागलो.

एका प्येट्रोल पम्पावर काम करीत होतो. गाडी प्येट्रोल भरायला आली की फडका मारायची आपली येक खास स्टायल होती. अशीच एका सायबाची गाडी रोज यायची प्येट्रोल भरायला. फडका मार्‍ला की सायब खुश व्हायचा. येके दिवसी मला म्हन्ला गाडी रोज धून देनार का? मी फाटदिशी हो म्हटलं. आपल्याला म्हाराजांनी सांगितलेलं हाय, संधि आली का सोडायची नाय. गेल्याली संधि परत येत नाय.

मग?’

मग काय? रोज सकाळी घरी जावून सायबाची गाडी धुवायचो आनि मग पम्पावर यायचो.

मी पुस्तक मिटून सॅकमध्ये ठेऊन दिलं.

आस करता करता वर्स गेलं. येका राती म्हाराज सपनात आले. सकाळी गाडी धून पम्पावर आलो. डोसक्यात रातीच सपान होत. पम्पवाल्या मालकाला म्हटलं ही बाजूची थोडी जागा देतोस का? भाडा दीन. तो न्हाय व्हय करीत व्हता. पन म्हाराजांवर आपला ईस्वास. शेवटी व्हय म्हणाला. त्या सायबाकडून थोडं पैस घेतलं आनि पम्पाच्या बाजूला सरवीस सेंटार टाक्ल. सिवजयंतीला थाटात ऊदघाटन केलं. आपला गुरु लय खुश झाला. बोल्ला छत्रपतींनी सोळाव्या वर्सी  सोराज्याची स्थापना केली तू सोळाव्या वर्सी तुजा सरवीस सेंटार टाकलास. आपल्याला जाम आनंद झाला.

हातात चहाची किटली घेऊन प्लॅटफॉर्मवर फिरणार्‍या एका मुलाला त्याने हाक मारली.

ये, दोन चा दे रे.

ये बाबा, मला नको चहा. मी पित नाही.

चा नाय पित?’
नाही

येक कप प्या सायब, मी देतोय.

अरे खरच नाही पित.

तो जाऊन तोंडातला मावा ट्रॅकवर थुकून आला. तो पर्यन्त चहावाल्याने एक कप भरला होता.

त्याने खिशातून नोटांच एक छोटं पुडक काढलं त्यातून दहाची नोट त्याने चहावाल्याला दिली, तेव्हा मी पहिलं त्याच्या तीन बोटात सोन्याच्या आंगठ्या होत्या. गळ्यातली चेन मघाशी पाहिलीच होती.

त्याने चहाचा कप तोंडाला लावला आणि तोंड आंबट केलं.

थू तुझ्या आयला, हा काय चा हाय का?’

तो चहावाला पोरगा तोपर्यंत निघून गेला होता.

हे साले अशी मादरचोदगिरी करतात. म्हाराजांनी आपल्याला शिकावलय चोरी नाय करायची कुनाची. जे काय असल ते इमानान करायचं. म्हनून तर आज पुन्यात दोन सरवीस सेंटार हाईत आपली.   

चहाचा रिकामा प्लास्टिकचा कप बाजूच्या कचऱ्याच्या कुंडीकडे भिरकावून त्याने खिशातून एक ट्यूब काढली.

ह्ये बघा पायाची काय वाट लागलीय. त्याने जिन वर करून पाय दाखवले.

दोन्ही पावलांवर जखमांचे चट्टे पडलेले.

ह्ये आस गाडी धुवायच्या केमिकलनी होतय, पर बेयमानी न्हाय केली कदी. 
तो त्या ट्यूब मधलं मलम पायाला लावीत म्हणाला.  

राहतोस कुठे?’

हडप्सरला. भाड्याच घर आहे, दोन खोल्यांच. साला मालक दरवर्षी हजार रुपये भाडं वाढवतो, म्हटलं जाव दे, तुला काय वाढवायच ते वाढव, पन जागा सोडनार नाय. आता सा हजार देतो म्हैन्याला.

सहा हजार? इतक काय आहे त्या जागेत?  

म्हाराज हायत त्या जागेत.

कोण? छत्रपती?’

हा मग, म्हाराजांचा पुतळा हाय खोलीत. उभा. खर्‍या मान्सावानी.

काय म्हणतोस?’

हा मग? ते बघत र्‍हातात सगळं

आता तो थोडासा सेंटीमेंटल झाला.

दोन तीन क्षण असेच गेले, मग अचानक उसळून म्हणाला,

भांचोद मर्डरच करून टाकला असता आपन त्यावेळी.

मी म्हटलं अचानक याला काय झालं?

काय झालं? कुणाचा मर्डर?’

त्ये नाय का पुन्यात मध्ये एक प्रकरन झालं होत, एक मर्डर झाला होता.

माझ्या लक्षात आलं.

तीन दिवस भटकत होतो सायेब, कामधंदा सोडून.

पण तुझा काय संबंध, तू होतास की काय त्या ग्रुप मध्ये?’

नाय वो, पन च्यायला आपल्या म्हाराजांना बोलतो म्हणजे काय? खोपडी असली सटकली व्हती ना, त्यावेळी कोनी भेटला असता तर खपवूनच टाकला असता.

त्याचे डोळे आता पेटत होते. 
घरी जायची हिम्मत होत नव्हती सायेब. घरी गेलो की म्हाराज बघत र्‍हायचे. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायची ताकद नाय व्हायची. भांचोद म्हाराजांना बोलतात आनि आपन साला झ्याट काय करू शकत नाय? काय जिंदगी हाय ही? शेवटी एक चादर टाकली त्यांच्यावर. मग बरा वाटला.

अरे पण असं कुणालाही मारणं बरोबर आहे काय? महाराजांनी असं केलं का कधी त्यांच्या उभ्या आयुष्यात? त्यांना आवडलं असतं का तू असा कुणातरी निरपराध माणसाला मारला असतास तर?’

नाय ना, मग डोस्क शांत झालं.

दोन क्षण पुन्हा असेच गेले.

त्याच्याकडे एक प्लास्टिकची पिशवी होती. त्यातून त्याने एक एक वस्तु काढायला सुरवात केली. 
मिठाईचा एक पुडा होता. एक साडी होती. दोन छोटे खेळण्यांचे बॉक्स होते.

आता मुम्बैला बापाच्या घरी जातोय. माझा नी त्याचा पटत नाय. पर आय हाय ना. भाव आनी त्याची बायको हाय. भाव बरा हाय पन भावजय लय वंगाळ. आयचा नि तिचा जमत नाय. आयला म्हटलं माझ्याकडे येऊन र्‍हा, तर तिला ते पटत नाय. पन भावाची पोरगी लय गोड हाय. आपला लय जीव तिच्यावर. तिच्यासाठी हयो खाऊ आनि खेळनी घेतली नी आयसाठी साडी. पैश्याच काय वाटत नाय वो आता, पर च्यायला ही भावबंदकी नाय पायजेल. साला ह्या भावबंदकीनेच म्हाराजांच्या सोन्यासारख्या सोराज्याची वाट लावली.
गाडी प्लॅटफॉर्मला लागत होती. मघाच पासून सुन्न भासणार्‍या प्लॅटफॉर्मवर अचानक चलबिचल सुरू झाली. आम्ही उठलो. जनरल मध्ये बसायला तरी जागा मिळायला हवी.

झोप तर आता येईलस वाटत नव्हतं.     
  

                         *****

  

           

      

1 टिप्पणी:

  1. प्रदीप , माणुस पटला , आपल्या वरळी नाक्यावर होता ना साडेतीन जय महाराष्ट्र तो भांडी भाड्याने देणार , मीना रावते कम्पाउन्ड समोर चा , कायम बाळासाहेब

    उत्तर द्याहटवा