रविवार, ७ जुलै, २०१३

ज्युली


ज्युली


                 आज दुपारी जेवताना सहज टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करीत होतो, मध्येच नदीरा आणि ओमप्रकाश दिसले. पाहतो तर ज्युली. नॉस्टेलजियाचा एक सुखद झटका. इ.स. १९७५ चे ते साल. तेव्हाच्या तरुणाईची बॉबीची धुंदी पुरती उतरलीही नव्हती तोच ज्युलीची पोस्टर्स झळकलेली. त्याकाळची हाताने रंगवलेली पण अत्यंत जीवंत वाटणारी ती पोस्टर्स म्हणजे चित्रसृष्टीची जान. फक्त पोस्टर पाहून पिक्चर चालणार की पडणार हे भाकीत काही रसिक महाभाग तेव्हा वर्तवत असत.
              
             राजेश खन्ना नावाचं एक गारुड बर्‍यापैकी अंमल गाजवत होत आणि अमिताभ नावाचं वादळ दारात येऊन ठेपल होत असा तो भारावलेला काळ. त्या काळात कोणतेही नाव नसलेली, ग्लॅमर नसलेली जोडी घेऊन बॉबी, ज्युली सारखे चित्रपट बनवणे आणि ते यशस्वी करणे हे केवढं मोठ आव्हान. पण तगड्या लेखक आणि पटकथाकारांच्या जादुई कुंचल्याच्या बळावर ते लीलया पेलणारे दिग्गज दिग्दर्शक ही त्या काळच्या चित्रांची खासियत होती.

          विक्रम आणि लक्ष्मी सारखी अगदीच अनोळखी नावे असलेला हा चित्रपट उत्तम पटकथेसाठी जरूर पहायला हवा. खरे तर तो नादिराच्या जबरदस्त अभिनयासाठीही पहायला हवा. पण नादीराबरोबरच मला भावला तो यातला ओमप्रकाशाचा मॉरिस. नादिरा मार्गारेट आणि ओमप्रकाश मॉरिस ह्या भूमिकेसाठीच जन्माला आल्यासारखे ते भूमिका जगले. पण नादिरा केवळ अप्रतिम. रुबी मायरचे एका छोट्या भूमिकेतले दर्शन अत्यंत लोभसवाणे आणि जेमतेम काही वाक्ये असलेली तेव्हाची बाल कलाकार आणि आताच्या हवाहवाई श्रीदेवीला ज्युलीची बहीण म्हणून पाहणे हा ही एक अधिकचा आनंद. ज्युलीवर मनापासून प्रेम करणार्‍या जलाल आगासाठी मात्र शेवटपर्यन्त मन चुकचुकत राहत. उत्तुंग, दिग्गज कलाकारांना तितक्याच तोडीचे लेखक दिग्दर्शक लाभले तर काय होऊ शकते ते म्हणजे – ज्युली.

                  लक्ष्मीचे मोहक दिसणे आणि तितकाच सहज सुंदर अभिनय, तिचे सेक्स अपील आणि पडदा पेटवणारा मोकळा प्रणय. हे सगळं सगळं जरी कथेला आवश्यक होत तरी दिग्दर्शक सेतुमाधवनमुळे आलेल्या दाक्षिणात्य बोल्ड शैलीचाही तो प्रभाव असावा किंवा बॉबीच्या यशातून निर्माण झालेली अपरिहार्यता असावी.

                   पटकथा इंदर राज आनंद, संवाद बलदेव राज आणि मल्याळी दिग्दर्शक सेतुमाधवन यांचा ज्युली हा उत्तर दक्षिण शैलीचा मिलाफ होता. खरेतर जात किंवा धर्माचे प्रेमाच्या आड येणे, त्यातून निर्माण होणारा संघर्ष, (इथे एक नवा आयाम आहे अँग्लो इंडियन) आणि मग गोड शेवट इतक साध सोप कथानक, पण पटकथेच वैशिष्ट्य असे की कुठेही कथानकाचा वेग मनावरची पकड सोडत नाही. प्रत्येकच प्रसंगात पुढे येऊ घातलेल्या संकटाचा गडदपणा व्यापून राहतो आणि तो अधिक गहिरा होतो तो बाप लेकीच्या नातेसंबंधातून. ओमप्रकाश आणि लक्ष्मी – मॉरिस आणि ज्युलीचे एका तरुण, वयात आलेल्या मुलीचे आपल्या बापावरचे प्रेम इंदर राजने ज्या नैसर्गिक रंगाने रंगवले आहे ते पाहत असताना मॉरिसचे जाणे साहजिक होऊन बसते आणि म्हणूनच मनाला चटका लावते. मॉरिसच्या जाण्याची बातमी रुबीआंटी ज्युलीला सांगते तो प्रसंग कलाकार आणि दिग्दर्शक सगळ्यांचीच कसोटी. पण रुबी सारख्या जेष्ठ अभिनेत्रीने या प्रसंगात जे काही केले आहे ते केवळ लाजवाब.
 
                   इ.स. १९७५ चा सुमार भारताला स्वातंत्र्य मिळून जेमतेम पंचवीस वर्षे होत आलेली. इंग्रज भारत सोडून गेले तरी त्यांचा संकर झालेला एक मोठा अँग्लो इंडियन समाज अस्तीत्वात होता जो भारताला आपला देश मानायला तयार नव्हता. धर्माबरोबरच या समाजाचे प्रेमाच्या आड येणे, खलनायक होणे ही पडद्यावर जरी नावीन्यपूर्ण कल्पना असली तरी ते समाजातले वास्तव होते. औध्योगीकरणाची सुरुवात होऊन नुकताच काही काळ लोटलेला. त्याचे प्रतीक म्हणून चित्रपटात रेल्वे येते. रेल्वेची ती प्रचंड धुड, ते वेडेवाकडे रूळ, अवाढव्य लोखंडी पूल ते ओलांडत ज्युलीचे पडद्यावर अवतरणे यातून ती सगळी प्रतीक तो काळ पडद्यावर उभा करतात. ही प्रतिकं सुद्धा चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावत असतात.  टेलिफोन, गाडी ही सगळी प्रतिष्ठेची लक्षणे मानण्याचा तो काळ. याच खोट्या प्रतिष्ठेपायी बायकोला खुश करण्यासाठी मॉरिस एक जुनी सेकंडहँड गाडी घेऊन येतो, मार्गारेटसाठी मात्र त्या गाडीचे इंपोर्टेड असणे महत्वाचे असते. मात्र जेव्हा ती खटारा गाडी रस्त्यात बिघडते तेव्हा सगळं कुटुंब ती ढकलत घरी घेऊन येते. मॉरिस याच खोट्या प्रतिष्ठेचे पडलेले डाग अंगभर वागवित घरात येतो तेव्हा चित्रपट कुठेतरी पुढच्या घटनांची सूचना देत असतो. पुढे बर्‍याच काळानंतर याच रस्त्यावरून मार्गारेट जेव्हा बिघडलेल्या ज्युलीला दुरुस्त करून घेऊन येते, तेव्हा या प्रसंगाची आठवण येते आणि त्या खोट्या प्रतिष्ठेचे ते डाग तिथेही दिसू लागतात.         

                   चित्रपट सगळ्यात जास्त घडतो तो मॉरिसच्या घरात. त्या घरात प्रेम आहे, आपुलकी आहे त्याच बरोबर पराकोटीची भांडणे आहेत. याच घरात ज्युली लहानाची मोठी झालीय. वयात आलीय आणि वयाबरोबर येणारी संकटेही घेऊन आलीय. कुटुंबाबरोबर एकत्र व्हिस्की पिण्याचा प्रसंग, त्यानंतर माय हार्ट इज बिटिंग. . गात सगळं कुटुंब फेर धरून नाचतानाचा प्रसंग असो किंवा बापाला जेवणाचा डबा देत निरोप देण्याचा प्रसंग किंवा ती गरोदर असल्याचे आईला सांगतानाचा प्रसंग, रंग वेगळे असले तरी एक गोष्ट सतत जाणवत राहते ते म्हणजे त्या घरात भरलेले येशूचे अस्तित्व. ते अस्तित्व मग रंग आणखी गडद करते. मुलाला मारण्या ऐवजी जन्म देवून ज्युलीची सुटका करण्याचा पर्याय त्या अस्तित्वाला धरून पटकथेत येण मग साहजिक ठरत आणि ते क्लायमॅक्सला पूरकही  ठरत.

                   इथे जस येशूच अस्तित्व आहे तसच तिथे उत्पल दत्त – भट्टाचार्‍यांच्या घरात कृष्णाच अस्तित्व आहे. तू शाम मेरा साचा नाम तेरा ... या भजनावर ज्युलीचे त्या घरात येणं. अत्यंत तोकड्या स्कर्ट मधून दिसणारे पाय आणि पाठमोरी ज्युली फॉलो करीत कॅमेरा सरकत जाणे आणि मागे तू शाम मेरा .. जवळ जवळ निम्म गाण हे असच फक्त ज्युलीवर चित्रित झालेल. लेखक दिग्दर्शक प्रत्येकच फ्रेम मधून, प्रसंगातून पुढे घडणार्‍या गोष्टींची झलक देत आहेत. तिचे तुळशी वृंदावनापाशी थबकणे आणि घरात गेल्यावर आत देवघरात उषा आणि उषाची आई - रिटा भादुरी आणि अचला सचदेव तू शाम मेरा .. गाताना त्यांच्या आणि ज्युलीच्या मध्ये दिसणारा पातळ झिरझिरीत पडदा खूप काही सांगून जातो. आज तुम्हारे डॅडी के जगह तुम्हारा ममी, हम बोटल खोलेगा म्हणणारी ज्युलीची आई त्या घरात आहे तशी मासिकपाळीत चार दिवस स्वयंपाकघरात न येणारी शशीची आई या घरात आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून लेखकाने त्यांची ही व्यक्तिमत्वे खुबीने उभी केली आहेत. कारण खरा संघर्ष याच संस्कृती आणि खोट्या प्रतिष्ठेचाच आहे.   

                   बलदेव राजचे सहज सोपे संवाद ही सिनेमाची खास जमेची बाजू. अगर हम व्हिस्की मे पानी डालेंगे तो लोग दूध मे कया डालेंगे?’ असले टाळीबाज संवाद असो किंवा नादीरा आणि रुबी मायर मधले भावनिक संवाद असोत त्याला एक नैसर्गिक प्रवाह आहे. पटकथाकाराने आणि संवाद लेखकाने सुद्धा मार्गारेट वर खास मेहनत घेतलेली स्पष्ट दिसते आणि नादिराने त्या मेहनतीचे सोन केलय. पण लक्षात राहते ते उत्पल दत्तचे शेवटचे वाक्य मार्गारेट, सफेद चमडी के साथ तुम्हारा खून भी सफेद हो गया है? लगता है तुम्हारी गाडी स्टेशन मे आ गयी. सिनेमातल शेवटचं वाक्य. संपूर्ण पडद्यावर पाठमोर्‍या नादिराचा क्लोजअप. काही क्षणांचा अवकाश, नादिराचा चेहर पडद्यावर दिसत नाहीय पण त्यावर का भाव असतील ते तिच्या दहबोलीतून जाणवताहेत . . . आणि क्षणात नादिराचे मागे फिरणे.  

                 ज्युलीच्या संगीताबद्धल काय सांगावे? राजेश रोशन, आनंद बक्षी, हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय, लता, आशा, उषा, किशोर आणि प्रीती सागर. संगीताची सगळी टीमच उत्कृष्ट होती. यह राते नई पुरानी.. हे लताने गायलेले सोलो असो किंवा सांचा नाम तेरा . . हे आशा उषाने किंवा त्या प्रणय दृश्यातले भूल गया सब कुछ . . हे लता किशोरचे द्वंद गीत असो. ज्युलीच्या संगीताने तेव्हाच्या तरुणाईची मने जिंकली. प्रीती सागराच्या  माय हार्ट इज बिटिंग. . ने कित्येक प्रेम प्रकरणे सुरू झाली असतील. पण शेवटी मनात गुंजत राहते ते किशोरचे - दिल कया करे . . किशोरचा तो संयत, मऊ मुलायम स्वर आणि त्यामागे राजेश रोशनने वापरलेला ऑर्केस्ट्रा खास करून ते एलेक्ट्रोनिक गिटार. तेव्हा राजेश रोशनचा अरेंजर कोण होता कोण जाणे पण ज्या कुणी ते अरेंज केलय . . हॅट्स ऑफ टु हिम.

                 ह्या गाण्याच्या बोलांविषयी काय बोलावे?

दिल कया करे जब किसीसे किसिको प्यार हो जाए
जाने कहा कब किसिको किसीसे प्यार हो जाए
ऊंची ऊंची दीवारोंसी इस दुनिया की रस्मे
ना कुछ तेरे बस मे ज्युली ना कुछ मेरे बस मे
दिल कया करे . . .

                 ह्या गाण्यावर त्याकाळी ज्यांनी हृदये जिकली, दिली-घेतली, हरवली ती पिढी आता पन्नाशीत असेल पण ह्या गाण्याचे बोल ज्यांनी लिहिले ते हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय हे बोल लिहिताना सत्याहत्तर वर्षांचे होते हे आता कुणाला सांगून खरे वाटणार नाही.


****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा