शनिवार, २९ जून, २०१३

बालक – पालक : लेखक – दिग्दर्शक


बालक – पालक
लेखक – दिग्दर्शक
  
            एकादा सिनेमा नेमका कधी सुरू होतो?

            या प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतात. कुणी म्हणेल सेन्सॉर सर्टिफिकेट पासून, कुणी म्हणेल नामावली सुरू झाली की, कुणी म्हणेल संपली की. काही चित्रपट तर मध्यंतरानंतरच सुरू होतात तर काही द एंड ची पाटी आली तरी सुरूच होत नाहीत आणि हल्ली तर साली ती पाटी पण येत नाही.

            माझ्या मनात मात्र चित्रपट सुरू होतो तो त्याचे पोस्टर पाहिल्या पासून. बर्‍याच महिन्यांपूर्वी एका फिल्मच्या  एडिटिंगचे काम सुरू होते त्या स्टुडिओत एक पोस्टर लावले होते. तीन मुल.  एकाचे कानावर हात,  एकीचे तोंडावर आणि एका मुलीचे डोळ्यावर. ती बोटांच्या फटीतून चोरून बाहेर काही पाहते आहे. मुलांच्या शरीराचा रंग तेव्हढा काळा पांढरा राखाडी. सिनेमाचे नाव बालक-पालक’. काही तरी शरीराशी संबंधित आणि पाहण्यासारखे असावे. बालक पालकचा शॉर्टफॉर्म केलेला होता बी. पी. यावरून पाहण्यासारखे ते काय असावे याचा अंदाज येत होता. हे सगळे मनात घेऊनच बालक पालक पाहायला गेलो होतो.

            पहिला प्रसंग सुरू होतो. एक तरुणी गॅलेरीत बसलीय आणि शेजारच्या खोलीत एक तरुण, बहुदा तो तिचा पती असावा. एका (बहुदा त्यांच्या) मुलाला तो मारतोय आणि अंगावर खेकसतोय. हे सगळं बहुदा बहुदा सुरू आहे कारण, त्यातल्या पात्रांना काही ओळख नाही.  हे असं थेट चित्र सुरू होत, चित्रपट अजून दूर आहे. मग कळतं की ते दोघे नवरा बायको आहेत आणि त्यांचा अकरा वर्षाचा मुलगा कम्प्युटरवर ब्ल्यु फिल्म पाहत होता म्हणून ही सगळी मारामारी सुरू होती. आता हे  दोघे नवरा बायको या विषयावर गांभीर्याने काही बोलत असताना, आपल्या काळात हे अस नव्हतं किंवा कस होत?’ यावर गाडी येताच ती अपेक्षेप्रमाणे मागे फिरते आणि आपल्या काळात जाते. काळाचा हा पट मागे सरकतो, तो किती मागे जातो तर जवळजवळ चोवीस–पंचवीस  वर्षे. कारण आज चिऊचा मुलगा अकरा वर्षांचा आहे, तिला पंचविसाव्या वर्षी मुलगा झाला अस गृहीत धरलं तर ती आज छत्तीस वर्षांची असेल आणि ती बारा तेरा वर्षांची असे पर्यन्त कथानक मागे जाते म्हणजे किमान चोवीस वर्षे मागे जाते.  म्हणजे साल असावं इ.स. १९८८ -९०. 

            चार मुल. दोन मुली आणि दोन मुलगे. त्यातली एक ही तरुणी, चिऊ आणि दूसरा तिचा नवरा अव्या. सर्व मुले साधारण बारा तेरा वर्षांची. आता मागे निवेदन सुरू होते. आधी ते कळत नाही कुणाचे आहे. मग अंदाज येतो ते बहुदा चिऊचे असावे. आता प्रश्न आहे तो हा, की जर तिचा नवरा अव्या हा सुद्दा त्याच कथानकाचा भाग आहे. तो त्यातलं एक पात्र आहे आणि सगळं त्याच्या समोरच घडलय, त्यात त्याचा सहभाग आहे, तर चिऊ तीच गोष्ट त्याला पुन्हा का सांगतेय? मुळात पटकथा मागे नेण्याच कारणच काय? दोन पिढीतल साम्य दाखवण्यासाठी? दोन्ही पिढीत आणि पुढे तिसर्‍या पिढीतही किंवा पिढी दर पिढी हे असच चालणार हे लेखकाला ध्वनित करायचं आहे काय? आणि येवढ्याच साठी भूतकाळात जाण्याची  जोखीम लेखक दिग्दर्शक घेत असतील तर त्यांचं कौतुकच करायला हव. कारण चित्रपट मागे नेण्याच जे तंत्र आहे ज्याला आपण सहजपणे फ्लॅश बॅक म्हणतो ते भल्या भल्या दिग्दर्शकांनाही धड पेलता आले नाही आणि यात तर फ्लॅश बॅकच्या जोडीला पुन्हा निवेदन आहे, ही एक अधिकची जोखीम! कारण ते निवेदन नेमकं कुठे घालायचं हा प्रश्न आहेच. अनेकदा पटकथेत पुढे गेल्यानंतर निवेदक आहे किंवा होता हे लेखक दिग्दर्शकच नव्हे तर प्रेक्षकही विसरून जातात आणि मग कुठेतरी अचानक पुन्हा निवेदक उगवतो. थोड्या फार फरकाने हे याही सिनेमात झालेच आहे.

            कथानक जिथे दोन अडीच दशके मागे जाते तिथून खर चित्र उलगडायला सुरुवात होते. एक मध्यमवर्गीय चाळ, त्यात अनेक कुटुंबे आणि त्यात ही चारच मुले, एकाच वयाची, पाचवी एक कॉलेज तरुणी नेहा आणि एका ज्योती नामक तरुणीचा केवळ उल्लेख. पंचवीस वर्षापूर्वीच्या चाळीत बहुदा लेखक दिग्दर्शक राहिलेले नसावेत, नाहीतर हे चित्र उमटल नसत. तेव्हाच्या चाळी मुलांनी भरलेल्या असत. एकेका खोलीत चार पाच मुले सहज असत. एकाच चाळीत विविध वयोगटातील अनेकविध स्वभावाची, संस्कारांची मुले एकत्र नांदत असत. आणि मग ते संस्कार, स्वभाव एका कडून दुसर्‍याकडे परावर्तीत होत असत. सिनेमा ज्या विषयाला हात घालतो आहे त्यासाठी ही चाळ म्हणजे अतिशय उत्तम पार्श्वभूमी होती. सेक्स किंवा शारीरिक संबंधांचे जे कुतूहल मुलांमध्ये निर्माण होत होते, ते निर्माण होण्याला आणि शमविण्याला सुद्धा अनेकदा अश्या विविध वयोगटातील विविध स्वभाव, संस्कारांची मुलेच कारणीभूत ठरत असत. जरा थोराड मुले पौगुंडावस्थेतील मुलांना नेमकं हेरून त्यांचं कुतूहल जागृत करीत, त्यांच्या मध्ये ह्या भावनांच रोपण करीत असत. अनेकदा यात लहान मुलांचे शारीरिक शोषणही होत असे. वरच्या वयोगटातील मुलांचे, तरुणांचे त्याच चाळीतल्या किंवा शेजारच्या चाळीतल्या मुलींशी प्रेमप्रकरणे असत, ही प्रकरणे सुद्धा पौगुंडावस्थेतील मुलांचे कुतूहल ठरत असत आणि त्यातूनच भावना जागृत होत. पण हा सगळा माहोल निर्माण करण्यात लेखक दिग्दर्शक कमी पडले. याचे एक कारण असेही असू शकते की सिनेमा एका एकांकिकेवर आधारित आहे आणि ती एकांकिका सुद्धा एका प्रसिद्ध कादंबरीवर बेतलेली असावी असा दाट संशय आहे. कादंबरी, एकांकिका किंवा नाटक आणि सिनेमा ह्या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. सिनेमा माध्यमाची बलस्थाने, शक्यता वेगळ्या आहेत. सिनेमात अनेकविध कलांच एकत्रीकरण होत असत. ध्वनि, संगीत, दृश्य ह्या गोष्टी मदतीला असतात आणि जोडीला कॅमेरा नावाची अजब गोष्ट असते. या सगळ्यांचा विचार करता सिनेमा हा मुळातच सुचावा लागतो. त्यामुळे एकादा सिनेमा एकाद्या कथेवर किंवा कादंबरीवर आधारलेला आहे असे म्हटले की तो पाहण्यापूर्वी माझ्या पोटात गोळा येतो. 

            असं ठरवून सिनेमा कसा सुचू शकतो? लेखक दिग्दर्शकाला काही सांगायचं असत की नाही? दुसर्‍या कुणीतरी अगोदरच जे सांगून ठेवल आहे ते पुन्हा नव्याने आणखी काय सांगणार आणि त्यासाठी सिनेमा हेच माध्यम का? आणि जर ते वापरायचच तर त्याच्या शक्यतांचा विचार न करता केवळ कथेच सादरीकरण इतकाच उद्देश राहतो काय?

            बीपीच्या दिग्दर्शकाचा हा तिसरा सिनेमा. पहिला नटरंग आनंद यादवांच्या कादंबरीवर आधारित होता आणि त्यात ही काळाच उलट मागे फिरणं ही गोष्ट समान होती आणि त्यात ही इतकीच फसगत झाली होती. खरेतर इंटरनेट आणि मोबाइल नसलेला पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ या विषयाला अतिशय अनुकूल होता. त्या काळी मुलं एकमेकात अधिक मिसळत असत, घराबाहेर राहत असत, प्रत्यक्ष थेट संबंध येत असे. तेव्हा इंटरनेट नव्हते पण त्याच दरम्यान टीव्ही चे आगमन झालेले होते, टीव्ही रंगीत झाले होते, पण त्याचे अस्तित्व चित्रपटात कुठेही दिसत नाही. या भावना, हे कुतूहल जागृत करण्यात त्याकाळच्या हिन्दी सिनेमाचही योगदान मोठ होत आणि तो सिनेमा तेव्हा टीव्ही मधून घराघरात पोहोचत होता. बॉबी, ज्युली सारखे चित्रपट त्याच्याही एक दशक आधी येऊन गेले होते. या सिनेमात जो सिनेमा येतो त्याच योगदान या विषयाच्या अनुषंगाने शून्य आहे.

            चिऊ, डॉली, अव्या आणि भाग्या ही सातवी आठवीतली ही मुल दिवाळीच्या सुट्टीत शेण खाण म्हणजे काय?’ याचा शोध घेत असतात! त्यासाठी ते विशु नावाच्या एका लौकिकार्थाने वाया गेलेल्या मुलाची मदत घेतात आणि त्यातून त्यांचा सेक्स या विषयाशी संबंध येतो. कुतूहल जागृत होत. पौगुंडवस्थेतील मुलांना सेक्स म्हणजे काय हे या प्रकाराने कळण हे अगदीच बाळबोध वाटते. मुळात यातील शेण खाण हा शब्द प्रयोग सुद्धा थेट सेक्सशी संबंधित नाही तो प्रेम प्रकरणाशी संबंधित आहे. यातून हे सगळं काहीतरी मजेशीर, गंमतीदार सुरू आहे म्हणून प्रेक्षकही सुरुवातीपासूनच हसून दाद देत असतात. आणि मध्यंतरापर्यंत चित्रपट विनोदी ठरू लागतो. म्हटलं ठीक आहे, सेक्स सारखा गंभीर विषय विनोदाच्या अंगाने मांडला जात असेल तर ते चांगलच आहे. पण मध्यंतरानंतर अचानक लेखक दिग्दर्शकांना जाग येते आणि सिनेमा गंभीर होत जातो. ही ट्रीटमेंट मधली फारकत सगळा बेरंग करून टाकते.

            सेक्स या विषयावरील पिवळी पुस्तके वाचून झाल्यावर त्याच्या पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष अवलोकन करणे, यासाठी मुले जे काही करतात ते अगदीच हास्यास्पद वाटत. खरे तर त्याकाळातल्या चाळीत राहणार्‍या मुलांना असे घरोघर फिरण्याची काही गरज नसायाचीच. आजूबाजूला, कधी स्वत:च्याच घरात ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिसत होतच आणि या मुलांना  तर आवाज सुद्धा ऐकण चालण्यासारख होत. हे तर त्या काळी अगदी साहजिक होत. त्यामुळे चित्रपटातली ती चाळ आणि त्यातली मुल कधी खरी भासतच नाहीत. तो काळ ही खरा वाटत नाही आणि ती माणसेही. चित्रपटात काळ कोणताही असो तो दिसायला हवा, जाणवायला हवा. त्याकाळची स्थित्यांतरे त्याचा आशयावर होणारा परिणाम आणि त्यानुसार घडत जाणार्‍या घटना यातून पटकथा फुलायला हवी. मात्र पंचवीस वर्षापूर्वीची अशी अनेक स्थित्यांतरे जी विषयाला पोषक होती त्याचा मागमूसही चित्रपटात दिसत नाही. दहा बाय बारा, बारा बाय पंधरा फुटाच्या चाळीतल्या खोलीत किमान दोन जोडप्यांच एकत्र कुटुंब त्याकाळी असायचं, अगदी नाही तर आई बाप आणि नुकत लग्न झालेला मुलगा आणि सून, त्या मुलाच्या पाठची लग्नाला आलेली तरुण मुलगी किंवा मुलगा आणि बारा तेरा वर्षाचा त्यांचा छोटा भाऊ असे मिश्र कुटुंब चाळीतल्या खोलीत सर्रास पाहायला मिळत असे, (चाळीतली ही विविध वयोगटातील मुले एका प्रसंगात कदमकाकांच्या क्लास मध्ये दिसतात, पण मग ती त्या प्रसंगाच्या मागे पुढे कुठे परागंदा होतात कोण जाणे.) ही सगळी परिस्थिति मुलांमध्ये सेक्सचे कुतूहल जागृत करण्यास किती तरी पोषक होती. पण हे सगळं टाळायचच तर मग मागे जायचं कशाला?

            नवरा बायको दोघांनी नोकरी करण्याची सुरुवात त्या पूर्वी दोन तीन दशके आधी झाली असावी. आई वडील दोघेही नोकरीमुळे घराबाहेर असल्याने मुलांकडे दुर्लक्ष होण साहजिक होत. त्यामुळेच या चित्रपटातले कदमकाका सुद्धा प्रत्येक चाळीत असायचे. मात्र या चाळीतली आई नोकरी करणारी दिसत नाही. मागील पिढी पेक्षा या पिढीतल्या मुलांना मिळणारी अधिकची मोकळीक, वेगळी होत जाणारी एकत्र कुटुंबे. या कुटुंबात असलेल अधिक मोकळं ढाकळ वातावरण, याचाही मुलांच्या मनावर परिणाम होत असे आणि त्याचेही पर्यावसान सेक्स बाबतचे कुतूहल चाळवण्याकडे होत होतेच. अर्थात असे एक तरुण न्यूक्लियर कुटुंब जे इतरांपेक्षा काहीसं अधिक मोकळं आहे, या चित्रपटातही आहे, मात्र त्याचा काहीच उपयोग आपल्या या मुलांना होत नाही. किंवा जाणीवपूर्वक तो करून दिला जात नाही. कारण असा उपयोग जर झाला असता तर कदाचित आपली ही चार मुले बीपी पर्यन्त पोहोचली नसती. त्यांना कसेही करून बीपी पर्यन्त पोहोचवून बालक पालक हा समास साधायच्या या प्रयत्नात आशयाला अनुसरून असलेल्या परिस्थितीचा फायदा न घेतल्याने चित्रकर्त्यांनी घेतलेली पोज स्पष्ट होत जाते.  

            त्याकाळातल्या अगदी छोट्या छोट्या दृश्य गोष्टींबद्दल बोलायचं तर नायलॉनच्या साडीचे अवतरण, नायलॉनची ती साडी हा त्याकाळी सेक्स सिंबोल होता. ती साडी चित्रपटात कुठे दिसत नाही. आपल्याकडच्या मराठी चित्रपटात आणि अगदी हिंदीतही सगळ्यात दुर्लक्षलेला विभाग म्हणजे कपडेपट. दुर्लक्षेपणाची तीच परंपरा इथेही पुढे चालली आणि याच्या बरोबर उलट म्हणजे एका प्रसंगात सई ताम्हणकर ही कॉलेजकन्या जो लाल रंगाचा ड्रेस घालते तो त्या काळातल्या चाळीतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या  मुलीने घालणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती. असो इतक तपशिलात जायची खरे तर गरज नाही पण कपडेपट हा विषय निघाला म्हणून नमूद केलं इतकच.

            मुळ मुद्दा आहे तो चित्रपटाचा आशय आणि त्याची मांडणी. शेण खाण या वाक्प्रचारावरून पौगुंडवस्थेतील ही चार मुले सेक्सच्या जाणिवेकडे ओढली जातात आणि त्यातून बीपी पाहण्यापर्यंत मजल जाते ही अगदीच ढोबळ मांडणी झाली. त्या वयातल्या मुलांमध्ये घडणारे शारीरिक बदल आणि त्यातून होणारे मानसिक परिणाम याचा उल्लेखही पटकथेत होत नाही. या वयाच्या मुलांमध्ये स्वप्नदोषामुळे ओली होणारी पांघरूणे, त्यातून येणारा न्युंनगंड सेक्सशी प्रथम ओळख करून देतो आणि तिथेच या विषयाशी मुले आणि पालक नकळत जोडले जातात. मुलींच्या बाबतीत येणारी पहिली मासिक पाळी मुलीला आणि आईला या विषयाने जोडते, मग हे पालक आणि बालक कोणत्याही वर्गातले असोत. मात्र या सगळ्या मनोव्यापाराचा चित्रपट विचार ही करीत नाही. चित्रपटाचा सगळा फोकस हा मुले एक एक पायरी पार करीत बीपी पर्यन्त कसे पोहोचतात आणि त्याला पालक कसे जबाबदार आहेत यावरच केन्द्रित होतो आणि म्हणूनच चित्रपटाने एक भूमिका आधीच घेतली आहे असे सतत जाणवत राहते.

            इतक सगळं असूनही लेखक दिग्दर्शक अनेक गोष्टी स्पष्ट दाखवायच्या टाळतो. ढिंकच्याक शेवट पर्यन्त पडद्यावर येतच नाही. ते का? हा मोठा प्रश्न चित्रपट मागे ठेवतो. या प्रश्नाचे समोर जे उत्तर दिसते आहे ते असे की एकीकडे चित्रपट म्हणतो पालकांची भूमिका चुकीची आहे, पालकांनी मुलांशी उघड बोलायला  हवे. तर दुसरी कडे जे बोलायला हवे ते दाखवायला लेखक दिग्दर्शक कचरतात. चित्रपटाच्या दृष्टीने पाहिलं तर दाखवणे हीच चित्राची भाषा आहे, संवाद केवळ साथीला. पण इथे ते भान सुटते, जे दाखवायला हवे ते सांगितले  जाते आणि शेवटी चित्रपट बोलू लागतो. ज्या पालकांना लेखक दिग्दर्शक आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात ते लेखक दिग्दर्शक सुद्धा शेवटी पालकांचीच भूमिका घेतात आणि कुठेही काही दिसणार नाही, अगदी डोळ्यांवर धरलेल्या तळहाताच्या बोटातल्या फटीतूनही काही दिसणार नाही याची खबरदारी घेतात. खरे तर दाखवण्यासारखे जे ओघाने येऊ शकत होते आणि ज्याला कुणीही आक्षेप घेतला नसता असे बरेच होते. जी मुले बीपी पाहण्यापर्यन्त पोहोचतात त्यांना ते काय फक्त एकशे पंधरा रुपयात विडियोवरच तेव्हा पाहायला मिळत होते काय? ज्या वयातून ती जात आहेत त्या वयात स्वप्ने, स्वप्नदृश्य, स्वप्नदोष हे अगदी नैसर्गिक होते. पण मुलांच्या स्वप्नात जाण्याचही धैर्य लेखक दिग्दर्शक दाखवीत नाहीत. कारण पुन्हा तेच पालकाची भूमिका, मुलांशी बोलल आणि त्यांच्यावर वाईट परिणाम झाला तर?   किंवा मग चित्रपट प्रौढांसाठी न करण्याची घेतलेली व्यावसायिक खबरदारी. अर्थात अशा गोष्टी करण्यासाठी केवळ लेखक दिग्दर्शकच नव्हे तर निर्मात्यात सुद्धा धैर्य असावं लागत. अनंत तडजोडी करीत काढलेला चित्रपट विषयाला न्याय देणार कसा?

            चित्रपट पंचवीस वर्षे मागे नेण्याबरोबरच आणखी एक गोष्ट लेखक दिग्दर्शक करतात ते म्हणजे घटना घडविण्यासाठी दिवाळीच्या काळाची निवड करतात. का? दिवाळीचाच काळ का? दिवाळीचीच सुट्टी का? शाळांना दोन मोठ्या सुट्ट्या त्याकाळी असायच्या. पण दोन्ही सुट्ट्यांची गम्मत वेगळी. निदान त्या काळातल्या चाळीत राहणार्‍या मुलांसाठी तरी या दोन सुट्ट्या वेगळ्या असत. मे महिन्याच्या सुट्टीत मुले साधारणपणे गावी जात. त्यामुळे मे महिन्यात चाळी तश्या ओस पडत, मात्र दिवाळीच्या सुट्टीत मुले घरीच असत. या सुट्टीची विशेषता म्हणजे या सुट्टीत अनेक खेळ मांडले जायचे. बारा तेरा वयापर्यंत मुला मुलींचे वेगळे गट झालेले असत. मात्र या खेळाच्या निम्मीत्ताने क्वचित कधी ते जवळ येत. कॅरम, पत्ते, लगोरच्या, आटापाट्या इ. खेळामध्ये मुलांबरोबरच मुली सुद्धा भाग घेत. त्यातून आकर्षण निर्माण होत असे, मुलीचा पहिला स्पर्श ही केव्हढी अपूर्वाई असे त्या काळात. मात्र या चित्रपटात (किल्ला बनवणे या खेरीज) मुलांचे खेळ येत नाहीत. या वयातली मुले खेळाशिवाय कृत्रिम वाटतात, वेगळी वाटतात.  बारा तेरा वर्षांची असूनही मुलगे आणि मुलींचा एकच ग्रुप आहे आणि ते सगळे पिवळी पुस्तके आणि बीपी सुद्धा एकत्र पाहतात. हे त्याकाळी तर सोडाच पण आज सुद्धा घडत नाही.  मात्र ज्या पद्धतीने ती एकमेकांशी वागतात त्यावरून ती सगळी मुल आजच्या काळातलीच वाटतात.

            चित्रपटाच्या नावात पालक हा गट निम्मा भागीदार असला तरी चित्रपटची अधिकतर जागा बालकांनीच व्यापली आहे. सुरुवातीचा प्रसंग सोडला तर पालकांच्या वाट्याला केवळ चार किंवा पाच प्रसंग आले असावे. ते सुद्धा सगळे पालक एकाच सुरात बोलणारे, एकतर कानीखाली आवाज काढीन म्हणणारे, नाही तर आपली मुले आपल्याहून हुशार आहेत म्हणून दुर्लक्ष करणारे म्हणजे एकूणच या चित्रपटाने घेतलेल्या भूमिकेला साजेसेच. तरीसुद्धा यातील एकही पालक, एक चिऊची आई सोडली तर नीट उलगडत नाही. मुलांनंतर जे पात्र नीट आणि ठसठसीतपणे सिनेमात येते ते म्हणजे कदमकाका. पण कदमकाका तर इतके आगतिक आहेत की ते प्रत्यक्ष काहीच करू शकत नाहीत, कारण ती मुले त्यांची कुणीच नाहीत, त्यांचे पालकही त्यांचे कुणी नाहीत. अशा परिस्थितीत शेवटी लेखक -दिग्दर्शकाची म्हणजेच, सिनेमाची भूमिका प्रेक्षकांना समजावून सांगण इतकच काम त्यांच्या म्हणजे कदमकाका झालेल्या किशोर कदमांच्या वाट्याला येत आणि ते ते चोख करतात. पालकांपैकी एक अविनाश नारकर आणि  आनंद इंगळे, यातही आनंद इंगळेच पडद्यावर जास्त दिसतात. कै. आनंद अभ्यंकरांच्या वाट्याला एक पालक आले आहेत, परंतु यापैकी किंवा यांच्या बायकांपैकी म्हणजे मुलांच्या आयांपैकी एकाही पालकाचे पात्र नीटपणे समोर येत नाही. सर्व मुलांनी मात्र आपआपल्या भूमिका अगदी चोख केल्या आहेत. केवळ त्यांच्या अभिनयासाठी चित्रपट एकदा पहायलाच हवा बाकी आशय आणि सौंदर्याच्या दृष्टीने फार काही हाती लागत नाही. तरीही चित्रपट धो धो चालतो आहे. याच एक कारण असू शकते, आपल्या मराठी माणसांची मानसिकता. आपल्यावर टीका केलेली पाहायला, ऐकायला आपल्याला आवडते. आपल्या आजूबाजूला जे काही घडते आहे जसे भ्रष्टाचारमहागाई, गुंडगिरी बलात्कार इ. इ. ला आपणच जबाबदार आहोत असे कुणी म्हटले की आपण लगेच ते मान्य करतो आणि अंतर्मुख होतो. हा चित्रपट जेव्हा पालकांना म्हणजे आपल्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतो तेव्हा लगेच आपण मनोमन सुखावतो. आपल्याला ते आवडते आणि प्रेक्षक म्हणून आपण त्यात वाहवत जातो आणि मग चित्रपटाच्या गुणदोषांकडे आपले दुर्लक्ष्य होते. शेवटी एकशे नऊ मिनिटे आणि दीड कोटी रुपये खर्चून तयार झालेला हा चित्रपट मुलांशी बोला या संदेशा खेरीज एक चित्रपट म्हणून प्रेक्षकांना काय देतो हा मोठ्ठा प्रश्न मागे सोडतोच. पण आपल्याला काय त्याचे म्हणा, आपल्यातल्या पालकाला तो टपली मारून जागे करतो इतकही समाधान एकशे दहा रुपयात आपल्याला पुरेसं असत. नाही का?

****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा