बुधवार, १ जुलै, २०१५

जैतापूरचे काल्का होईल का?





 जर्मनीतल्या आखन शहरात डिकच्या घरात मी आणि फ्रँक आम्ही आपआपल्या लॅपटॉपमध्ये डोकी खुपसून बसलो होतो. अचानक आपल्या लॅपटॉप मधून डोके बाहेर काढीत फ्रँक मला म्हणाला, प्रदीप, व्हाट आर यू डूइंग टूमोरो?’
मी म्हटलं, नथिंग स्पेशल.
शाल वी गो टु काल्का टूमोरो?’ फ्रँकने मला विचारले.
व्हाट इज काल्का?’
ए न्यूक्लियर पॉवर प्लांट. त्याचे निळे डोळे चमकवीत गालात हसत फ्रँक म्हणाला. 
मला नाही म्हणायचे काही कारण नव्हते.   
   
दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमी पेक्षा लवकर ब्रेकफास्ट उरकून मी आणि फ्रँक आम्ही काल्काच्या दिशेने निघालो. आखन ते काल्का साधारण दीडशे किलोमीटरचे अंतर आहे, म्हणजे जेमतेम दीड दोन तास. त्या दिवशी शनिवार होता. रस्त्याला फारस ट्रॅफिक नव्हतं. फ्रँक आरामात गाडी चालवीत होता, दुसरीकडे मला काल्काची गोष्ट सांगत होता .  

काल्काची गोष्ट सुरू होते १९५७ सालापासून. पण त्याआधी आपल्याला जर्मनीतल्या दोन अणुऊर्जा प्रकल्पांची ओळख करून घ्यायला हवी. हॅम्बर्ग शहराच्या वायव्वेला साधारण ४५ किलोमीटर अंतरावर ब्रोकडोर्फ येथे १९६० सालापासून एका लाइट वॉटर रिएक्टरचे बांधकाम सुरळीत सुरू होते. पण १९७३ सालच्या नोव्हेंबर महिन्यात तिथे लोकांचा विरोध वाढू लागला. मोठ्या संखेने लोक निदर्शने करू लागले. या निदर्शनाना पार्श्वभूमी होती जर्मनीतल्या दुसर्‍या एका अणुऊर्जा प्रकल्पाची. दक्षिण जर्मनीत फ्रान्सच्या सीमेवर वायल नावाच्या एका गावात एका प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू होते. जमीनधारक शेतकर्‍यांनी जमिनी विकल्याही होत्या, मात्र आसपासच्या प्रदेशात वाईनसाठी द्राक्ष पिकवणार्‍या शेतकर्‍यांनी या प्रकल्पातून निर्माण होणार्‍या उष्णतेचा द्राक्ष्यांवर परिणाम होईल म्हणून आंदोलन सुरू केले आणि तिथल्या राज्य सरकारने भूसंपादन झालेले असतानाही वायलचा तो प्रकल्प रद्द केला. या आंदोलनाच्या विजयातून स्फूर्ति घेऊन ब्रोकडोर्फ येथे आंदोलन सुरू झाले. पाहता पाहता या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आणि १९७६ साली तर आंदोलक आणि पोलिस यांच्यात यादवी सदृश्य परिस्थिति निर्माण झाली.  जर्मनीच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी पोलिस कारवाई होती. एकाच वेळी तीस हजाराहून अधिक जर्मन रस्त्यावर उतरले होते. जर्मनीची एकंदर लोकसंख्या पाहता हा आकडा किती तरी मोठा होता. शेवटी १९७७च्या ऑक्टोबर महिन्यात ब्रोकडोर्फचे काम थांबले. जर्मन अणु विरोधी चळवळीचा हा दूसरा मोठा विजय होता.

दुसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जर्मनीने अणुऊर्जेचा उघड स्वीकार केलेला होता. मात्र युरेनियमचा मर्यादित साठा पाहता भविष्यात युरेनियमची टंचाई भासू शकते हे लक्षात घेऊन जर्मनीने १९५७ सालापासूनच प्लूटोनियमवर आधारलेल्या फास्ट ब्रिडर रिएक्टरच्या संशोधनावर भर दिला होता.  शेवटी जर्मनी, बेल्जियम आणि नेदरर्लंड या देशांनी मिळून जर्मनीच्या वायव्य सीमेवरील काल्का गावात एका ३०० मेगावॅट फास्ट ब्रीडर न्यूक्लियर रिएक्टरच्या बांधकामाला सुरुवात केली. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक यूनियन या पक्षाने आपली मजबूत पकड असलेल्या काल्का गावाच्या परिसराची या प्रकल्पासाठी निवड केली. शेतकर्‍यांना भरपूर मोबदला देऊन जमीन खरेदी करण्यात आली. आपल्या राजकीय पक्षाने आपले भले केले म्हणून शेतकरी खुष  झाले. त्यांनी भरभरून मते दिली, १९५९ सालच्या निवडणुकीत सी. डी. यू. सत्तेवर आली. प्रकल्पाचे बांधकाम सुरळीत सुरू होते. मात्र या प्रकल्पाची, खास करून फास्ट ब्रीडर रिएक्टरची घातकता लक्षात घेऊन नेदरर्लंडमधल्या नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होता, नेदरर्लंड मधले राजकीय पक्ष आमचा अणुउर्जेला विरोध नाही पण काल्काला आहे अशी भूमिका घेऊन या आंदोलनात उतरले. त्याच वेळी नेदरर्लंड सरकारने वीजदरात ३ टक्के वाढ केली आणि विरोध आणखीनच वाढला. त्यात १९७९ साली अमेरिकेत थ्री माइल आयलंड मधल्या अणुप्रकल्पात अपघात झाला आणि त्याचे जोरदार पडसाद जर्मनीत उमटले. जर्मनीत सर्वत्र अणुऊर्जेच्या विरोधात संतापाची लाट उसळली यात काल्का गावातले शेतकरी ज्यांनी जमिनीचे पैसे घेतले होते तेही सामील झाले. तरीही जर्मन सरकारने विरोधाला न जुमानता प्रकल्पाचे बांधकाम सुरूच ठेवले.

फ्रँकची गाडी आता हायवेवर धावत होती. काल्काचे फलक दिसू लागले होते. आता आणखी अर्ध्या तासात आम्ही काल्काला पोहचू.  फ्रँक काल्काची गोष्ट उत्साहाने सांगत होता. त्याने स्वत: त्या आंदोलनात भाग घेतलेला होता. फ्रँक भूतकाळात रमला होता आणि मी लक्ष देऊन ऐकत होतो.
   
वीस वर्षे इथल्या लोकांनी प्रचंड मोठा लढा उभारला. जर्मनीतून ठिकठिकाणाहून आम्ही कार्यकर्ते आपल्या गाड्या, भाड्याच्या बस, रेल्वे अशा जमेल त्या वाहनाने सात आठशे किलोमीटरचे अंतर पार करून काल्कात येत असू. प्रचंड पोलिस बंदोबस्त रस्त्या रस्त्यावर तैनात केलेला असे. आमच्या बसेस सात आठ वेळा तपासल्या जात. सायकल चालवताना घालायची हेल्मेट शस्त्र म्हणून पोलिसांनी जप्त केली. प्रवासात वेळ जावा म्हणून काही महिला कार्यकर्त्या स्वेटर विणत, त्यांच्या क्रोशाच्या सुयासुद्धा पोलिसांनी शस्त्र म्हणून जप्त केल्या, प्रवासात खायला म्हणून घरून आणलेली उकडलेली अंडी सुद्धा लोक फेकून मारतील म्हणून जप्त केली गेली. पोलिसी कारवाईचा अतिरेक झाला होता. ठिकठिकाणी लाठीमार होई, पाण्याच्या तोफांचा सर्रास वापर होत असे. तरीही लोकांनी लढा सुरू ठेवला. जर्मन सरकारने एकीकडे प्रकल्पाचे बांधकामही रेटून नेत सुरूच ठेवले होते. इ. स. १९८५ साली प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले. पंधरा ते वीस कोटी डॉलर किंमतीचा, फक्त एका अणुभट्टीचा, केवळ ३०० मेगावॅटचा हा प्रकल्प पूर्ण होई पर्यन्त ४०० कोटी डॉलर, म्हणजे साधारण २५ हजार कोटी रुपये खर्च झाले होते. किंमत वीस पट वाढली होती आणि प्रकल्प पूर्ण व्हायला पंचवीस वर्षे लागली होती. १९८५ साली अणुभट्टीत इंधन म्हणून साडे बाराशे किलो किलो प्लूटोनियम आणि कुलंट म्हणून सोडीयम भरण्यात आले. आता फक्त रिएक्टर सुरू करणे बाकी होते आणि १९८६ साली चेर्नोबिलची दुर्घटना घडली. पुन्हा विरोध प्रचंड वाढला. १९९१ सालापर्यंत लोकांनी सरकारला प्रकल्प सुरू करण्यापासून रोखले होते. मध्यंतरीच्या काळात प्रस्थापित राजकीय पक्षांच त्या प्रदेशातून उच्चाटन झालं आणि ग्रीन पार्टीचे उमेदवार निवडून आले. शेवटी १९९१ सालच्या मार्च महिन्यात जर्मनीतल्या  नोर्दर्‍हाइन वेस्टफालेन प्रांताच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केल्याचे जाहीर केले.  शंभर टक्के बांधून पूर्ण झालेला, इंधन भरलेला अणुप्रकल्प रद्द होण्याची ही जगातली पहिलीच वेळ होती. या प्रकल्पाच्या शेवटाबरोबरच फास्ट ब्रीडर रिएक्टरचाही युरोप मध्ये अंत झाला. आता जर्मन सरकारने या अणु प्रकल्पाचं मुलांच्या उद्द्यानात रूपांतर केले आहे. आता त्याचे नाव आहे काल्का वंडरलँड.     

आम्ही आता काल्का गावात येऊन पोहोचलो होतो. एक दोन ठिकाणी रस्ते चुकत शेवटी काल्का वंडरलँड अशी पाटी पहिली आणि सरळ मुख्य रस्त्याने पुढे निघालो. एखाद किलोमीटर पुढे गेल्यावर या वंडरलँडच मोठ्ठं प्रवेशद्वार लागलं. फ्रँकने समोरच्या पार्किंग लॉट मध्ये गाडी पार्क केली. प्रवेशद्वाराबाहेरच्या भल्या मोठ्ठ्या प्रांगणात मोठा बाजार भरला होता. त्या बाजारात एक फेरफटका मारून आम्ही आत गेलो. तिकीट होते २७ युरो म्हणजे आपले दोन हजार रुपये. आत अनेक राईड्स होत्या. दोन तीन मोठी रेस्टोरंट्स होती. या खेरीज छोटे मोठे खाण्यापिण्याचे, भेटवस्तूंचे अनेक स्टॉल्स होते. याखेरीज राहण्याची सोय असलेले एक मोठे हॉटेल आत होते. अणुभट्टीत थंडाव्यासाठी या प्रकल्पाच्या मागून वाहणार्‍या ज्या र्‍हाइन नदीतून पाणी घेतले जाणार होते त्या नदीच्या काठावर लोक कॉफी पित बसले होते. काही जण त्या नदीत गळ टाकून मासेमारी करीत होते. हे सगळं त्या वंडरलँडच्या खेळाचाच एक भाग होता. ज्या कुलिंग टॉवर मध्ये गरम पाणी थंड करण्यात येणार होते त्या कुलिंग टॉवरच्या आत बरोबर मध्यावर एक मोठा यांत्रिक झोपाळा उभारलेला होता. झटक्यात तो वर जात असे आणि त्या भव्य कुलिंग टॉवरच्याही वर जाऊन गरगर फिरत असे आणि त्याबरोबर त्याला टांगलेली माणसे कुलिंग टॉवरच्यावर फिरत होती. कुलिंग टॉवरच्या बाहेरच्या भिंतीचे कृत्रिम प्रस्तरारोहनाच्या भिंतीत रूपांतर केले होते. त्यावर तरुण मुलं वॉल क्लाईंबिंगचा  खेळ खेळत होती. कुलिंग टॉवरच्या खालच्या बाजूत जिथे अणुभट्टीतून येणारे पाणी थंड करण्यापूर्वी साठवले जाणार होते त्या पाण्यात लहान मुले छोट्या छोट्या रबरी होड्या घेऊन डुंबत होती. असा सगळा आनंदोत्सव सगळीकडे चालला होता.
मी तिथल्या इन्फॉर्मेशन काऊंटरवर चौकशी केली.
साधारण किती माणसे इथे काम करतात?’
हॉटेल, रेस्टोरंट, सगळ्या राईड, अॅडमिनिस्ट्रेटिव स्टाफ आणि सफाई कर्मचारी वगैरे धरून हजारच्या आसपास माणसे काम करीत असतील.
रोज किती लोक भेट देतात या उद्यानाला?’
सरासरी दिवसाला साडे तीन हजार लोक भेट देतात.
मी मनात आकडेमोड करू लागलो १९९१ ते २०१५ म्हणजे २४ वर्षे, गुणिले ३६५ दिवस आणि त्याला गुणिले साडे तीन हजार आणि त्या प्रत्येकाचे दोन हजार रुपये म्हणजे किती झाले? जाऊदे म्हणून सोडून दिले. बहुदा २५ हजार कोटी रुपये एव्हाना वसूल झाले असतील.   

येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं लागली होती. त्या शेतामध्ये शेतकर्‍यांनी पवनचक्क्याना जागा दिली आहे. कुठल्याही नुकसानीखेरीज त्या जागांचे वर्षाचे भाडे ही शेतकर्‍यांसाठी वरकमाई आहे. त्याखेरीज आपल्या घराच्या छपरावर, गोठ्यांवर, गोदामांवर सोलार पॅनल लावून त्याची वीज ते मोफत वापरतायत आणि उरलेली वीज वीज कंपनीला विकतात. दर वीकएंडला दोन दिवस या वंडरलँडच्या बाहेर बाजार भरतो. तिथे हे आजूबाजूच्या गावातले शेतकरी जगभरातून येणार्‍या पर्यटकांना घरी  बनवलेले पाव, जाम, चीज, लोणी, नदीतले मासे या खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ते कलात्मक भेटवस्तूंपर्यंत काय काय विकत असतात. याखेरीज हजारभर स्थानिकांना हे अणु-उदद्यान थेट रोजगार देते आहे.  आज काल्का वंडरलँड हे २५ हजार कोटी रुपये खर्च केलेले जगातले सगळ्यात महागडे लहान मुलांच्या खेळाचे उद्यान आहे. हे जर्मनीच्या अणुविरोधी चळवळीचे विजयस्थळ आहे. फुकुशिमानंतर जर्मनीने अणुऊर्जेचा उघड त्याग केला असला तरी त्याची बीजे काल्का, वायल, ब्रोकडोर्फ मध्ये पंचवीस तीस वर्षांपूर्वी इथल्या सामान्य शेतकर्‍यांनी रुजवली होती.

माझ्या मनात विचार आला, आज जैतापूरची परिस्थिति काही वेगळी नाही. विरोध अणुउर्जेला नाही    जैतापूर प्रकल्पाला आहे अशी काहीशी संदिग्ध भूमिका घेतलेले राजकीय पक्ष काल्काप्रमाणे याही आंदोलनात आहेत. इथेही प्रस्थापित राजकीय पक्षांना जैतापूरकरांनी धुडकावून लावले आहे.   काल्काप्रमाणे इथेही शेतकर्‍यांनी जमिनीचे पैसे घेतले आहेत. काल्कात चेर्नोबिल नंतर विरोध वाढला इथे फुकुशिमा नंतर आंदोलनाचा जोर वाढला. तिथेही तिथल्या सरकारने विरोधाला न जुमानता प्रकल्पाचे काम सुरू ठेवले, प्रकल्प पूर्णही केला. इथेही कोणत्याही परिस्थितीत जैतापूर प्रकल्प पूर्ण करूच अशा वल्गना सत्ताधारी पक्ष करीतच असतात. मात्र कमतरता आहे ती सकारात्मक इच्छाशक्तीची. जैतापुरात आज केवळ एक भिंत बांधली गेली तर, आता प्रकल्प होणारच, शेतकर्‍यांनी पैसे घेतले आता विरोध करून काय फायदा असा आत्मघातकी नकारात्मक विचार करणार्‍या कोकणी माणसाने जर्मनीतल्या या  काल्का वंडरलँडपासून धडा घ्यायला हवालोकशाहीत शेवटी विजय लोकांचाच होतो, व्हायलाच हवा.

*****