शनिवार, २९ जून, २०१३

एक नाइट आऊट, मुंबईतल्या बेघरांसोबत


 एक नाइट आऊट, मुंबईतल्या बेघरांसोबत


हिंमत . . . अरे ओ हिंमत . . हिंमत . . . सो गया क्या रे?’

ब्रिजेश हिंमतला हाका घालत होता तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. आम्ही चर्निरोड स्टेशनच्या समोर महर्षि कर्वे रोड कडून ठाकूरद्वार कडे जाणार्‍या रस्त्यावर उजव्या बाजूस जो पेट्रोलपंप लागतो त्याच्या अलीकडच्या कॉर्नरवर उभे होतो. उजव्या हाताच सुजलेलं मनगट सावरीत शेवटी एकदाचा धडपडत हिंमत उठला. पांघरूणातून उठून डोळे चोळत पाहू लागला.

अरे ब्रिजेशभाई, इतने रात मे?’
हा तेरी याद आई, चला आया.

समोर फुटपाथवर दहाबारा कुटुंबे झोपली होती. मुंबईच्या रस्त्यावर जगणारी ही बेघर माण्स, म्हणजे झोपडीवाले नव्हेत ते वेगळे, हे बेघर, ह्यांच्या डोक्यावर छप्पर नसते, बाजूला भिंती नसतात. सगळं ओपन टु स्काय. ब्रिजेश हा एक सामाजिक कार्यकर्ता बेघर अधिकार अभियान चालवतो. मुंबईच्या रस्त्यावर राहणार्‍या जवळ जवळ दहा हजाराहून अधिक माणसांशी याचा थेट संपर्क आहे. ते सगळे आणि तो सगळ्यांना नावाने ओळखतो. रस्त्यावर राहणारी दहाबारा कुटुंबांची एकादी कॉलनी दिसली तर त्या मागच्या भिंतीवर निरखून पहा, एक मोबाइल नंबर लिहिलेला दिसेल तो ब्रिजेशचा. सहा वर्षांपूर्वी मुंबईत समाजसेवा शिकायला आलेला हा तरुण एका रस्त्यावरच्या मुलांमध्ये काम करणार्‍या संस्थेत इंटर्नशिप करीत होता तेव्हा त्याचा या मंडळींशी संपर्क आला आणि आता तो त्यांच्यातलाच झाला.

मै खुद्को उन्मे से ही एक मान्ता हू, मेरे मे और उन्मे बहुत जादा फर्क नाही है, मै बस थोडे अच्छे कपडे पहन लेता हू, और थोडीसी अंगरेजि बोल लेता हू.
जिथे रात्री एक वाजता आम्ही उभे होतो त्या कर्वे रोडच्या कोर्नर वरची ही तीस चाळीस जणांची कॉलनी गेल्या सत्तावीस नोव्हेंबरला हटवली गेली. ते पूर्वी कर्वे रोडवरच्या चर्निरोड स्टेशनला लागून जो स्कायवॉक आहे त्याच्या खाली राहायचे. कर्वे रोड वरुन जाणार्‍या उच्चभ्रूच्या नजरेला ती गंदगी पडू नये म्हणून पोलिसांनी मारहाण करून हटवली. गरोदर बायका, लहान मुलं सुद्धा त्या मारातून वाचली नाहीत.

बरेच दिवस ह्या लोकांना भेटायचं होत, शेवटी इयर एंडिंगचे निमित्त मिळाले. रात्री नऊ साडे नऊ वाजता ठाण्याहून आम्ही सात जण काही ब्लाकेट, बिस्किटे आणि चॉकलेटची पाकीट घेऊन निघालो ते अकरा वाजता रेसकोर्स कडून ताडदेव आरटीओ कडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावरच्या पहिल्या कॉलनीत पोहोचलो.

गाव तो हमको हैच नाही, हम लोग इधरीच पैदा हो गये, मेरे बच्चेभी यही फुटपाथ पे पैदा हुये.
लक्ष्मी बोहारीण सांगत होती. घराघरात फिरून कपडे गोळा करणे हा या कॉलनीतल्या लोकांचा मुख्य व्यवसाय.

तुम्ही सगळेच कामाला जाता का?’
हा.
फिर दिनभर ये चिजे कौन सांभालता है?’
त्यांच्या उघडया संसाराकडे पाहत आमच्या पैकी एकाने विचारलं.   
ये सब, इधरीच बांध के रखते है. कोई पेड पर रख्ते है, कोई उस दीवार के पिछ्छे. फिर भी मुंसिपाल्टिवाले उठाके ले के जाते है, कभी पुलीस लेके जाती है.
फिर छुडवाने के लीये पैसे लेती है, कभी कभी ओ पैसे इतने जादा होते है की उसमे नई चिजे आ जाती है, फिर ओ उधरीच छोडके हम वापस नई चिजे खरीदते है.    

मुंबईतल्या अतिधनाड्य लोकांनाच जिथे प्रवेश मिळतो अशा विलिंगडन गोल्फ क्लबच्या बाजूने आम्ही ताडदेव आरटीओच्या दिशेने चालत होतो. म्युनिसिपालिटी ने आणून टाकलेले एका वर एक रचलेले लांबलचक पाइप रस्त्याच्या बाजूला टाकलेले होते.
‘गीता, ओ गीता. . . ‘
ब्रिजेश त्या सुनसान रस्त्यावर ओरडत होता. चार पाच कुत्री भुंकत अंगावर आली आणि एका पाइप मधून एक डोक बाहेर आल.
‘अरे ब्रिजेश्भई, आप तो कल सुबह आने वाले थे.’
‘हा, इधरसे जा रहा था, सोचा की आप लोगोन्से मिल लू. खाना हो गया क्या?’
‘अरे अभ्भिच बरतन धो डाला.’
‘तेरे ये कुत्तोंको संभाल, मुझे कुत्तोंसे बडा डर लगता है.’
आम्हाला पाहून गीता बाहेर आली. आणि मग बरेच जण बाहेर आले. त्या प्रत्येक पाइप मध्ये आठ दहा जण झोपलेले होते. मुंबईच्या फुटपाथवरची ती एक मल्टी स्टोरी कॉलनी होती.
‘मै उस सामनेवाले बिल्डिंग मे बर्तन मांजणे को जाती हू, और मेरा बच्चा इस क्लब मे काम करता है.’
‘इधरके सभी युवक ईसी क्लब मे काम करते है, रोज सुबह लाइन लगानी पडती है, फिर कुछ बच्चोंको लेते है.
‘कया काम करते है?’
‘कुच्च भी, कॅंटीन मे बर्तन धोना, संडास साफ करना या फिर जब वो खेल्ते है, तब उनके साथ घुमना.’
‘वो जब पैसा देते है तो उसका रिसिट या पर्ची कुछ देते है? या फिर इन बच्चोंका दस्खत लेते है? ऐसा कुछ?
‘नई, नई . . कुच्च भी नई.’ 
ती सगळी पोरं आता जमा झाली होती. त्यांना गाडीतले बिस्किटाचे पुडे आणि चॉकलेटस दिली.
जाव, अब न्यू इयर मनाव. ब्रिजेश
ये ब्रिजेशभाई, ऊनको लेके इधर आव. ये देख हमने क्या बनाया है
आम्ही गेलो, पाहतो तर त्या पोरांनी रस्त्याच्या कडेला एक बुढ्ढामॅन केला होता, समोर दारूच्या बाटल्या आणि डोळ्यांमध्ये मिचमिचणारे लाइट.    

आम्ही पुढे निघालो. ताडदेव आरटीओच्या बाहेर तर गाडीतून उतरावे ही लागले नाही. चार पाच बायका आणि दोन तीन पुरुष रस्त्यातच जमा झाले.
ब्रिजेशभाई, वो राशन कार्ड का काम नई हुआ अबी तक.
कयू? क्या बोलता है वो.
अरी वो मिल्ताच नई.
हा अभी छुट्टीपे होगा, इयर एंडिंग है ना, दो तारीख के बाद जाव. . . अरी सपना, तेरे मरद का क्या हुवा? छोडा की नही पुलिसने?’
नई ना बिरजेशभै, अभी दो महीने के उप्पर हो गया.
तुमको बोला था न, वो वकील संजय को मिलने के लिये, तू गई कयू नही अब तक?’
टाइमच नई मिल्ता न
तो कया उस्को इधर लेके आऊ मै?’
नई, नई. सोमवार को जाती मै, कैसे भी.    

आम्ही पुढे निघालो,
पुलीस इनको बडा तंग करती है, मुंबई मे कुछ भी हुआ तो पैला इनको उठाती है. और वैसे भी जब बोंबस्फोट हुये, मुंबई पे हमला हुआ या फिर ट्रेन के जो अक्सीडेंट होते है, तो लाशे उठाने को भी इनको ही लेके जाते है. और इनके आपस के झगडे भी बहुत होते है. दारू पिके इक दुसरे से झगडे करते है, मारामारी होती है. तो पुलिस ले के जाती है. एक बार अंदर गये, नाम रेकॉर्डपे आ गया तो बार बार उठाना पुलिस के लिये आसान हो जाता है.

बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या बर्रोबर समोरचा फुटपाथ, रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँडच्या मधल्या रस्त्यावरचा. एका बाजूला एक मोठ्ठं सार्वजनिक शौचालय आहे आणि दुसर्‍या बाजूला एक वस्ती, साधारण सात आठ कुटुंबे.

ये, बायो किधर गयी रे?’ तिथे पत्ते खेळणार्‍या मुलांना ब्रिजेश विचारत होता.
अभी तो इधर थी ब्रिजेशभाय, इधरच किधर होगी, वो देखो आ रही हय.
समोरून एक चाळीशीतली बाई येत असते. ही रेहना, तिला सगळे इथे बायो म्हणतात.

आपण रस्त्यावर बिर्‍हाड टाकून जगणारी ही माणस रोज पाहत असतो. आपल्याला असे वाटत असते की ही सगळी परप्रांतीय आहेत, यूपी बिहार मधून आलेली. पण एक तर ही परप्रांतीय नाहीत, यांच्या तीन चार पिढ्या मुंबईच्या रस्त्यावरच जन्माला आल्या आणि इथेच मेल्या. दुसरे म्हणजे यातले यूपी, बिहार मधले फार थोडे आहेत. जास्त करून गुजराथ, कर्नाटक अगदी महाराष्ट्रातले सुद्धा आहेत.

हम्को को तो पताच नई हम किस राज्य के हय. मेरा जनम तो इधरीच हुआ मेरे मा बाप का और मेरे बच्चोंका भी. लेकीन मेरा बाप बोलता था कर्नाटक मे कही गाव था हमारा. रेहना सांगत होती.
ब्रिजेशने या सगळ्यांचे ग्रुप बनवले आहेत. अगदी रस्त्याच्या एका बाजूच्या फुटपाथवरचा एक ग्रुप तर समोरच्या दुसर्‍या फुटपाथवर दूसरा ग्रुप. त्या प्रत्येक ग्रुपचा एक लीडर. रेहना या ग्रुपची लीडर होती.  

क्या करती है आप?’
रेल्वे का पब्लिक टायलेट धोती हु, और सामने एक बिल्डिंग मे झाडू पोछा, कपडा धोना वगारा.
और आपका मरद कया करता है?’
वो एक छोटा टेम्पो चलाता है.
कितने पैसे मिलते है?’   
संडास साफ करने के एक हजार और झाडू पोछा के एक हजार.
और आपके मरद को?’
दो हजार. मतलब चार हजार समज लो महिनेके.
और बच्चे क्या करते है?’
वो स्कूल जाते है. छोटी लड्की सातवी मे है और बडा लाडका भी सातवी मे है.
एक गोष्ट मात्र आशादायक होती की यांची बरीचशी मुलं शाळेत जात होती.

बॉम्बे सेंट्रलला उभे होतो तेव्हा रात्रीचे बारा वाजत आले होते. सगळी मुल गाढ झोपली होती. बर्‍यापैकी थंडी होती. अंगभर पांघरून घेतलेल्या या मुलांचे चेहरे तेव्हढे दिसत होते. यातली बरीच मुल गोरी गोमटी, पिंगट केसांची, टीव्ही वरच्या जाहिरातीत सहज खपून जातील अशी.
वो उधर सोयी है न, झरीना उसका नाम. वो विरार मे एक बोर्डिंग स्कूल मे रईती है. अभी खिरिस्मस के छुट्टी मे घर आई है. बोलणारा मुलगा सहज बोलून गेला, पण घर आई है हे शब्द ऐकून कसेसेच वाटले.
रस्त्यावरच्या मुलांमध्ये काम करणार्‍या कुठल्या तरी एनजीओ ने तिची बोर्डिंग स्कूल मध्ये व्यवस्था केली होती.

बायो, इधर तो सब मरद और बच्चे दिखते है, औरते कहा गयी?’ मी विचारले.
क्या बताये भैय्या, जबसे ये देल्ली मे लफडा हुवा है, हम औरतोंको पुलीस रास्ते पे सोने नही देती. दंडे मारती है. तो हम सब अभी उस पब्लिक टायलेट मे सोते है.
क्या? पब्लिक टॉयलेट मे?’
हा, आओ ना. देखते है.
अरे नही, वो तो लेडीज टॉयलेट है.
हा, तो क्या हुवा? सब अपने ही है,   
बायो घेऊन गेली.
आत पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. सगळीकडे बायका झोपल्या होत्या, कुणी बसूनच पेंगत होत्या. त्यातल्या बहुतेकींकडे कपड्याची मोठ्ठी गाठोडी होती.
सुबह चार बजे उठना पडता है. पब्लिक आना चालू होता है न.
आप क्या काम करती है. तिथे पायरीवरच झोपलेल्या एका बाईला मी विचारले.
ये सब घर घर जाके पुराना कपडा जमा करती हू. उसके बदले मे बर्तन या फिर पैसा देनेका.
ती मोठमोठाली गाठोडी म्हणजे त्यांनी दिवसभर फिरून जमा केलेले कपडे होते. ते पोलिसांनी किंवा म्युनिसिपलिटीने नेऊ नये म्हणून त्या सतत जवळ बाळगत होत्या, अगदी झोपताना सुद्धा.

यातली काही कुटुंब अशी होती ज्यांच्याकडे भांडीकुंडी नव्हती. तर काहींकडे गरजे पुरती भांडी होती, एकादी कुठे खाट पण दिसत होती. त्याच्या खाली सगळा संसार मांडलेला होता. मात्र बहुतेक ठिकाणी सगळं उघड्यावरच होत.
फिर आप काम पे जाते है, बच्चे स्कूल जाते है तो ये सब कौन सांभालता है?’
मागचाच प्रश्न पुन्हा या ग्रुपला विचारला गेला.
ये है ना.
तिने रस्त्यावरच्या कुत्र्यांकडे बोट दाखवून म्हटले. त्यातली काही त्यांच्याच अंथरुणात झोपली होती. रस्त्यावरच्या कुत्र्यांना जवळ करण्याची ही रीत सगळ्याच बेघरांमध्ये दिसून येते. तुकारामाने एका अभंगात एकेठिकाणी म्हटलं आहे, कुतरी घर राखीती, त्याचा प्रत्यय आला. 


आप खाना पकाती है इधर?’ तिथे मांडलेल्या तीन दगडांकडे पाहून विचारले.
हा. पकाते है ना.
फिर पानी कहासे लाते हो?’  
वो, उधर से. बायोने त्याच पब्लिक टॉयलेट कडे बोट दाखवून म्हटले.

और फिर न्हाना धोना और संडास?’
वो भी उधरिच. नहाने के दस रुपये देने पडते है और संडास के दो रुपये. बायो म्हणाली.
आप ही साफ करती हो तो आपको भी पैसे देने पडते है?’
जो साफ करता है, उसे नही देने पडते, लेकीन उसके मरद और बच्चोंके पैसे लेते है.
ये यहा का सबसे बडा एकोनोमिकल इश्यू है. ब्रिजेश सांगत होता. ये एक फॅमिली महीनेका तीन चार हजार कमाती है, अगर दोनो को मिलके तीन चार बच्चे हो, तो हर एक का दिन का बारा रुपया, मतलब साठ रुपया और महीने का अठरासो रुपया याने के इनके कमाई का करीब करीब आधा हिस्सा न्हाना धोना और संडास पे खर्चा होता है.
हर दिन न्हाते हो कया?’
हा, हर दिन न्हाना पडता है न. ऐसा गंदा काम करते है, ऐसी जगह सोते है तो न्हाना तो पडता ही हय. हम बिल्डिंग मे काम करते हय. बदन को बास आयेगा तो काम कैसे मिलेगा? हमारे बच्चे स्कूल जाते है, ऊनको भी तो न्हाना पडता हय न.

कामाठिपुर्‍यातल्या तिसर्‍या गल्लीत आमची गाडी शिरली तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते.
कामाठीपुरा तो बहुत बडा है, चौदा गलिया है. पुरी रात भी घुमेगे तो खतम नही होगा. ये तो बस एक झलक है.
आम्ही तिसर्‍या गल्लीतल्या काही लोकांशी बोलत होतो.
छत्तीस साल हो गया, मै इस एक खाट पे रैता हु. कामाटीपुर्‍यातल्या एका गटारावरच्या खाटेवर बसलेला अब्दुलचाचा सांगत होता. ती खाट हेच त्याच जग होत, सर्वस्व होत.
पाच दहा मिनिटात अनेक जण जमा झाले. सगळे झोपेतून उठूनच आले होते.
कुत्री भुंकत होती.
ये अम्मा, तेरे कुत्तोंको संभाल. ब्रिजेश
मी हळूच ब्रिजेशला विचारलं, ब्रिजेशभाई, इनमे सेक्स वर्कर कितने है?’
नही नही, इनमे कोई सेक्स वर्कर नही है, ये सब काम करने वाली है.
साब, अब कामाटीपुरा पहले जैसा नही रहा, सारी रौनक उतर गयी. अब सारा बिझीनेस्स नई मुंबई और नालासोपारा, मीरा रोड चला गया. अब पाच छे साल मे यहा बडे बडे टावर बन जाएंगे. सुरेश सांगत होता. तो इथल्या फुटपाथवर एकटाच राहत होता. बचपन मे रेल्वे प्लॅटफॉर्म पे रहाता था, कुछ गलत काम किये, तो डोंगरी भेजा गया. फिर वहा से डायरेक्ट इधर आ गया. अब दिनभर काम करता हु और रात को यहा सोता हू.
अब यहा बडे बडे टावर बनने लगे है, आज नाही तो कल हमे यहा से भगाया जायेगा, लेकीन पता नही इन टोवेरोमे काम करने के लिए उन्हे बाई कहा से मिलेगी?’ चंपाबेन बोलत होती.

यही तो रोंना है, यहा की छोटी बिल्डिंगे तुडवाकर कर टावर बन जाते है, जो छोटी बिल्डिंगोमे रहते है, उन्हे भले छोटेही सही लेकीन घर मिल जाते है, लेकीन पहलेवाले छोटी बिल्डिंगोमे काम करने वाले दूर भगाये जाते है. उन्हे तो कुछ भी नही मिलता, और नये ऊंचे बिल्डिंगो मे और जादा वर्कर लगते है. वो कहा रहेंगे उसका कोई जवाब नही. हम कार्यकर्ता नाइट शेल्टर की मांग करते है, लेकीन नाइट शेल्टर कोई पर्याप्त हल नही है, वो तो एक टेंपररी मलमपट्टी है. पर्याप्त व्यवस्था यही होनी चाहीये की इन्हे घर मिले और जहा काम करते है वहा से चलके आने की दूरी पे मिले. कयू की उन्हे जो आमदानी मिलती है, उन्मे ये कोई भी वाहनोसे काम पे नही जा सकते. ब्रिजेशभाय.

ये, भोला कया रे? कया चल रहा है?’ गाडीतूनच ब्रिजेशने विचारले
कुछ नय ब्रिजेशभै, न्यू यर मना रहेले है.
भुलेश्वरच्या एका फुटपाथवर एका डीव्हीडी प्लेयर भोवती बरीच मुल एकत्र जमली होती. त्यातली बरीच मग गाडीभोवती जमली.
ये ले सबको चॉकलेट बाट, और न्यू इयर मना. पोलिस का कुछ लफडा तो नही अब?’
नई, वो कया सामने ही बैठे है. पुढच्या रस्त्यावर दोन तीन हवालदार शेकोटी भोवती खुर्च्या टाकून बसले होते.
और वो नगरसेवक को मिले कया आज? कल बोला था न मिलने को?’
हा मिले न बिरजेशभई,’
कया बोला वो?’
वो बोलता है, कुच्च नई होगा तुम्हे यहा से जाना ही होगा.
अरे ऐसे कैसे जाएंगे, उन्हे १९९५ पईले के पेपर दिखाये?’
हा दिखाये न. एक पोरगा धावत जाऊन पेपर घेऊन आला.
तिथे राहणार्‍या प्रत्येकाचा वीस बावीस पेपरचा एक बंच होता. इलेक्शन कार्ड पासून ते वेगवेगळ्या अधिकार्‍यांना लिहिलेल्या पार १९९० पासूनचा पत्रव्यवहार होता.

अब यहा कोई नया टावर या कॉम्प्लेक्स आने वाला होगा, जनरली नगरसेवक वोट के लीये इन्हे इसतेमाल करते है, एक के बाद दूसरा कोई न कोई इलेक्शन आता राहता है, और ये कोग इस्तेमाल होते रहते है. लेकीन जब एरिया मे नया टावर आनेवाला होता है, तो पहले इन्हे हटाया जाता है, कयू की ये गंदे दिखते है, फिर प्री कन्स्ट्रकशन भाव पे भी उसका असर होता है. और फिर बिल्डरोंके किये नगरसेवक उतना काम तो कर ही देते है. चर्निरोड पे यही हूआ, चलो वही जाते है.  
भुलेश्वरहून ठाकूरद्वार नाका पार करत आम्ही चर्निरोड स्टेशन कडे निघालो.

सुजलेला हात सांभाळत हिम्मत आम्हाला पेपर क्लिपिंग आणि फोटो दाखवत होता.
ये देखो, ये पेटसे है, लेकीन उसको भी नही छोडा. ये इसके पाव पे निसान देखो. हमने इनका कया बिगाडा था? हम तो रात को यहा सोते है, दिन भर तो बाहर काम पे जाते है. दिनभर फुटपाथ खाली रहता है. उनको हमसे किस बात की तकलीफ है?’

यहा के नगरसेवक को मै मिला था, शिवसेना का है, यहा तक की उद्धवजीसे भी बात चल रही थी, लेकीन पुलीस नही मानी. गाडीत ब्रिजेश सांगत होता. महर्षि कर्वे रोड वरुन गाडी आता उलट्या दिशेने ओपेरा हाऊसकडे निघाली होती. ओपेरा हाऊस कडे जाणारा मुख्य रास्ता सोडून ब्रिजेशने गाडी सरळ पुढे घ्यायला सांगितली आणि आम्ही दुसर्‍या बाजूने ओपेरा हाऊसच्या पूलाखालच्या एक्साइज ऑफिस जवळ पोहोचलो. त्या कॉर्नरला एक मुतारी आणि जवळच पोलिस चौकी आहे. या वस्त्यांच्या शेजारी सार्वजनिक मुतारी असणे हे सगळीकडे अगदी साहजिक होत, कारण पाण्याचा तोच एक आधार होता.

पुलिस चौकी के आसपास अगर ये रहते है तो पुलिस इन्हे नही उठाती.
ब्रिजेशने एक आश्चर्यजनक सत्य संगितले.
क्युं?’
क्युं की ये पुलिस के काम आते है, उनके छोटे बडे काम वो इनसे करवा लेते है, और बदले मे इन्हे वहा रैने देते है.  

ये रज्जाक तेरे पिक्चर दिखा ना, ये रज्जाक बडा कलाकार है. एक सतरा अठरा वर्षांचा मुलगा त्याच्याच वयाच्या एका मुलाबद्दल सांगत होता.
नही साब, मै कुछ नही, मुझे कुछ नही आता. रज्जाक लाजून नजर चुकवित काहीतरी पुटपुटत होता.
आजूबाजूच्या मुलांनी थोडा आग्रह केल्यावर तो एक जुनी फटकी नायलॉनची बॅग घेऊन आला. आत काही कागद होते. मिळेल त्या पांढर्‍या कोर्‍या कागदावर साध्या पेन्सिलने काढलेली चित्र होती सगळी. त्यात राजेश खन्ना होता, रॉकस्टार रणबीर कपूर होता, कतरीना होती. पण त्या खेरीज काही अत्यर्क, दुर्बोध चित्रे ही होती. एकमेकात मिसळलेले अनेक चेहरे होते, त्या सगळ्या चेहर्‍यांचा मात्र एकच डोळा.
कहा सिखा ये सब?’
कुछ नही साब ऐसे ही देखदेख के बनाया.
तो फिर सिखता कयू नही, किसिको बोल के सिखाने की व्यवस्था की जा सकती है, कयू ब्रिजेशभाई?’
एक जगह भेजा था सिख्ने, थोडे दिन गया, फिर बंद हो गया.
क्युं?’
काम पे जाना पडता है न, फिर काही बार लेट हो जाता था. रज्जाक.
यहा इन लोगो मे काम से बढकर कुछ नही, पहली प्रायोरिटी है काम. ब्रिजेश.

ओपेरा हाऊसहून सीएसटीला वळसा मारत आम्ही जेजेच्या पुलावर आलो. तिथून खाली उतरून गाडी महमदअली रोड कडून डोंगरीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कोपर्‍यावर थांबवली. रात्रीचे दोन वाजले होते. जेजे हॉस्पिटलच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या फुटपाथवर सगळीकडे निजानीज झाली होती. तिथल्या एका अंथरुणावर बसून एक मध्यमवयीन बाई आणि एक बारा तेरा वर्षाचा मुलगा काहीतरी खात होते.
हे वाहिदा, अब्बी खाना खा रही हो कया?’
हा बिरजेशभई, लेकीन तुम इतनी रात गये कया कर रहे हो? खाना खाया के नै?’
अरे ऐसेही चला आया, तुम्हे कुछ देना था.
मग गाडीतून बिस्किटे आणि चॉकलेट काढून ब्रिजेशने त्यातली काही त्या मुलाच्या हातात दिली. बाकी सगळे झोपले होते.
कल सुबह बाकी लोगोंकों पता चलेगा तो वो मुझे नोच लेंगे. असे म्हणत तो त्या झोपलेल्या माणसांच्या कुठे पांघरूणात, कुठे उशाखाली बिस्किटाचे पुडे, चॉकलेटचे बार ठेवीत गेला. उद्या सकाळी त्यांच्यासाठी तो सांताक्लोज ठरणार होता.

मुझे ये सब अच्छा नही लगता. मै ये देता नही, क्युं की वो फिर मुझसे आशा करने लगते है. मै इनसे कोई इमोशनल संबंध नही रखता और मै चाहता भी नही की कोई इन पर दया दिखाये. ये एक सामाजिक समस्या है और उसे सुलझाना मेरा काम है. अगर मै इनके प्रती भावनावश हू जाऊ तो काम कैसे होगा. मेरा तो कितने बार इनसे झगडा होता है. फिर दुसरे दिन हम एक हो जाते है.

बोलता बोलता आम्ही डोंगरी पोलिस स्टेशन वरुन रे रोडच्या ब्रिज वर आलो. इथे पण सगळे झोपले होते.
हम लोग जरा लेट निकले, थोडा जलदी आना चाहीये था. यांच्याही उशाशी बिस्किटे, चॉकलेट ठेवत ब्रिजेश पुढे जात होता. कुत्री भुंकायला लागली. त्याने काही जण उठलेच.
ये बिरजेशभाय, एक पाकेट बिसकुट करीना को भी दे ना.
एक दहा बारा वर्षांची मुलगी समोर उभी होती, तिच्या दोन पायात एक काळे कुत्र्याचे पिल्लू होते. कुत्री असावी, तिचे नाव होते करीना. करीनाचे दोन्ही कान हातात धरून ती मुलगी ब्रिजेशशी बोलत होती.

आम्ही गाडीत येऊन बसलो, गाडी सुरू होणार इतक्यात दोन बायका धावत आल्या.
भाई, एकाद कंबल है? वो पारू बिमार है, बहुत थंड लग रही है. ही ब्रिजेशची एक ग्रुप लीडर.
अरे, तो पहले बोलना चाहीये था न. अभी तो साब बांट दिये.
ती खूपच गयावया करू लागली, शेवटी ब्रिजेशने गाडीच्या डिकीतून एक ब्लांकेट काढून तिला दिले.
गाडी सुरू झाली.
मै ये सब चिजे बहुत चुन चुन के देता हू, जिसे सचमुच जरूरत है उन्हे ही वो मिल्नी चाहीये. मै इन्हे अपाहिज नही करना चाहता.

गाडी आता परतीच्या वाटेवर होती. ब्रिजेशला कलिनाला सोडून ठाण्याला घरी पोहोचेपर्यंत पहाटेचे चार वाजले. बाथरूम मध्ये गेलो नळाखाली बादली लावली आणि नळ उघडला. धो धो पाणी वाहत होते. एक विचार मनात आला, या सगळ्याचे मी किती रुपये देत असेन? घरातल्या सगळ्या माणसांसाठी लागणार्‍या सगळ्या पाण्याचे मिळून महिन्याचे दीड दोनशे रुपये. बस्स, याहून जास्त नाही. पण दिवसाला शे दीडशे रुपये कामावणारी ही माणसं त्यातले तीस चाळीस रुपये कुटुंबातल्या माणसांच्या फक्त संडास आणि आंघोळीसाठी खर्च करतात, म्हणजे उत्पन्नाच्या पंचवीस तीस टक्के हिस्सा फक्त स्वच्छ राहण्यासाठीचा खर्च? इतका तर आमचे उच्च मध्यमवर्गीयच नव्हे तर अतिश्रीमंत सुद्धा करीत नसावेत. आणि हा खर्च ते येवढ्याच साठी करतात की ज्या मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांची घाण ते उपसत असतात त्यांना त्यांच्याच घाणीचा वास येऊ नये म्हणून!

कोण मध्यमवर्गीय, कोण श्रीमंत आणि कोण गरीब?   

  

(या लेखातील अनेक बेघरांची नावे बदललेली आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा