रविवार, ३० मार्च, २०१४

यू लाइक्ड इट?



पाठीवरची सॅक मागच्या सीट वर टाकावी म्हणून मी क्लीच्या गाडीचा दरवाजा उघडला तर मागच्या सीटवर एक पुस्तक पडले होते, यलो डस्ट.  ज्युडी पास्टरनॅकचे हे पुस्तक कुतूहल म्हणून मी चाळत तसाच उभा होतो. इतक्यात मागून क्ली आला. जवळपास पावणे सहा, सहा फुट उंचीचा हा इथल्या नवाहो जमातीतला तरुण कार्यकर्ता. काळेभोर लांब केस घट्ट मागे आवळून त्यांची नीट वेणी बांधलेली. 
, नाइस बूक इट इज, क्ली. आय  डोन्ट थिंक आय विल गेट धिस बूक इन इंडिया. आय थिंक आय शुड बाय सम बुक्स बिफोर गोइंग बॅक.
यू लाइक्ड धिस बूक?’
यय्स
देन टेक इट. 
नो, आय विल बाय वन.
नो नो, धिस इज ए स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी. माझ्या पाठीवर हात ठेवीत क्ली म्हणाला.
कदाचित मी वाटच पाहत होतो की काय या वाक्याची अशा लगबगीने ते पुस्तक मी सॅकमध्ये कोंबल आणि मग ओशाळल्या सारखं वाटलं.
थॅंक्स क्ली.
यॉर् वेल्कम.
.
ज्वारीच्या भाकरीचे मधोमध सरळ कापलेले दोन तुकडे बाजूबाजूला ठेवलेले आणि मधल्या फटीतून छोट्याश्या ठिपक्यासारखी चालणारी ती क्लीची गाडी. भाकरीवर कुठे कुठे करपलेले काळे डाग असल्यागत अॅरिझोनाच्या त्या पिवळ्या करपट वाळवंटात उगवलेली झुडपे. समोर तो न संपणारा रस्ता. मनावर ताण आणणारा हा सगळा माहोल. मी रस्त्यावरची नजर बाजूला काढावी म्हणून गाडीतल्या ड्रॉवरमधल्या छोट्या छोट्या वस्तु चाळीत होतो. काही गाण्याच्या सीडीज, कुठे एकद पेन, कसल्या तरी वनस्पतीची एक जुडी, एक प्लॅस्टिकची छोटी डबी असे काही काही हाताला लागत होते. सहज कुतूहल म्हणून मी ती डबी पाहिली तर तो एक छोटा बॅटरी टेस्टर होता.
व्हाट इज धिस क्ली?’ 
, इट्स ए बॅटरी टेस्टर, यू नो वी यूज बंच ऑफ डिफ्रंट बॅटरीज, सो आय कीप इट टु टेस्ट.
अरेच्च्या आपणही वेगवेगळ्या बॅटर्‍या वापरतोच की, पण कधी हे लक्षात आले नाही. एक टेस्टर घ्यायला हवा.
यू लाइक्ड इट?’
यय्स. इट्स नाइस.
देन कीप इट, इट्स ऑफ फ्यू बक्स, आय विल हॅव अनदर.
त्याच्या दृष्टीने हे फ्यू बक्स म्हणजे किती असावेत याचा नेमका अंदाज न आल्याने मी तो चार्जर होता तसाच ठेऊन दिला आणि पुन्हा त्या न संपणार्‍या रस्त्याकडे पाहू लागलो.  
.
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर  मध्ये मेगा बस मधून उतरलो तेव्हा सोसाट्याच्या वार्‍याबरोबर बर्फ पडत होता. एक मोठी बॅग आणि पाठीवरची सॅक सांभाळत रस्त्यात उभ राहणही कठीण होत त्यात मोबाइल फोनची बॅटरी डाउन. जिथे जायचं तिथला फोन नंबर, पत्ता सगळं त्या फोन मध्ये बंद. अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून तेव्हाच ठरवल एक बॅटरी चार्जर घेऊन ठेवायचा. क्लीला तसे मी एकदा बोललो होतो. ग्रँड कॅननहून फ्लागस्टाफला परतताना वाटेत क्लीने गाडी रेडियोशाकच्या दुकानाकडे वळवली.
व्हेर आर वि गोइंग क्ली?’
यू वॉन्ट टु परचेस ए बॅटरी चार्जर, राइट?’
बॅटरी चार्जर पाहता पाहता सहज बाजूला लटकणार्‍या एका बॅटरी टेस्टरकडे नजर गेली. अगदी क्लीचा होता तसाच. किंमत होती सहा डॉलर. मी चार्जर बरोबर बॅटरी टेस्टरही घेऊन टाकला. पैसे द्यायला काऊंटरवर गेलो, तिथे क्लीची नजर मी काऊंटरवर ठेवलेल्या चार्जरकडे गेली आणि त्याच्या चेहर्‍यावर नाराजीची एक रेषा उमटली.
.
मॉन्युमेंट व्हॅलीहून परतताना वाटेत क्लीने गाडी उजवीकडे वळवली. नवाहो जमातीच्या आदिवासींच्या कलाकृतींची दुकाने रस्त्याच्या बाजूला ओळीने उभी होती. मी त्यांच्या काही वस्तु खरेदी कराव्यात असे क्लीला वाटत असावे. मी उगाचच इकडे तिकडे फिरत होतो. वस्तु सगळ्याच चांगल्या होत्या. पॉटरी आणि दगडांचे दागिने तर सुंदर होते. पण किंमती सुद्धा तशाच होत्या. एका दागिण्याच्या काऊंटरवर क्ली मला दागिन्यांची माहिती देत होता.
. .  धिस ग्रीन स्टोन इज व्हेरी फेमस हीर. यू विल गेट इट हियर ओन्ली.
हाऊ यू नो ऑल दीज डिटेल्स, क्ली?’ 
आय टू मेक सच ओरनामेंट्स. 
ओ रिअली. देन ऑल दीज ओरनमेंट्स यू आर वेरिंग आर मेड बाय यू?’
नो, दीज एयरिंग्स आर गिवन बाय फादर अँड धिस ब्रेसलेट इज अ गिफ्ट फ्रॉम माय सिस्टर. हिरव्या रंगाचे तेच खडे जडवलेल्या हातातल्या रुंद कड्याकडे पाहत क्ली म्हणाला.
व्हाय डोन्ट यु वेर दि ओरनमेंट्स विच यु मेक?’
पीपल लाइक इट, अँड इन अवर ट्रायबल कल्चर व्हेन समवन लाइक इट वी गिफ्ट इट टु हिम. अँड आय मेक ओरनामेंट्स फॉर माय कलेक्शन. आय डोन्ट लाइक टु गिव इट टु समवन अँड सेमटाइम आय कांट डिसरिगार्ड  अवर कल्चर.
आता मला त्या बॅटरी प्रकरणात त्याला वाटलेल्या नाराजीचे कारण कळले.

                           *****