रविवार, ३० मार्च, २०१४

यू लाइक्ड इट?



पाठीवरची सॅक मागच्या सीट वर टाकावी म्हणून मी क्लीच्या गाडीचा दरवाजा उघडला तर मागच्या सीटवर एक पुस्तक पडले होते, यलो डस्ट.  ज्युडी पास्टरनॅकचे हे पुस्तक कुतूहल म्हणून मी चाळत तसाच उभा होतो. इतक्यात मागून क्ली आला. जवळपास पावणे सहा, सहा फुट उंचीचा हा इथल्या नवाहो जमातीतला तरुण कार्यकर्ता. काळेभोर लांब केस घट्ट मागे आवळून त्यांची नीट वेणी बांधलेली. 
, नाइस बूक इट इज, क्ली. आय  डोन्ट थिंक आय विल गेट धिस बूक इन इंडिया. आय थिंक आय शुड बाय सम बुक्स बिफोर गोइंग बॅक.
यू लाइक्ड धिस बूक?’
यय्स
देन टेक इट. 
नो, आय विल बाय वन.
नो नो, धिस इज ए स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी. माझ्या पाठीवर हात ठेवीत क्ली म्हणाला.
कदाचित मी वाटच पाहत होतो की काय या वाक्याची अशा लगबगीने ते पुस्तक मी सॅकमध्ये कोंबल आणि मग ओशाळल्या सारखं वाटलं.
थॅंक्स क्ली.
यॉर् वेल्कम.
.
ज्वारीच्या भाकरीचे मधोमध सरळ कापलेले दोन तुकडे बाजूबाजूला ठेवलेले आणि मधल्या फटीतून छोट्याश्या ठिपक्यासारखी चालणारी ती क्लीची गाडी. भाकरीवर कुठे कुठे करपलेले काळे डाग असल्यागत अॅरिझोनाच्या त्या पिवळ्या करपट वाळवंटात उगवलेली झुडपे. समोर तो न संपणारा रस्ता. मनावर ताण आणणारा हा सगळा माहोल. मी रस्त्यावरची नजर बाजूला काढावी म्हणून गाडीतल्या ड्रॉवरमधल्या छोट्या छोट्या वस्तु चाळीत होतो. काही गाण्याच्या सीडीज, कुठे एकद पेन, कसल्या तरी वनस्पतीची एक जुडी, एक प्लॅस्टिकची छोटी डबी असे काही काही हाताला लागत होते. सहज कुतूहल म्हणून मी ती डबी पाहिली तर तो एक छोटा बॅटरी टेस्टर होता.
व्हाट इज धिस क्ली?’ 
, इट्स ए बॅटरी टेस्टर, यू नो वी यूज बंच ऑफ डिफ्रंट बॅटरीज, सो आय कीप इट टु टेस्ट.
अरेच्च्या आपणही वेगवेगळ्या बॅटर्‍या वापरतोच की, पण कधी हे लक्षात आले नाही. एक टेस्टर घ्यायला हवा.
यू लाइक्ड इट?’
यय्स. इट्स नाइस.
देन कीप इट, इट्स ऑफ फ्यू बक्स, आय विल हॅव अनदर.
त्याच्या दृष्टीने हे फ्यू बक्स म्हणजे किती असावेत याचा नेमका अंदाज न आल्याने मी तो चार्जर होता तसाच ठेऊन दिला आणि पुन्हा त्या न संपणार्‍या रस्त्याकडे पाहू लागलो.  
.
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर  मध्ये मेगा बस मधून उतरलो तेव्हा सोसाट्याच्या वार्‍याबरोबर बर्फ पडत होता. एक मोठी बॅग आणि पाठीवरची सॅक सांभाळत रस्त्यात उभ राहणही कठीण होत त्यात मोबाइल फोनची बॅटरी डाउन. जिथे जायचं तिथला फोन नंबर, पत्ता सगळं त्या फोन मध्ये बंद. अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून तेव्हाच ठरवल एक बॅटरी चार्जर घेऊन ठेवायचा. क्लीला तसे मी एकदा बोललो होतो. ग्रँड कॅननहून फ्लागस्टाफला परतताना वाटेत क्लीने गाडी रेडियोशाकच्या दुकानाकडे वळवली.
व्हेर आर वि गोइंग क्ली?’
यू वॉन्ट टु परचेस ए बॅटरी चार्जर, राइट?’
बॅटरी चार्जर पाहता पाहता सहज बाजूला लटकणार्‍या एका बॅटरी टेस्टरकडे नजर गेली. अगदी क्लीचा होता तसाच. किंमत होती सहा डॉलर. मी चार्जर बरोबर बॅटरी टेस्टरही घेऊन टाकला. पैसे द्यायला काऊंटरवर गेलो, तिथे क्लीची नजर मी काऊंटरवर ठेवलेल्या चार्जरकडे गेली आणि त्याच्या चेहर्‍यावर नाराजीची एक रेषा उमटली.
.
मॉन्युमेंट व्हॅलीहून परतताना वाटेत क्लीने गाडी उजवीकडे वळवली. नवाहो जमातीच्या आदिवासींच्या कलाकृतींची दुकाने रस्त्याच्या बाजूला ओळीने उभी होती. मी त्यांच्या काही वस्तु खरेदी कराव्यात असे क्लीला वाटत असावे. मी उगाचच इकडे तिकडे फिरत होतो. वस्तु सगळ्याच चांगल्या होत्या. पॉटरी आणि दगडांचे दागिने तर सुंदर होते. पण किंमती सुद्धा तशाच होत्या. एका दागिण्याच्या काऊंटरवर क्ली मला दागिन्यांची माहिती देत होता.
. .  धिस ग्रीन स्टोन इज व्हेरी फेमस हीर. यू विल गेट इट हियर ओन्ली.
हाऊ यू नो ऑल दीज डिटेल्स, क्ली?’ 
आय टू मेक सच ओरनामेंट्स. 
ओ रिअली. देन ऑल दीज ओरनमेंट्स यू आर वेरिंग आर मेड बाय यू?’
नो, दीज एयरिंग्स आर गिवन बाय फादर अँड धिस ब्रेसलेट इज अ गिफ्ट फ्रॉम माय सिस्टर. हिरव्या रंगाचे तेच खडे जडवलेल्या हातातल्या रुंद कड्याकडे पाहत क्ली म्हणाला.
व्हाय डोन्ट यु वेर दि ओरनमेंट्स विच यु मेक?’
पीपल लाइक इट, अँड इन अवर ट्रायबल कल्चर व्हेन समवन लाइक इट वी गिफ्ट इट टु हिम. अँड आय मेक ओरनामेंट्स फॉर माय कलेक्शन. आय डोन्ट लाइक टु गिव इट टु समवन अँड सेमटाइम आय कांट डिसरिगार्ड  अवर कल्चर.
आता मला त्या बॅटरी प्रकरणात त्याला वाटलेल्या नाराजीचे कारण कळले.

                           *****

मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

इयत्ता सातवीतला धडा



इयत्ता सातवीतला धडा

                इयत्ता सातवीत असताना मराठीच्या पुस्तकात आम्हाला डॉ. होमी भाभांवर एक धडा होता. त्या धड्याच्या पाहिल्या पानावर मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रातील सायरस अणुभट्टीचे चित्र होते. धडा कुणी लिहिला होता ते आता आठवत नाही पण माझ्यासारख्या विज्ञानाची आवड असणार्‍या विद्यार्थ्याला स्फूर्ति देणारा तो धडा होता हे मात्र नक्की. डॉ. भाभांचे चरित्र, त्यांचे कार्य, त्यांची संशोधक वृत्ती हे सगळे फार प्रेरित करणारे होते. त्याकाळी एक स्वप्न सतत समोर असे की पुढे जाऊन संशोधक व्हायचे. पुढे शाळा सुटली आणि करियर निवडायची वेळ आली तरी ते स्वप्न डोळ्यातून जाईना. आता फक्त त्यात थोडासा व्यावहारिक बदल झाला होता. तो म्हणजे मूलभूत विज्ञान शाखेकडे न जाता अभियंता बनण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यातही मेकॅनिकल शाखेतच अभियंता व्हायचे हा अट्टहास.

          बारावीचा निकाल लागला होता आणि वर्तमानपत्रात भाभा अणु संशोधन केंद्रात तांत्रिक कर्मचार्‍यांच्या भरतीची जाहिरात आली होती. पुन्हा तो सातवीतला धडा आठवला. ती अणुभट्टी. भाभांचे चरित्र, त्यांचे कार्य वगैरे. अर्ज केला. मुलाखतीला बोलावण आल. मुलाखत दिली. पहिलाच नोकरीचा अर्ज, पहिलीच मुलाखत आणि नोकरीचे नियुक्ती पत्र हातात. आता प्रश्न होता इंजिनीअर व्हायचे की बीएआरसी मध्ये नोकरी करायची? शेवटी सातवीतला तो धडा सरस ठरला. प्रत्यक्ष अणुभट्टीच्या आवारात रोजचे आठ तास, हे एक मोठेच आमिष होते. मग कुणीतरी सुचवलं तिथे नोकरी करता करता इंजिनीअर होता येत. मग नोकरी आणि शिक्षण असा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. कामाचे तास संपले की बीएआरसीच्या लायब्ररीत जाऊन अभ्यासाला बसायचे. पाठीशी सायरस आणि ध्रुव ही अणुभट्ट्यांची जोडी असायची. ती सतत स्फूर्ति द्यायची. आता थोडेच दिवस आणि मग स्वप्नपूर्ती !
          
अभियंता होऊन नोकरीत बढती मिळाली. वैज्ञानिक अधिकारी झालो. मात्र तो पर्यन्त जे काही अनुभवले त्याने संशोधक होण्याचे अवसान गळून गेले होते. पूर्वी अज्ञानात सुख होते. आता सुटका हवी होती. सातवीतला तो धडा सतत आठवायचा प्रयत्न करीत होतो. समाजाच्या, मानवाच्या हिताचे काही त्यात होते. पण इथे तर काही वेगळेच घडत होते. इथे काम करणार्‍यांच्या जे हिताचे नाही ते सर्व समाजाच्या हिताचे कसे ठरू शकेल?

          आज बीएआरसी सोडून अठरा वर्षे झाली. बीएआरसी सोडताना कल्पकम अणु प्रकल्प सुरू झाला होता आणि जैतापूरचे नाव क्वचित कुठेतरी ऐकले होते. बीएआरसी सोडल्यानंतर मधल्या काळात अणु प्रकल्प, त्यातले अनुभव, समस्या, धोके हे सगळे मागे पडले. मागील पंधरा सोळा वर्षे पर्यावरण शिक्षण क्षेत्रात काम करताना काही वर्षांपूर्वी श्रीहरीकोट्याला इस्रो मध्ये जाण्याचा प्रसंग आला आणि बीएआरसीची आठवण झाली. दोन्हीकडे सारखेच वातावरण. इमारती सारख्या, अगदी त्यांचे रंग सुद्धा सारखेच. नाही म्हटले तरी बीएआरसीतला तो बारा वर्षांचा काळ अनेक आठवणी ठेवून गेला. अनेक मित्र बीएआरसीने दिले. आजही त्यांच्याशी ऋणांनुबंध कायम आहेत. बीएआरसीत असताना लग्न झाले, मुलीचा जन्म बीएआरसी इस्पितळात झाला. तरीही बीएआरसी सोडण्याचा निर्णय ठामपणे घ्यावा लागला. 

          साधारण तीन वर्षापूर्वी जैतापूरात अणु प्रकल्पाची जन सुनावणी असल्याचे कळले. जैतापूर म्हणजे माझ्या कोकणातील गावापासून जेमतेम पन्नास साठ किलोमीटर अंतरावरचे गाव. जनसुनावणीच्या वेळी प्रकल्पग्रस्त माडबन गावात गेलो होतो. चार दिवस राहून आजूबाजूच्या आठ दहा गावात फिरलो. या चार दिवसात जैतापूर अणु प्रकल्पाचा पर्यावरणीय प्रकल्प अहवाल वाचला आणि चक्रावून गेलो. आता बारा वर्षे अणु संशोधन केंद्रातला अनुभव आणि पुढे पंधरा वर्षे पर्यावरण शिक्षण क्षेत्रातले काम अशी दुहेरी पार्श्वभूमी होती. त्यातून प्रकल्प अहवालाचा अभ्यास करताना जे काही समोर आले ते वर्तमानपत्रातून मांडत गेलो. जिथे संधि मिळाली तिथे बोलत गेलो. त्याच वेळी जैतापूरात अणु प्रकल्पाच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहत होते. अनेक लोक तुरुंगात गेले. गोळीबार झाला. एक आंदोलक बळी गेला. अनेक जखमी झाले. भारतात सहा अणु प्रकल्प उभे राहिले पण कुठे टाचणी पडल्याचाही आवाज झाला नव्हता. भारतात अणु प्रकल्पाच्या विरोधात जैतापुरात पहिला आवाज उठला. भारतीय अणु विरोधी चळवळीचा जन्म जैतापूरात झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्या दृष्टीने जैतापूरचे आंदोलन हे एक ऐतिहासिक आंदोलन ठरते.

          अठरा वर्षापूर्वी बीएआरसी सोडताना जे विचार मनात होते ते उघडपणे मांडण्याची आता संधि होती किंबहुना हीच ती वेळ होती. वर्तमानपत्रातल्या लेखांनी समाधान होत नव्हते. परंतु पूर्ण पुस्तक या विषयावर लिहावे असे काही मनात नव्हते आणि तितका वेळही नव्हता. पुन्हा लिहिले तर छापणार कोण हा ही प्रश्न होताच, कारण सरकारच्या धोरणाच्या विरोधात जाऊन आंदोलनाला पूरक ठरणारे लिखाण कोण छापणार? पण पुढे अशा काही घटना घडल्या, ज्या ह्या पुस्तकात पुढे आल्या आहेत आणि पुस्तक लिहायचे ठरले. जैतापूर अणु प्रकल्प हे जरी कारण होते तरी केवळ एका अणु प्रकल्पाच्या विरोधात नव्हे तर एकंदरीत संपूर्ण अणु प्रक्रियाच कशी विघातक आहे आणि आपल्या सारख्या देशाने त्याचा कितपत, कुठे आणि कसा वापर करावा किंवा करू नये यावर चर्चा करणे हे या पुस्तकाचे उद्दीष्ट मी माझ्या पुरते ठरवून घेतले होते. काही बंधने घालून घेतली होती. त्यातले मुख्य बंधन होते लिहीलेल्या प्रत्येक महत्वाच्या विधानांचा पुरावा देण्याचे. तो पुरावा देण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला आहे. दुसरे महत्वाचे बंधन होते ते म्हणजे कुठेही वाचकाच्या भावनेला हात घालायचा नाही, भावनिक आवाहन करायचे नाही. माझ्या वैयक्तिक भावना मी पुस्तकाच्या अपर्णपत्रिकेतच मांडून संपवल्या आहेत. त्यामुळे अणु अपघात, त्यात मेलेल्या माणसांची आकडेवारी, अणु प्रकल्पामुळे बाधित लहान मुलांची, माणसांची छायाचित्रे या गोष्टींना या पुस्तकात पूर्ण फाटा दिला आहे. याचा अर्थ तसे काही होत नाही असा नाही. अणु प्रकल्पामुळे होणार्‍या परिणामांची शास्त्रोक्त मांडणी करण्याचा माझ्याकडून जमेल तेवढा प्रयत्न मी केला आहे. तरीही हे पुस्तक म्हणजे एखादा वैज्ञानिक अभिलेख नव्हे. सर्वसामान्यांना, ज्यांच्या पैशातून हे प्रचंड अणु संशोधन चालते आणि ज्यांनी निवडून दिलेले सरकार अणु विषयक धोरणे ठरवते, त्या सामान्यातल्या सामान्य माणसाला या देशात अणु ऊर्जा हवी की नको हे किमान त्याच्यापुरते तरी ठरविण्यास या पुस्तकाची मदत व्हावी या उद्देशाने या पुस्तकाची मांडणी केली आहे. ती काहींना एकांगी वाटेल, थोड्या वरच्या वर्गातील, शास्त्रीय पार्श्वभूमी असलेल्या एकादयास ती बाळबोध वाटेल पण त्यास इलाज नाही. 

          आधी म्हटल्याप्रमाणे असे हे पुस्तक कोण छापणार हा प्रश्न तरीही होताच. मात्र सुगावा प्रकाशनाच्या प्रा. विलास वाघ आणि उषाताई वाघ यांनी तो प्रश्न सोडवला. इतर काही पुस्तकांच्या प्रकाशनाचे काम सुरू असताना या विषयाची निकड लक्षात घेऊन त्यांनी या पुस्तकाला प्राधान्य दिले या बद्दल मी त्यांचा ऋणी आहे. श्री. पन्नालाल सुरान्ना आणि माधवराव गाडगीळांसारख्या ऋषितुल्य व्यक्तींनी या पुस्तकाला प्रस्तावना आणि प्रतिक्रिया लिहून दिली. त्या दोघांनाही माझे विनम्र दंडवत.

          शास्त्रीय विषयावरील पुस्तकाचे टाइप सेटिंग करणे हे फार किचकट काम असते. मात्र श्री.विनय दिक्षित यांनी ते अतिशय सुबकपणे अत्यंत कमी वेळात करून दिले त्या बद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. कधी काळी आपण पुस्तक लिहिले तर त्याचे मुखपृष्ठ षान्ताराम पवारांनी करावे अशी फार पूर्वी पासूनची इच्छा होती. जीवघेण्या आजारातून उठलेल्या पवारांनी शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करून अत्यंत अर्थपूर्ण मुखपृष्ठ करून दिले. या सगळ्या प्रक्रियेत ते एक सहृद झाले. त्यांचे आभार मानणे आता अवघड आहे.

          अणु ऊर्जेची दुसरी बाजू मांडणारे मराठीतील बहुदा हे पहिलेच पुस्तक असावे. कितीही काळजी घेतली तरी काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या त्रुटींसह मराठी वाचक हे पुस्तक स्वीकारतील आणि त्यांचे म्हणणे सुद्धा इतक्याच खुलेपणाने मांडतील असे वाटते. या पुस्तकामुळे या विषयावर चर्चा होईल आणि त्यातून या देशातल्या, किमान या राज्यातल्या लोकांच्या हिताचे काही घडेल अशी आशा आहे.