बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

ख्वाडा - एक समृद्ध अडथळा


नेहमीचा चष्मा लावून हा चित्रपट बघु नका, वेगळा चष्मा लावा.
फ्यांड्री, कोर्ट आणि आता ख्वाडा.
कुठे मिळतात हे चष्मे? कुठल्या दुकानात?
खरेतर ख्वाडा पाहिल्यावर त्यावर काही लिहावे असे वाटले नाही. पण चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड आहे, ऑडिओग्राफी, कॉस्च्युम आणि रंगभूषेचही अवॉर्ड आहेत. चित्रपटाच्या सुरूवातीला अनेक दिग्गजांच्या नावाची मांदियाळी आहे, म्हणजे त्यांना हा चित्रपट मान्यच नाही तर त्यांची यात काही ना काही इनवोल्व्हमेंट असावी. म्हणून तरी लिहावं असं आतून वाटत होतं. म्हणून मग पुन्हा पहिला. दोन्ही वेळेला साधा चष्मा लावूनच पहिला. वाटलं होतं दुसर्‍यांदा तरी काही वेगळं दिसेल, पण नाहीच दिसलं काही.

पहिल्यांदा मुलुंड मध्ये आर मॉल मध्ये पहिला आणि नंतर दादरला प्लाझामध्ये. चित्रपटाचे डोल्बी किंवा सराउंड साऊंड फारस चांगलं नाही.  मला वाटलं होतं आर मॉलच्या साऊंड सिस्टमचा हा दोष असेल पण प्लाझा मध्येही साऊंड तसाच वाजला. खास करून मागून येणारा आवाज अत्यंत अनैसर्गिक वाटतो. चित्रपटाला ऑडिओग्राफी या विभागासाठी राज्य पुरस्कार आहे. दूसरा राज्य पुरस्कार आहे कपडेपट किंवा कॉश्च्युम साठी. मराठी चित्रपटात कपडेपट हा अत्यंत दुर्लक्षित विभाग. चित्रपट जेव्हा ब्लॅक अँड व्हाइट होते तेव्हा ठराविक काळ दाखवण्यापूरता फार तर कपडेपटाचा वापर होत असे. परंतु चित्रपटाने रंग धारण केल्यावर कपडेपटातून वातावरण निर्मिती करता येऊ लागली, मूड जपता येऊ लागले, परंतु काही अपवाद वगळता मेन स्ट्रिम मराठी सिनेमात अजून ही जाणीव यायची आहे. ख्वाडा त्याला अपवाद नाही.

माझ काळीज लागलं नाचू न गाणं वाजू द्या. हे गाणं खरेतर आयटम सॉन्ग आहे. चित्रपटाच्या कथानकात त्याचा काही उपयोग नाही पण गाणं म्हणून वेगळं पहिलं तर डॉ. विनायक पवारांनी ते छान लिहिलय. पारंपारिक लग्नगीताच्या ढंगाने रोहित नागभिडेंनी ते संगीतबद्धही चांगलं केलय. संगीताशिवायची धनगरगीते अतिशय परिणामकारक झाली आहेत. पार्श्वसंगीत अगदीच मोजकं आहे, कळेल न कळेल असं. सिनेमटोग्राफीत अनेक ढोबळ चुका आहेत, पण निर्माता दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट असल्याने हे सगळं माफ आहे.

सिनेमा सुरू होतो तो धनगरांच्या एका तांड्यापासून आणि थोड्याच वेळात लक्षात येत सिनेमा एका गावकुसा बाहेरच्या भटक्या जमातीच्या जीवनाबद्दल काही बोलतो आहे. रस्त्यावरून जाणारा एक इसम रघु धनगराच्या धाकट्या मुलाच्या, बाळूच्या लग्नाची चौकशी करतो आणि इथून सुरू होतो बाळूच्या लग्नाचा व्हिडिओ. मुलगी बघितली जाते मुलगी पसंद पडते पुढची बोलणी होतात आणि हळदही लागते. बाळू हा रघु धनगराच्या कुटुंबात न शोभणारा पैलवान गडी. आजूबाजूला दुष्काळाची परिस्थिति. सतत एक करडी, शुष्क पार्श्वभूमी. त्या पार्श्वभूमीवर वाहणारी निळीशार नदी. ती जितकी विसंगत वाटते तितकीच बाळूची शरीरयष्टी त्या कुटुंबात विसंगत वाटते. पण असे असू शकते असे मानून आपण चित्रपटात पुढे सरकतो आणि पुढे विकसित होत जाते बाळूचे व्यक्तिमत्व. बाळू हा चित्रपटाचा नायक आहे. लेखकाला त्याच्या हातून काही गोष्टी पुढे करून घ्यायच्या आहेत. त्याचे व्यक्तिमत्व हा चित्रपटाच्या कथानकाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात बाळू हा रंगेल आणि स्वप्नाळू गडी म्हणून समोर येतो. रघु धनगर, बाळूचा बाप हा एक तापट डोक्याचा म्हातारा, पण अनुभवी धनगर आहे. शेळ्या मेंढ्यांची त्याला नीट पारख आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या विषयी जिव्हाळा आहेच पण धनगरांच्या परिभाषेत त्या त्याच्या संपत्तिचे परिमाण आहेत. तो व्याहयाची संपत्तिसुद्धा पारंपारिक पद्धतीने शेळ्यामेंढ्यांमध्येच मोजतो. चित्रपटातले हे एकमेव पात्र जे लेखकाने पुरेश्या ताकदीने लिहिलं आहे आणि शशांक शेंडेंनी तितक्याच ताकदीने ते उभे केले आहे. धनगरी हेल, शिव्या, देहबोली, व्यवहारी खाचाखोचा हे सगळं शेंडेंनी पुरेश्या मेहनतीने साकारलं आहे. रघुच्या कुटुंबातली बाळू खेरीज दुसरी दोन महत्वाची पात्रे बाळूची आई आणि बाळूचा भाऊ, पांड्या. प्रशांत इंगळेच्या अंडरप्ले अभिनयाने वडलांच्या धाकाने दबलेला पांड्या पुरेपूर उभा केलाय. तो करीत काहीच नाही पण अनेक प्रसंगातील त्याच अस्तित्वच खूप बोलक वाटत. माझं सासार हलकट होत, आता बघूया ना हे किती कमरेच सोडून देतात ते. असं एखादच वाक्य इंगळे सहजतेने म्हणून जातात पण त्या प्रसंगात जान येते. दूसरा उल्लेख करायला हवाच तो बाळूच्या आईची भूमिका करणार्‍या सुरेखाचा. राग, प्रेम, अगदी नवर्‍याला शिव्या देतानाही ती आपण एक पायरी खाली आहोत हे भान ठेऊन ती व्यक्त होते, पण ती बोलते. अभिनयाबाबत बोलताना एका छोट्याश्या बाबीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शेवटच्या प्रसंगात बानु, वैष्णवी ढोरेने जो एक लुक दिला आहे तो अप्रतिम आहे. त्या एका लुक मध्ये नेमकं काय घडलय याची पुरती जाणीव ती करून देते. चित्रपटात तिच्या वाट्याला संवाद जवळ जवळ नाहीच आहेत. केवळ मुद्राभिनयावर या मुलीने आख्खी बानु उभी केलीय. पण शेवटचा लुक अप्रतिम. एकंदरीत चित्रपट लेखनात संवादाची बाजू उत्तम आहे. खास धनगरी बोलीभाषेतील मिश्किल पण खोचक संवाद प्रसंगाला उठाव आणतात, प्रेक्षकांची दादही मिळवतात. पण केवळ संवादावर चित्रपट कितीसा तरणार? पहिल्या वीस मिनिटात पटकथा ढेपाळत जाते. एकतर अनेक पात्रातले एकमेकातले आणि स्थावर गोष्टीतले परस्पर नातेसंम्बंध नीट अधोरेखित होत नाहीत. धनगरांच्या जीवनातले वेगळेपण ठसठशीतपाने समोर येत नाही. त्यांच्या लग्नातील प्रथा या जवळपास बहुजन समाजासारख्याच आहेत. वेगवेगळ्या धनगर कुटुंबातील किंवा समाजातील नातेसंबंध सुद्धा नीटपणे उभे राहत नाहीत, त्यामुळेच शेवटच्या प्रसंगात बाळूने भीमाच्या तांड्याची मदत मागणे आणि त्यांनी ती त्या पातळीवर जाऊन देणं हे अगदीच अवास्तव वाटतं.    

रघुची जमीन फॉरेस्ट मध्ये गेलीय हे फक्त एका संवादात येते. रघु गेली दहा वर्षे कोर्टाच्या खेपा मारतोय हे दुसर्‍या एका छोट्याश्या प्रसंगात येते. पांड्या बापाच्या वतीने एक नवीन जमिनीचा तुकडा विकत घेण्यासाठी जमीन पाहतो हा तिसरा एक प्रसंग. या तीनही प्रसंगातून जमिनीबाबतची या तीनही पात्रांची किंवा एकंदरीत या कुटुंबाची मानसिक गुंतवणूक पुरेश्या ताकदीने पुढे येत नाही आणि इथेच सगळी गफलत होते. खरे तर हे सगळं करण्यासाठी लेखकाच्या हातात पुरेसा वेळ होता तो सगळा त्याने बाळूच्या न झालेल्या लग्नावर खर्च केला आणि पुढे अनेक प्रश्नचिन्हे उभी केली. ज्या जमिनीत पुरेशी मानसिक गुंतवणूक नाही ती जमीन व्याहयाने घेतली म्हणून बाळूचे लग्न रघु का मोडतो? हा त्याचा तापट विचित्र स्वभाव आहे हे गृहीत धरलं तरी ज्या मुलीमध्ये बाळूची पुरेपूर मानसिक गुंतवणूक झालेली आहे तिच्याशी मोडलेल्या लग्नापायी बाळू बंडखोरी करून बापच घर सोडत नाही मात्र जमीन विकली गेली म्हणून, ज्या जमिनीत बाळूची काडीची मानसिक गुंतवणूक नाही त्या जमीनीसाठी बाळू बापाशी भांडून घर का सोडतो? मुळात हे जमीन आणि लग्न प्रकरण एकंदरीत पुढे येऊ घातलेल्या मुख्य प्रसंगाशी किती संबंधित आहे? बाळूच लग्न आधीच झालेलं असतं आणि जमीन हे प्रकरणच नसतं तर कथेच्या क्लायमॅक्स मध्ये काय फरक पडला असता? किंवा एकंदरीतच सिनेमाला जे सांगायचय त्यात काय फरक पडला असता? असे अनेक प्रश्न पटकथा उभे करते आणि चित्रपट सरपटत जातो.

बाळू आणि सरपंच अशोक यांच्यातला खरा संघर्ष सुरू होतो एका कुस्तीच्या फडातून. बापाशी भांडून बाहेर पडलेला बाळू बापाच्या मेंढरांचे पैसे मागायला अशोककडे येतो इथे संघर्षाची दुसरी ठिणगी पडते. याही प्रसंगी बाळू सरस ठरतो. त्याचे सरस ठरणे तरीही नैसर्गिक वाटते, यात कुठे हिरोइझम जाणवत नाही. पण अशोकशी पंगा घेतल्यावर बाळूचे बापाकडे धावत परत येणं मात्र त्याच्या बंडखोरीला सुसंगत वाटत नाही. मुळात या बंडखोरीचा पायाच निसरडा असल्याने हे सगळच मग लिबलिबीत वाटू लागत.  बापाची बळजबरीने नेलेली मेंढर सोडवायला लेखक बाळूला जो मार्ग दाखवतो त्या मार्गावरून जाण्याइतका बाळू कणखर वाटत नाही तो यामुळेच. तो सतत एक गुलछबू, रंगेल पैलवान गडीचं वाटत राहतो, याला कारण पहिल्या निम्म्या भागात दळलेल लग्नाचं दळण.

खरेतर चित्रपट जो संघर्ष दाखवू पाहतो आहे, तो आहे गावकूसाबाहेरील जगणं जगणार्‍या, ‘रोज दुसर्‍याच्या बांधावर जाव लागणार्‍या एका भटक्या संस्कृतीचा गाव ह्या एका बलाढ्य संस्थेशी, एका व्यवस्थेशी. पण ज्या तपशिलाने गावकूसाबाहेरच्या रघु धनगराच्या कुटुंबाच वर्णन चित्रपटात दिसतं त्याच्या शतांश भागानेही चित्रपटात गाव दिसत नाही. चित्रपटातला खरा खलनायक ही परिस्थिति आहे, ही व्यवस्था खलनायक आहे. सरपंच अशोकदादा  हा केवळ त्या व्यवस्थेचा एक प्रतिनिधी आहे. अशोकची व्यक्तीगत व्यक्तिरेखा दमदार असली आणि अनिल नगरकरांनी ती आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्वाने उत्तम केली असली तरी, व्यवस्था किंवा व्यवस्थेच रूप म्हणून अशोकदादा समोर येतो का? पहिल्यांदा अशोक येतो तो एका मोटार सायकल वरून आणि दुसर्‍यांदा एका जुनाट खटारा जीप मधून. खरे तर ह्या व्यवस्थेला एक चकचकीत रूप आहे, तिचा रुबाब आहे, तिचा भन्नाट वेग आहे. पण अशोकच्या मोटर सायकल आणि जीप पेक्षा बाळूचा घोडा अधिक उमदा वाटतो, अधिक वेगवान वाटतो. सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या फ्रेम मध्ये प्रथम दिसतो तो घोडा. बाळू लग्नानंतर जेजूरीला जातो. जेजूरीचा खंडोबा हे धनगरांचे श्रद्धास्थान. खंडोबा हे शक्तिच प्रतीक. त्याचं वाहन घोडा, त्याची ती अजस्त्र शस्त्रे या सगळ्याचा संबंध शेवटच्या प्रसंगाशी दिग्दर्शकाला लावता आला असता. पण जेजूरी आणि पुढे कुठल्यातरी एका जत्रेत काही रिळ निव्वळ दर्शनीय या एकाच कारणासाठी फुकट घालवली गेली आणि लक्षात राहील ते बाळूने बायकोला उचलून जेजूरीच्या पायर्‍या चढण.

मुळात हा संघर्ष एक भ्रष्ट व्यवस्था विरुद्ध संस्कृती असा उभाच राहत नसल्याने मग तो उरतो फक्त बाळू आणि अशोक या दोन व्यक्तिमधला संघर्ष आणि मग प्रश्न उभा राहतो चित्रपटात खलनायक म्हणून अशोकची जी काही व्यक्तीगत कृत्ये आहेत ती इतकी मोठी शिक्षा देण्याजोगी आहेत का? गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्रात, ज्या ठिकाणी हा चित्रपट घडला त्याच भागात वास्तवात ज्या घटना घडल्या त्या अत्यंत भयानक आहेत. त्या घटनांचा वेध घेता असे लक्षात येईल की आजच्या 'अशोकदादा'ची मग्रुरी ही केवळ पूर्वीच्या गावागाड्याच्या संस्कृतीतून आलेली नाही तर तिला आजची राजकीय पार्श्वभूमी आहे. अशोक हा आजच्या काही ठराविक राजकीय पक्षांचा प्रतिंनिधी आहे. चित्रपटातल्या  शिक्षापर्वा नंतर ज्या पद्धतीने बाळू आणि त्याच्या साथीदारांना चोर, लुटेरु ठरवलं जातं. हे ठरवण्याची एक प्रोसेस आहे, जी तद्दन राजकीय आहे. परंतु चित्रपटात हा भाग केवळ काही वर्तमानपत्रातील हेडलाइन मधून येतो आणि प्रकरण संपून जाते. दिग्दर्शकाला चित्रपटात राजकीय भूमिकाच घ्यायची नाहीय. हे असं का घडतय याच्या खोलात जायचं नाहीय. त्याला निव्वळ एक कथा सांगायची आहे. सुष्ट आणि दुष्ट यांच्यातला संघर्ष आणि दुष्टाचा पराभव, सुष्टाचा जय, जी कथा महाभारतासारखा  ग्रंथ ते काल परवाचा मराठी हिन्दी मसाला सिनेमा सांगत आला. तीच कथा.  

सरते शेवटी प्रश्न उरतो चित्रपट काय देतो?
सत्तरच्या दशकात याच कथेवर अनेक मराठी चित्रपट येऊन गेले. अगदी लाटच आली होती. फक्त तिथे सरपंचाऐवजी पाटील असे आणि धनगरांच्या जागी बहुत करून तमासगीर असत. परंतु त्याही काळी अनेकदा आडवळणाने का होईना पण राजकीय भूमिका घेतली जात असे. सामना हे अलीकडील एक उदाहरण. पश्चिम महाराष्ट्रातील बलाढ्य द्राक्ष लॉबी जी कॉंग्रेस संस्कृतीचा भाग होती त्याचे जब्बार पटेलांनी सामनात उघड दर्शन घडवले होते आणि आज उभ्या महाराष्ट्रात आणि देशातही या व्यवस्थेच्या पायी अनेक संस्कृत्या, जीवंत माणसे जात आणि धर्माच्या नावाखाली चिरडली जात असताना राजकीय भूमिका घ्यायचीच नाही आणि केवळ गोष्टी सांगत सरकारी पुरस्कार मिळवायचे ते कशाला? 
पुन्हा कधी काळी सरकारचा निषेध करून परत करायला?  
  
असो, चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले, ही जमेची बाजू आहे. चित्रपट चांगला धंदाही करतो, आहे हे ही चांगलच आहे. मात्र मराठी प्रेक्षकांची अभिरुचि हा चित्रपट बदलू शकतो का?
माझ्या पुरतं तरी याच उत्तर नाही असच आहे. 

                             *****