रविवार, २२ डिसेंबर, २०१३

समाज घडवणार्‍या इमारती आणि इमारती पाडणारा समाज



हेरिटेज की हॅरॅसमेंट  हा संदीप आचार्य यांचा लेख  दि. ८ डिसेंबर रोजीच्या लोकसत्तेत प्रसिद्ध झाला होता. या लेखाला दिलेले उत्तर लोकसत्तेने अद्याप प्रसिद्ध न केल्याने इथे प्रसिद्ध करीत आहे. 

रिचर्ड निकेल या अमेरिकन इतिहासकाराने एके ठिकाणी म्हटले आहे, महान वास्तूंना दोनच नैसर्गिक शत्रू असतात, एक म्हणजे पाणी आणि दूसरा मूर्ख माणसे.

                        रविवार दि. ८ डिसेंबरच्या लोकसत्तेत प्रसिद्ध झालेल्या हेरिटेज की हॅरॅसमेंट या लेखात कुणी बीडीडी चाळीतला तरुण बीडीडी चाळीत सार्वजनिक संडास असल्याबद्धल संताप व्यक्त करतो, त्यामुळे त्याच लग्न अडलय, पण बीडीडी चाळी बांधल्यापासून तिथे सार्वजनिक संडासच होते मग आता पर्यन्त बीडीडी चाळीत लग्नचं झाली नाहीत की काय? आणि संडास दुरुस्त करायला हेरिटेजचा अडथळा आहे काय? बीडीडी चाळीत राहणार्‍यांना संडास दुरुस्त करता येत नाहीत मात्र आपल्या खोल्या वाढविण्यासाठी खिडक्यांना लोखंडी जाळयांचे पिंजरे लावून सगळ्या बीडीडी चाळीचे मानव संग्रहालय मात्र करता येतं ! या बीडीडी चाळीतल्या अनेकांनी विरार, वांगणी कडे एक दोन फ्लॅट घेऊन ठेवलेले आहेत, तरीही बीडीडी चाळीतली खोली ते सोडायला तयार नाहीत कारण त्यांना समोर टॉवर दिसतो आहे. त्यामुळे त्या दहा बाय बाराच्या खोलीचे आपण मालकच असल्याच्या थाटात ते आपली कैफियत मांडून सहानुभूती मिळवताहेत. 

                        हेरिटेज यादीतल्या इमारती ह्या जुन्याच असणार हे काही वेगळं सांगायला नकोय. पण इमारत जुनी असली तरी ती मोडकळीला आली ती वर्षानुवर्षे तिची डागडुजी न केल्यामुळे आणि अशी डागडुजी आणि रंगकाम सातत्याने करायला हवे आणि ती जबाबदारी त्या इमारतीत राहणार्‍यांची किंवा मालकाची आहे, असे मुंबईचा प्रांतिक अधिनियम सांगतो. त्यामुळे हेरिटेज इमारतीच्या डागडुजीवर खर्च कुणी करायचा याचे वेगळे उत्तर द्यायची गरज नाही. आधी इमारत मोडकळीस आणायची आणि मग एफएसआय वाढवून घ्यायचा हीच जुनी खेळी हेरिटेज इमारतींतही खेळली जातेय आणि त्याला आधार दिला जातोय तो पुन:र्विकासाच्या हक्काचा. पण हा हक्क सांगताना किमान वास्तु वारसा असलेल्या घरमालकांनी डागडुजीची जबाबदारी आता पर्यन्त का पार पाडली नाही, याचे काय उत्तर आहे त्यांच्याकडे? हेरिटेजच्या निकषाबद्दल मतभेद असू शकतात पण हेरिटेज नकोच ही भूमिका हा समाज कसा घेऊ शकतो?

                        मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुंबईचा चटई क्षेत्र निर्देशांक निश्चित करायला हवा असा एक नावाच शोध या लेखाच्या लेखकाने लावला आहे. मुळात मुंबईची लोकसंख्या वाढली म्हणजे तेव्हाच्या मूळ मुंबईतल्या लोकांना अचानक जास्त मुले होऊ लागली की काय? बाहेरून येणारे लोंढे इथले सरकार आणि सरकार चालविणारे राजकरणी रोखू शकले नाहीत हे सत्य सगळ्यांना ठाऊक आहे. त्याचा भार एफएसआय वर कशासाठी? चटई क्षेत्र निर्देशांक हा लोकसंखेवर नाही तर उपलब्ध स्रोतांवर अवलंबून असायला हवा. लोकसंखेनुसार एफएसआय वाढवत नेला तर या शहरात अराजक माजेल. वास्तु वारश्यात अनेकदा केवळ एक इमारत नाही तर आसपासचा संपूर्ण भाग येऊ शकतो. पण म्हणून आख्ख्या मुंबईच्या लोकसंखेचा भार खोताची वाडी किंवा मरीन ड्राइववर कसा टाकता येईल?

                        या जुन्या इमारती आता पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्यांचा पुन:र्विकास हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे असा दूसरा एक शोध या लेखकाने परस्पर लावून टाकला आहे. हेरिटेज कोंझरवेशन बाबतची काहीही माहिती न घेता हे सगळे लेखकाच्या मनाचे मांडे बिनतोड असल्यासारखे लोकांच्या गळी उतरवले जात आहेत. संपूर्ण जगात असा आचरटपणा कुणी केला नाही . . असे पालिकेचा कुणी अधिकारी म्हणाला असे लेखक म्हणतो. या अधिकार्‍याचे जग किती मोठे आहे हे माहीत नाही पण इथे एक उदाहरण द्यावेसे वाटते, जर्मनीतल्या फ्रॅंकफर्ट शहराजवळचे विसबादेन नावाचे एक मोठे शहर महायुद्धातल्या बॉम्बवर्षावातून आश्चर्यकारकरित्या वाचले होते. आजही त्या शहरातल्या बहुतेक सगळ्या इमारती महायुद्धापूर्वीच्या आहेत. पाच सात मजल्याच्या या इमारतींना लिफ्ट नाही, पार्किंगची सोय नाही. शहरातल्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजू पार्किंगने सदैव भरलेल्या असतात. लोक पाच सहा मजले रोज जिन्याने चढ उतर करतात. परंतु तिथे विकास – पुन:र्विकास असल्या फुटकळ कल्पना नाहीत. सगळ्या इमारती काल परवाच बांधल्या सारख्या नव्या आहेत. हा आचरटपणा आहे का? कुणा एका मराठी बिल्डरची हृदय हेलावून टाकणारी करुण कथा ऐकवून लेखक वाचकांच्या हृदयाला हात घालतो पण ती इमारत सीआरझेड मध्ये येत होती, ती इमारत हेरिटेज होती हे त्या बिल्डरला माहीत नव्हते काय? किंबहुना म्हणूनच त्याने पावला पावला वर दक्षिणा दिली होती ना? आणि हे सगळं कशासाठी? तर पुन:र्विकास करून अफाट पैसा मिळवण्यासाठीच ना? पण आता आयुक्तांनीच आदेश काढल्याने त्याला आत्महत्येशिवाय मार्ग राहिला नाही यात चूक कोणाची? 

                        इंग्रज या देशातून गेल्या पासून वास्तु वारसा म्हणून बोट दाखवायला आपण एक वास्तु उभारू शकलो नाही. जे आहे ते टिकवण्याची कुवत आपल्या मध्ये नाही. पुन;र्विकास आणि त्यातून मिळणारा अफाट पैसा याच्यावर डोळा ठेवून  आपण या थाटात वावरतो आहोत की आपल्या पुढच्या पिढीचे आपण काहीच देणे लागत नाही. याच्या परिणामी आजचा हा सगळा कालखंडच उद्याच्या इतिहासातून नामशेष होऊ शकतो. कारण आता सगळे व्यवहार व्हर्चूअल होऊ लागले आहेत. ज्या वर्तमानपत्रात हा लेख तुम्ही वाचताय ते आणि इतर सगळी वर्तमानपत्रे दहा वर्षांनंतर छापली जाणार नाहीत. संपर्क क्रांतीमुळे अभिलेख उरणार नाहीत. पुन:र्विकासाच्या कल्पनेमुळे दाखवायला वास्तु राहणार नाहीत. उद्याच्या जगात कोण कशाला दखल घेईल आपली? आणि वस्तु वारसा नकोच असेल तर मग बोरीबंदरचे रेल्वे स्टेशन आणि कान्हेरीच्या गुंफा तरी कशाला हव्यात? सगळच पडून तिथे इमारती बांधू. एलिफंटामधली शिल्प तोफा लावून पाडणारे पोर्तुगीज, बुद्धमुर्ती फोडणारे तालीबानी आणि आपल्यात फरक तो काय? विंस्टन चर्चिल एकदा म्हणाले होते, आधी समाज इमारती घडवतो, मग इमारती समाज घडवतात, पण दोन हजार वर्षे जुन्या लेण्यांना प्लायवूडचे दरवाजे ठोकून त्यात राहणारे लोक ज्या समाजात आहेत त्या समाजाकडून वास्तु वारश्याच्या संवर्धनाची काय अपेक्षा करणार?