रविवार, ३० जून, २०१३

पिवळ्या ऑस्करची रिओ वारी


पिवळ्या ऑस्करची रिओ वारी

      रिओच्या त्या छोट्याश्या विमानतळाच्या धावपट्टीवर जेव्हा विमान उतरले तेव्हा साडेपाच वाजले होते. मी आणि चंद्रसेन आरेकर, आम्ही चेक आऊट करून बाहेर पडलो आता पैसे बदलून घ्यायचे होते. मी खिशातल्या नोटांच्या पुडक्यातून हजार रुपयाची एक नोट काढून खिडकीतून आत सरकवली. काचेपलीकडच्या सोनेरी केसांच्या त्या मुलीने रस्त्यावरून जाताना बळजबरीने हातात कोंबलेल्या जाहिरातीच्या कागदाकडे आपण ज्या तुच्छतेने पाहतो त्याच तुच्छतेने पाहत , इंडियन हुप्पी? नो नो करीत हाताचे दोन्ही आंगठे माझ्या समोर नव्वद अंशाच्या कोनात नाचवले. माझ्या पोटात गोळा आला. मुंबई विमानतळावर ब्राझिलियन रियाल मिळाले नाहीत ते ब्राझिल विमानतळावर मिळतील असे सांगितले होते, आता इथे तर ह्या मुलीनं भारतीय रूपाया पाहिलेलाचं नाही. आता जर मार्सियाने मेल मध्ये लिहिल्याप्रमाणे टॅक्सी पाठवली नसेल तर काय करायचे? खिशात नोटांच बंडल असून सुद्धा फोन करायला पण तिथले पैसे नव्हते. आम्ही सामान सावरीत बाहेर पडलो तर एक तरुण मुलगा हातात यूरेनीयम फिल्म फेस्टिवलचं पोस्टर घेऊन उभा. मला हायस वाटलं. हा आंद्रे.

      आंद्रेची टॅक्सी आता मुख्य रस्त्याला लागली होती. हा आपल्या अलीयावर जंग सारखा चार सहा पदरी रस्ता. आंद्रे बर्‍यापैकी इंग्रजी बोलत होता. बर वाटलं, कारण विमानातून उतरल्या पासून इंग्रजी बोलणारा तो पहिलाच इसम भेटला होता. इथे लिहिणं बोलणं सगळं पोर्तुगीज मध्ये चालत. आता शहर जवळ येत होत. आजूबाजूला मोठ्या इमारती दिसू लागल्या. पुढे आल्यावर तर अगदी ठाण्यातल्या अनधिकृत इमारती सारख्या एकमेकांना खेटून उभ्या असलेल्या इमारतींचे पुंजके दिसत होते. टॅक्सीतल्या घड्याळात पहिले तर साडे सहाच वाजले होते, पण बाहेर रात्र झाली होती. इथे सूर्यास्त लवकर होतो.

   आंद्रे आरामात पॉपकॉर्न खात टॅक्सी चालवीत होता. रस्त्यावर काही मजबूत बांध्याची तरुण मुलं पॉपकॉर्नची पाकीटं भरलेल्या भल्या मोठ्या प्लॅस्टिक पिशव्या घेऊन त्या भरधाव वाहणार्‍या रस्त्यावर पॉपकॉर्न विकत होती. सिग्नलला टॅक्सी थांबली आणि एका मुलाने टॅक्सीच्या मिररवर एक शेंगदाण्याच्या पाकीटाचा जोड आणून ठेवला. किंमत होती एक रियाल, म्हणजे रूपयाच्या भाषेत सत्तावीस रुपये. तो ती पाकीटं एकामागून एक गाड्यांच्या मिररवर ठेवीत जात होता. सिग्नल सुटण्यापूर्वी त्याच शिताफीने पुन्हा उचलीत होता. तेवढ्या वेळात कुणी ते पाकीट घेतलं तर एक रियाल त्याला मिळत होता. ही तिथल्या गरिबीची झलक होती.

      आंद्रेने मुख्य रस्ता सोडून टॅक्सी एका चिंचोळया गल्लीत घातली आणि चाकांचा घू घू असा आवाज येऊ लागला. बाहेर पहिले तर दगडी रास्ता. अधून मधून गवत उगवलेल. अतिशय तीव्र चढ उताराचे रस्ते आणि वेडीवाकडी वळणे. बाहेर भयाण निर्मनुष्यता. सगळी जुन्या पोर्तुगीज वळणाची घरं आणि त्यांना उंचच उंच भिंतींची कुंपणे. अशाच एका उंच भिंतीत असलेल्या भल्या मोठ्या दरवाजासमोर आंद्रेने टॅक्सी उभी केली. अतिशय मिणमिणता उजेड त्याने भयानतेत अधिकच भर पडत होती. आंद्रेनेच किल्ली लावून दरवाजा उघडला. एका अरुंद जिन्याने आम्ही वर आलो. समोर एक जुनी बंगली होती, हेच ते डिनाईस गेस्ट हाऊस जिथे आता आम्ही पुढचे पाच दिवस राहणार होतो.

       काल रात्री पडल्या पडल्या झोप लागली. सकाळी लवकरच उठलो. आज दुपारी हाय पावरचा शो आहे. सकाळचा तिथला हेवी ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो. हे रिओ मधले सांता तेरेसा. ही एक मोठ्ठी टेकडी आहे आणि त्या टेकडीवर वसलेल हे सांता तेरेसा म्हणजे आपल वाळकेश्वर किंवा मलबार हिल. जेमतेम एक गाडी जाईल इतके चिंचोळे दगडी रस्ते आणि त्या रस्त्यावर ट्रामचे रूळ. दोन वर्षापूर्वी पर्यन्त इथे ट्राम चालत होती. ती ट्राम म्हणजे सांता तेरेसाकरांच्या जीवनाचा भाग होती. आजही तेरेसाकर ट्रॅमच्या नावाने हळहळतो. ही ट्राम आजही इथे दिसते. कधी एखाद्या चित्रात, कधी विकायला ठेवलेल्या कलावस्तूत, छोट्या छोट्या लाकडाच्या ट्रामची मॉडेल असलेल्या की चेन्स इथे सर्वत्र मिळतील. मध्येच एकादा बसस्टॉप ट्रामच्या आकाराचा असेल तर कुठे रस्त्यावरचा स्टॉल. ट्रामच्या समोरच्या भागाचे चित्र, त्या दोन खिडक्या म्हणजे तिचे दोन डोळे आणि डाव्या डोळ्यातून ओघळणारा एक अश्रु अस एक हृदयस्पर्शी रेखाचित्र म्हणजे आता सांता तेरेसाचा लोगो झालाय.

      मार्सियाने सांगितलेल्या काही बार मध्ये आज जायचं होत. बार म्हटल्यावर थोडी धाकधूक वाटत होती. पण पाहिल्या बार मध्ये गेलो आणि इथलं वेगळपण जाणवलं. इथले बार म्हणजे आर्ट सेंटर्स आहेत. ज्या बार मध्ये मी उभा होतो त्याच्या सगळ्या भिंती वेगवेगळ्या पेंटिग्स, स्केचेस, फोटोग्राफ्सनी भरून गेल्या होत्या, उरल्या सुरल्या जागेत काही स्क्ल्पचर्स होती, अॅन्टिक आर्टीफॅक्टस होती. हे बार ही सांता तेरेसाची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळी संस्कृती आहे. हे सगळे बार चित्रकला, संगीत, नाटक, सिनेमाला प्रोत्साहन देतात. या बारमध्ये नाटक, सिनेमा, संगीताच्या कार्यक्रमाची पोस्टर लागलेली असतात. कार्यक्रमाची माहिती पत्रके ठेवण्यासाठी एक छोटं काऊंटर असते. या बारमध्ये फिरून आम्ही हाय पावरची पोस्टर्स लावली, महितीपत्रके ठेवली. लोक कुतुहलाने काहीबाही विचारात होते, पण ते कळण शक्य नव्हतं. आम्ही खाणाखुणा करून काही सांगण्याचा प्रयत्न केला, किती कळलं कुणास ठाऊक. दुपारी अशाच एका बार मध्ये यूरेनीयम फिल्म फेस्टिवलसाठी इतर देशातून आलेले काही दिग्दर्शक भेटले. जपानहून मित्सुबिसे आला होता, स्पेनहून पाब्लो नावाचा तरुण दिग्दर्शक आला होता. त्याचा इमेजेस ऑफ फुकुशिमा हा चित्रपट स्पर्धेत होता. बिहारचा बुद्धा विसपर्स इन जादुगुडाचा दिग्दरशक श्रीकूमार तर आयोजनातच सहभागी होता. साल्वाडोरची एक वयस्कर दिग्दर्शिका लावरा तिथे भेटली. तेव्हा माहीत नव्हतं ही सगळी मंडळी पुढच्या चार दिवसात अगदी जिवाभावाचे मित्र बनतील. दुपारच जेवण आम्ही एकत्रच घेतलं. मांसाहार करणार्‍यांसाठी मेजवानी होती. तिथे चिकन, मटन हा प्रकार फारसा प्रचलित नाही . मांसाहार म्हणजे एक तर बिफ किंवा मासे. या ब्रझिलियन फूडला एक मंद स्वाद असतो, तो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही इथे ताव मारू शकता.

      जेवण उरकून आम्ही थिएटरवर पोहोचलो. मॉडर्न आर्ट म्युझियमची भव्य इमारत म्हणजे नव्या रिओची ओळख होती. रिओ ही एकेकाळची ब्राझिलची राजधानी. इ.स. १५०० मध्ये पेद्रोने या देशाचा शोध लावला असला तरी तसा तो दुर्लक्षिलेलाच होता. इ.स. १८०७ साली नेपोलियनच्या आक्रमणामुळे पोर्तुगालचा राजा जोओने आपली राजधानी रिओ मध्ये हलवली आणि रिओला वैभव प्राप्त झाले. या राजधानीच्या खुणा अजून रिओ मध्ये दिसतात. अगदी अलीकडे  म्हणजे इ.स. १९६० पर्यन्त ही राजधानी रिओ मध्ये होती तिथून ती आता साओ पावलोला हलवली. ह्या स्थित्यांतराचे मोठे परिणाम रिओवर झाले. ह्या घटनेचा कडवटपणा अजूनही रिओकरांच्या - खरेतर त्यांना कॅरिओकर म्हणतात, कॅरिओका नदीच्या काठावर राहणारे म्हणून कॅरिओकर, बोलण्यातून जाणवतो.

      दोन वाजून गेले होते, प्रेक्षक यायला सुरुवात झाली होती. कोण काय बोलत होतं काहीच कळत नव्हते, सगळेच पोर्तुगीज. हाय पावरचे पोस्टर्स, बॅनर्स, फ्लायर्स सगळं मुंबईहून येताना पोर्तुगीज भाषेतच करून घेतलं होत. चित्रपटाला पोर्तुगीज सबटाइटल केलेलं होते, त्यामुळे काळजी नव्हती. हळूहळू ओळखी होत होत्या. काही सिने-पत्रकार येऊन भेटत होते. पाब्लो आणि लावराला पोर्तुगीज येत होते. ते दोघेही दुभाषाचे काम करीत होते. मार्सीया तर पोर्तुगीजच होती. ती त्या फेस्टिवलची एक डायरेक्टर. ती काही पत्रकारांशी ओळखी करून देत होती. तीन वाजत आले. प्रेक्षकांची गर्दी वाढत होती, बरेच तरुण तरुणी दिसत होत्या. सहा रियाल म्हणजे दीडशे रुपयांचं तिकीट काढून डॉक्युमेंट्रीज पाहायला येणारा प्रेक्षक मी डोळे भरून पाहत होतो. आपल्याकडे डॉक्युमेंट्री फुकट दाखवून पण फार कुणी येत नाही.

      बरोबर तीन वाजता पहिली फिल्म सुरू झाली द लास्ट फ्लॉवर’. सीमा बाघेरी या इराणी दिग्दर्शिकेची ही पाच सहा मिनिटांची अॅनिमेशन फिल्म. अणुस्फोटानंतर सगळं जग उध्वस्त झालेल आहे, कुठेच काही शिल्लक नाही अशा परिस्थितीत एका मुलीला एक फूल मिळत, जगातलं शेवटचं फूल. ती सर्वांना त्या फुलाबद्धल सांगत फिरते कुणीच लक्ष देत नाही. सगळे आपल्याच दुखात. एक तरुण त्या मुलीला प्रतिसाद देतो. ते दोघे ते फूल सांभाळताना प्रेमात पडतात. प्रेम वाढत जाते आणि जग पुन्हा फुलत जाते. ते इतक फुलत की पुन्हा रणगाडे तयार होतात, पुन्हा अण्वस्त्रे तयार होऊ लागतात आणि चित्रपट संपत जातो. पाच सहा अणुभट्ट्या वितळून, त्यात सगळं उध्वस्त होऊनही पुन्हा नव्या जोमाने अणुभट्टया उभारणार्‍या जगाच्या मानसिकतेवर नेमकं बोट ठेवणारा हा चित्रपट इराण सारख्या सध्या अणु पासून दूर परंतु भविष्यात अणु स्वीकारू इच्छिणार्‍या देशातली एक स्त्री दिग्दर्शिका बनवते हे लक्षणीय होत.  पुढची फिल्म सुरू झाली ब्लॅक वॉटर. अन्न आणि पाण्यातील आण्विक प्रदूषणावर आधारलेली कर्‍लोस अलास्ट्रू नावाच्या स्पॅनिश दिग्दर्शकाची ही चार मिनिटाची शॉर्ट फिल्म. त्यानंतर औस्ट्रेलियन दिग्दर्शक कुर्तिज टेलरची किंटायर ही औस्ट्रेलियातील यूरेनीयमच्या खाणीमुळे विस्थापित होऊ घातलेल्या मार्तु जमातीवरील फिल्म संपली आणि हाय पावर सुरू झाली.

      हा हाय पावरचा वर्ल्ड प्रिमियर, त्या वर्ल्ड प्रीमियरला साजेसा प्रेक्षकवर्ग. आम्ही प्रथमच हाय पावर थिएटर मध्ये पाहत होतो. नामावली संपली आणि आज दिनूकाकाची आठवण येते. . हे विक्रम गोखलेंच्या धीरगंभीर आवाजातल पहिलं वाक्य कानी पडलं आणि मन दोन वर्षे मागे गेलं. अणु चळवळीतील काही मित्रांनी केलेल्या मदतीने तारापुरच्या विस्थापितांच्या मुलाखती दांडीच्या समुद्र किनार्‍यावर घेत होतो तेव्हा पुढे ती फिल्म देशाबाहेर जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण पुढे अनेक जण या फिल्म मध्ये जुळत गेले. इंग्रजी निवेदनासाठी टॉम अल्टरनी हो म्हटले आणि या चित्रपटाला वेगळा आकार आला. देशात आणि महाराष्ट्रात शेतकरी, मच्छिमार अणु प्रकल्पाविरोधात लढत असताना निदान महाराष्ट्रातील कलाकारांनी तरी याविषयी भूमिका घ्यावी आणि ती घेण्यासाठी हाय पावर ही फिल्म एक व्यासपीठ ठरावे हा माझा प्रयत्न होता. त्याला पहिला प्रतिसाद दिला टॉम अल्टरनी त्यानंतर मराठी निवेदनासाठी अनेक कलाकारांकडून नकार घेत घेत मी जेव्हा ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये विक्रम गोखलेंना भेटलो तेव्हा ती माझी शेवटची आशा होती. पण विक्रमजींचा आवेशच वेगळा होता. काहीच ओळख नसताना त्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं आणि म्हटलं तू त्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या बाजूने फिल्म करतोयस ना, मग मी तुझ्या बरोबर आहे. पार्ल्याच्या बझ इन स्टुडिओत रेकॉर्डिंग झालं. ह्या निवेदनात एका अगदी छोट्याश्या स्त्री आवाजासाठी मग इला भाटे आल्या. आता ह्या सगळ्यांच्या प्रतिमेला साजेस पोस्ट प्रॉडक्शन हव होत पण त्यासाठी खूप खर्च होता आणि पैसे तर जवळ नव्हते. कुणाकडून थेट पैसे मागणं प्रशस्त वाटत नव्हतं. असाच एकदा एक मराठी चित्रपट निर्माता मित्र भेटला त्याला ही सगळी कथा सांगितली. तो तयार झाला पण चित्रपटात सरकारविरोधी सुर असल्याने नाव न लावण्याच्या अटीवर एडिटिंगचे हवे ते काम करून घे म्हणाला.

      आता खर्‍या अर्थाने फिल्म हातात आली होती. आता हव होत संगीत. कलाकारांनी भूमिका घ्यावी हा आग्रह होताच. तश्यात तरुण संगीतकार अमेय गावंड भेटला, तो आनंदाने तयार झाला. मग हव तस एक गाणं त्यानेच लिहिली आणि त्यानेच संगीतबद्ध करून तो गायला. . . उजियारा फैला’.           
     
      चित्रपट संपला. मी आणि चंद्रसेन आरेकर आम्ही व्यासपीठावर उभे होतो प्रश्नांना उत्तरे द्यायला.
पहिला प्रश्न, तारापुरात जर ही परिस्थिति असेल तर भारत सरकार आणि भारतातील एनजीओ तारापुर आणि इतर अणु प्रकल्पग्रस्तांसाठी नेमकं काय करतायत?’
मी म्हटलं भारत सरकार तर हे मान्यच करायला तयार नाही की अणुप्रकल्पांच्या आजूबाजूला असे काही घडते आहे. त्यांच्या लेखी सगळं आलबेल आहे आणि भारत सरकारच्या विरोधात जाऊन भारतीय एनजीओ काही करतील अशी परिस्थिति नाही.
या फिल्ममुळे भारत सरकारचा हा दृष्टीकोण बदलेल असं तुम्हाला वाटतं का? सरकार या फिल्मकडे कसे पाहत आहे?’ दूसरा प्रश्न.
मी म्हटलं या फिल्म मधून माझा प्रयत्न हा जनमत बदलण्याचा आहे. एकदा जनमत बदललं तर सरकारच मत नक्की बदलेल अस मला वाटत आणि भारतीय सेन्सॉर बोर्डाने ही फिल्म सध्या रोखून धरली आहे त्यावरून भारत सरकार या फिल्मकडे कस बघतय हे लक्षात याव.
अशी ही प्रश्नोत्तरे सुमारे तासभर चालली. शेवटचा प्रश्न आरेकरांसाठी होता.
आता पन्नास वर्षांनंतर पहिले प्रकल्पग्रस्त म्हणून तुम्हाला भारतीय अणु कार्यक्रमाबाबत काय वाटतं?’
आम्ही जे सहन केलय आणि आता आमची जी परिस्थिति आहे ती पाहून तरी आमच्या सरकारने नवीन प्रकल्प सुरू करताना विचार करावा. असले धोकादायक प्रकल्प जगात कुणी आणूच नयेत असे मला वाटते.

      कार्यक्रमाचा मध्यांतर झाला. आम्ही बाहेर चहा पित उभे होतो. कॉलेजची मुलं घोळक्या घोळक्याने येऊन आमच्या मुलाखती घेत होती. त्यांच्यातलाच कुणीतरी एक, ज्याला इंग्रजी येत होत तो दुभाषा बनत असे. असा प्रतिसाद अनपेक्षित होता.

      त्यादिवसाचं दुसरं पर्व सुरू झालं. स्लोचिंग टोवर्ड्स युक्का माऊंटेन’, रिटेर्न ऑफ नवाजो बॉय आणि द फोर कोर्नर – नॅशनल सक्रिफाइज एरिया हे तीनही अमेरिकन चित्रपट होते. यातला रिटर्न ऑफ नवाजो बॉय हा दूसरा भाग होता, पहिला भाग मी पाहिलेला होता. त्या पहिल्या चित्रपटामुळे काय परिणाम झाले ते दाखवणार हा दूसरा भाग. तीनही चित्रपट तंत्राच्या दृष्टीने उत्कृष्ट होते. दोन तासात दुसरं पर्व संपलं आणि आम्ही परत निघालो.

      रात्री जेवताना बरेच कॅरिओकर सोबत होते. मग त्या अनधिकृत बांधकामांचा विषय निघाला. ठाण्यात अलीकडेच पडलेल्या इमारतीचे ताजे प्रकरण समोर होते. या बांधकामांना तिथे फबेला म्हणतात. या फबेलाबद्धल तिथल्या लोकांमध्ये खूप आत्मीयता दिसते. हे फबेले तिथल्या चित्रातून, कवितांमधून दिसतात. जेव्हा पोर्तुगालच्या राजाने आपली राजधानी इथे वसवली तेव्हा साऊथ आफ्रिकेतून गुलाम आणले होते. त्यांना राहायला काही जागा दिल्या. नागरी करणाच्या मुख्य प्रवाहबरोबर त्यांच्या पण वस्त्या विकसित होत गेल्या. त्यांच्यात आणि पोर्तुगिज आणि इतर युरोपियनांमध्ये संकर झाले. ते गुलामगिरी, मजुरी सोडून हलक्या सलक्या नोकर्‍या करू लागले. त्यांच्या झेपड्यांच्या अनेक मजली इमारती झाल्या, मात्र स्वरूप तसेच राहिलं. आता तर ह्या इमारतींना एसी लागलेले दिसतात. तिथेही मॅकडोनल्ड्स आहेत. मात्र काही फबेले गुन्हेगारी, ड्रग्ज, लूटमारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. तिथे अगदी मिलिटरी लागलेली सुद्धा पाहायला मिळाली. आता हे फबेले पाडण शक्य नाही हे तिथल्या सरकारच्या लक्षात आले आहे. त्यांनी आता एक वेगळा मार्ग काढला आहे. ह्या फबेल्यामध्ये ते टुरिजम डेवलप करताहेत. फबेल्यातील ह्या घरांच आता काही लॉजेस मध्ये रूपांतर होईल. तिथे पर्यटकांसाठी बँका, हॉटेल, वाहतूक व्यवस्था इ. असेल.

      दुसर्‍या दिवशी कळलं की आदल्या दिवशी आम्ही तिथल्या हॉटेल आणि बारमध्ये जो प्रचार केला होता त्याचा प्रतिसाद म्हणून आयोजकांना अनेक फोन आले, ही भारतीय फिल्म आम्हाला पहायचीय. दुसर्‍या दिवशी साल्वाडोरची दिग्दर्शिका लाव्राची फिल्म होती सफरिंग इन शेड्स ऑफ ग्रे. त्या चित्रपटातील एका कलाकाराला जीवे मारण्याची धमकी आल्याने ती फिल्म तिने महोत्सवातून काढून घेतली होती. आण्विक दहशतवादाचा असाही एक चेहरा तिथे पाहायला मिळाला, जो अजून आपल्याकडे नवखा आहे. आयोजकांनी त्या जागी हाय पावर पुन्हा दाखवायचा निर्णय घेतला. या शो ला तूफान गर्दी झाली होती. शो संपल्यावर पुन्हा तास दीड तास तशीच प्रश्नोत्तरे. तिसर्‍या दिवशी आयोजकांनी इंडिया डे जाहीर करून भारतातील तीन फिल्म हाय पावर’, श्रीकूमाराची बुद्धा विसपर्स इन जादुगुडा आणि कुंदंकुलम आंदोलनावरील गेट अप, स्टँड अप ही श्रीनाथची फिल्म अशा तीन फिल्म एकत्र दाखवायचा निर्णय घेतला. या शोला सुद्धा प्रेक्षकांनी पुन्हा गर्दी केली. आता हाय पावरची बर्‍यापैकी तोंडी प्रसिद्धी झाली होती. इथे येण्याचा हा मोठा फायदा होता. त्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याला आणण्याचा आमचा निर्णय योग्य ठरला. थिएटर मध्ये, चर्चेत आणि इतरत्रसुद्धा तिथल्या लोकांनी चंद्र्सेन आरेकरांना चांगला मान दिला.

      आज रविवार. लाव्रा आणि वीवी, फिल्म फेस्टिवल मधली एक वोलेंटीर आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी एक कार्यक्रम आखला होता, आम्हाला बीच दाखवण्याचा. मी, आरेकर, श्रीकूमार आणि लाव्रा सकाळी ब्रेकफास्ट करून निघालो. वाटेत वीवी आणि तिचा ग्रुप भेटला. मेट्रोने आम्ही कोपाकाबानाला पोहोचलो. कोपाकाबानाचा प्रचंड मोठा प्रासाद आणि समोर पसरलेला अथांग समुद्र. पाणी नितळ म्हणजे किती, तर काचच वाटावी. वाळू म्हणजे काचेचा भुगा. रविवार असल्याने बीच भरलेला होता. बहुतेक सर्व परदेशी प्रवासी. बिकिणीत तारुण्य सूर्यस्नान करीत काठावर पहुडलं होतं जिथेतिथे. कुणाची कुणाला दखल नव्हती. आमच्या दृष्टीनेही थोड्याच वेळात ते सगळं अदखलपात्र झालं. लावरा आणि वीवी समुद्रात डुंबण्याच्या तयारीनेच आल्या होत्या. तासभर त्यांचं मनसोक्त डुंबण झाल्यावर आम्ही निघालो. लावरा एका अशा हॉटेल मध्ये घेऊन गेली, जिथे वजनावर जेवण मिळतं. सलाड, व्हेज, नोन व्हेज, अंडी, मासे, बिफचे सगळे प्रकार बुफे मध्ये लावून ठेवलेले होते. आपल्याला हवं ते घ्यायचं, वजनाचे पैसे सारखेच. वजनाने पैसे द्यायचे हे आधी माहीत असल्याने आणि चाळीस रुपयाला एक रियाल खिशात असल्याने हात जरा आखडला जात होता. पोटातली भूक, थाळीचं वजन आणि खिशातले रियाल यांचा कसाबसा मेल घालत काऊंटरवर आलो. तिथे एक छोटा वजनाचा एलेक्ट्रोनिक काटा होता, त्याला जोडलेलं बिल प्रिंट करायचं मशीन. मी थाळी काट्यावर ठेवली, वजन किती झालं कुणास ठाऊक पण पैसे झाले एकवीस रियाल. मनातल्या मनात चटकन तिथे आठशे रुपयाचा आकडा दिसला. जेवून आम्ही पुन्हा गेस्ट हाऊसवर आलो.

      आज निकालाचा आणि परितोषिक वितरणचा दिवस. इथे एक शो होणार या तयारीने आलो होतो. इतर दिवशी काय करायचे याची काहीच कल्पना नव्हती. पण गेल्या तीन दिवसात तीन शो झाले. विचार करायला जराही उसंत मिळाली नव्हती. पण आज मात्र सकाळ पासून एक विचित्र टेंशन होत. जेव्हा हाय पावरची या स्पर्धेत निवड झाली तेव्हा आनंद जरूर झाला होता, पण या जागतिक स्पर्धेत ती पुढे कुठपर्यंत जाईल याची काहीच कल्पना नव्हती, पण जेव्हा पाडव्याच्या रात्री हाय पावरची महोत्सवातल्या बेस्ट एट मध्ये निवड झाल्याचे कळले तेव्हा मात्र अपेक्षा वाढल्या. तात्काळ काही निर्णय घेऊन इथे यायचं ठरवलं. एका प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याला बरोबर घ्यायचं ठरलं. हे निर्णय कृतीत उतरवण महाकठीण होत. अडीच तीन लाख रुपये उभे करायचे होते. उद्धव ठाकरेंनी केलेल्या भरीव मदतीमुळे तो भार काहीसा हलका झाला होता पण दूसरा मुख्य प्रश्न होता प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याच्या पासपोर्टचा. तो मिळणारच नाही असे वाटत असताना शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून तो मिळाला आणि पुन्हा धावपळ सुरू झाली, तिकीट, व्हिसा मिळवण्याची. ज्या रात्री विमानात बसायच त्याच संध्याकाळी व्हिसा हातात मिळाला. विमानात बसलो तेव्हा पुरेसे पैसे बँकेत जमाही झालेले नव्हते. काही चेक टाकलेले होते तर काही फक्त प्रॉमिसेस होती.

      इथे प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाने  भारावून जायला झाले होते. आता यलो ऑस्कर मिळण न मिळण तितकस महत्वाच वाटत नव्हतं, पण ज्यांनी ज्यांनी या फिल्मला मदत केली, इथे यायला मदत केली त्यांच्या अपेक्षांचे ओझे होतेच. गेल्या चार पाच दिवसात जे प्रतिस्पर्धी होते ते जिवाभावाचे मित्र झाले होते. पाब्लो, मित्सुबिसे, लावरा, रशियाची निर्माती विक्टोरिया यांच्याशी ऋणानुबंद निर्माण झाले होते, स्पर्धा अशी नव्हतीच. सगळं खेळीमेळीच वातावरण होतं. पण काल जेव्हा ज्यूरीपैकी काहीनी भेटून अधिक खोलात जाऊन काही प्रश्न विचारले तेव्हा कुठेतरी आत अवॉर्डची अपेक्षा मुळ धरू लागली होती. फीचर फिल्म आणि फीचर डॉक्युमेंट्रीची अवॉर्डस जाहीर झाली. विक्टोरियाच्या अटॉमिक इवान या फीचर फिल्मला त्या श्रेणीतील यलो ऑस्कर मिळालं. आता शॉर्ट फिल्म सेक्शन. ज्युरींच निवेदन सुरू होत. या सेक्शनमध्ये निवड कशी करण्यात आली, तंत्रापेक्षा विषयाची हाताळणी, मांडणी आणि सर्जनशीलतेला कस महत्व दिल गेलं  इ. इ. ते संगत होते. ते संपलं आणि मार्सियाने जाहीर केलं. . .  यलो ऑस्कर इन शॉर्ट फिल्म सेक्शन गोज टु हाय पावर.

      मी आणि चंद्रसेन आरेकर आम्ही त्या भव्य स्टेजवर उभे होतो. समोर खचाखच भरलेलं सभागृह अजूनही टाळ्या वाजवित होत. मी आरेकराना पुढे केलं. हा पर्यावरणीय फिल्म महोत्सव इथे ट्रॉफी वगैरे दिली जात नाही. एक पिवळ्या गुलाबाच फूल, एक टोकन आणि प्रशस्तिपत्रक. ते आरेकरानी घेतलं मी आभाराचे दोन शब्द कसेबसे बोललो. अवॉर्ड मिळण्यापेक्षा हा चित्रपट इथवर आला, भारतात तो दाखवायला सेन्सॉर बोर्डाने खोडा घातलेला असताना त्याचा इथे तिचा प्रिमियर झाला, एकाच्या ठिकाणी तीन शो करावे लागले. प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला, जागतिक प्रसारमाध्यमानी भारतातील अणु प्रकल्पग्रस्तांच्या वेदनांना जगभर प्रसिद्धी दिली यात हा चित्रपट बनवताना झालेल्या श्रमांचे, खर्चीलेल्या वेळेचे आणि अनेकदा आलेल्या वैफल्याचे शेवटी सार्थक झाले.
_____________

५ टिप्पण्या:

  1. प्रदीप सर,
    ग्रेट. आपण लिहीते झालात; तेही वाढ दिवशी। फारच छान....
    असंच लिहीत रहा। आम्ही वाचत राहू...
    अनुभव ही सुन्दर ।

    उत्तर द्याहटवा
  2. प्रदीप खुप छान ...सुंदर ...लिहिले ..आहेस ...असंच...चांगले चांगले लिहीत रहा...माझ्या तुला...व..शॉर्ट फिल्म ....हार्दिक भगव्या शुभेच्छा .

    उत्तर द्याहटवा
  3. प्रदीप खुप छान ...सुंदर ...लिहिले ..आहेस ...असंच...चांगले चांगले लिहीत रहा...माझ्या तुला...व..शॉर्ट फिल्म ....हार्दिक भगव्या शुभेच्छा .

    उत्तर द्याहटवा
  4. प्रदीप खुप छान सुंदर लिहिले आहेस ...तुझं अभिनंदन ...हार्दिक भगव्या शुभेच्छा .

    उत्तर द्याहटवा