शनिवार, ६ जुलै, २०१३

रझाचा काळा सूर्य आणि गॉगल घातलेल्या माणसाची गोष्ट




रझाचा काळा सूर्य आणि गॉगल घातलेल्या माणसाची गोष्ट

रिदम हाऊसच्या चौकात गाड्या ओलांडत कसाबसा रस्ता क्रॉस केला आणि दोन चौकांच्या मधून पुढे निघालो. एका चौकाच्या भिंतीवर कुणा एका नगरसेवकाच्या सौजन्याची पाटी लागलेली, त्यावर पानाच्या पिचकारीचे काही शिंतोडे उडालेले. ती पाटी सुद्धा पार करीत मी जेव्हा जहागिरच्या दरात पोहोचलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते.   

जंहागिर मध्ये शिरल्या शिरल्या उजव्या बाजूची एक प्रशस्त गॅलरी.
रझाच प्रदर्शन लागलेल, विस्तार.
मी काचेचा दरवाजा ढकलून आत शिरतो.
समोरच्या कोपर्‍यात एक भला मोठा सोफा, कोर्नर पीस मांडलेला, बाजूला दोन ऊंची खुर्च्या, समोर ज्याला टी पॉय म्हणायला शरम वाटेल अस एक छोट टेबल आणि मागे एक संदूक आणि ह्या सगळ्यावर कुठे कुठे रेळलेले एक कुटुंब.  डोळ्यांवर काळा गॉगल, पायात जिन आणि पावलात पांढरे शूज घातलेला एक तरुण, स्कीन-टाइट ट्राऊजरवर शर्ट घातलेली एक तरुणी आणि दाढीच्या ठेवणीवरून मुस्लिम भासावा असा एक मध्यमवयीन फाटका माणूस आणि त्याच्या हातात एक गोंडस बाळ. हा दाढीवाला बहुदा त्यांचा ड्रायवर किंवा घरगडी असावा आणि लुकलुकत्या डोळ्यांनी इतस्तता सैरभर पाहणारा बहुदा त्यांचा कुलदीपक असावा. केसांचा रंग चेहर्‍यात उतरल्यागत पांढर्‍या फटफटीत दोन मध्यमवयीन बायका. असे पाच, साडे पाच जण मोठमोठ्यानं कुजबुजत होते. ते लुकलुकते डोळे सुद्धा मध्येच किंचाळत होते.

असेच काही ऊंची सोफे प्रत्येक कोपर्‍यात मांडलेले.
म्हटले व्वा, रझाचे एक्झिबिशन म्हणजे काही तास जाणार.
उभ राहून थकायला झालं तर अधून मधून बसता येईल. केवढी मोठ्ठी सोय केलेली ही. शेवटी रझा कुणी साधासुधा कलाकार नाही. त्याच्या दर्ज्याला साजेसच सगळं असणार ना.
  
मी पहिल्या चित्राकडे वळलो. डावीकडच्या भिंतीवरच पहिलच चित्र. सहा फुट लांब आणि चार फुट उंच - सर्वत्र’. बरोबर मध्यावर एका चौकटीत एक मोठ्ठ काळनिळं वर्तुळ. रझाचा तो काळा सूर्य. उरलेल्या चार कोपर्‍यात चार मूलभूत रंग लाल तांबडा, निळा आणि पिवळा तर चौथ्या चौकटीत या सगळ्या रंगांना तोलणारा करडा रंग. हे चौकटीचे कोपरे की सूर्यातून बाहेर पडणारी ऊर्जा किरणे आणि त्या किरणातले ते अदभूत रंग.


ट्रीsss ट्रीss आजूबाजूला कॅमेर्‍याचे आवाज. मधूनच उडणारे फ्लॅश.
एक जण अंगात आल्यासारखा फोटो काढत होता.


त्या मधल्या सूर्य चौकटी पलीकडे त्या मूलभूत रंगातून उतरलेले अनेक रंग त्रिकोण. बरेच काही गडद तर काही फिकट, एक तर पांढरा फटक, अजिबात रंगाचा कण ही न चिकटलेला.

पाठीमागे लुकलुकणारे डोळे मागे किंचाळत होते. त्यांना गप्प करण्याचा दाढीवाल्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता. काळा गॉगलवाला कुठे होता कुणास ठाऊक.

मी पुढच्या चित्राकडे वळलो.
कृती प्रकृती पुन्हा एक भव्य कॅनवस, मात्र उभा. पुन्हा मध्ये एक काळा सूर्याचा गोळा. रझाची ही काळ्या सूर्याची सगळी चित्र आखीव रेखीव एका भव्य चित्र चौकटीत अनेक चौकटी. प्रत्येक चौकटीत अर्थ वेगळा पण तरीही पूर्ण चित्राचा आशय एकच. आतल्या चौकटीतले सूर्य वेगळे, त्यांचे रंग वेगळे त्यातून निघणारे ऊर्जा किरण पुन्हा वेगळ्या रंगाचे दरवेळी सहा पण दरवेळी रंगसंगती वेगळी.

एक्सक्यूज मीss  . . तो अंगात संचारलेला माझ्या पुढे आला. कॅमेरा जणू त्याच्या पंज्याचा भाग बनला होता. आता दोन चित्र दिसत होती. एक भिंतीवर, एक कॅमेर्‍यावर. कृती-प्रकृती

पुढे उत्पत्ति’.  पुन्हा एक भव्य उभी चित्र चौकट. वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये विभागलेली. सगळ्यात खालच्या पातळीवर काहीच नाही. गडद भासेल असा काहीसा किरमिजी निळा रंग, त्यात एक वर्तुळ थोडसं गडद, मात्र नेहमी सारख मध्यात नाही, तर बाजूला काहीसं वाट चुकलेल, भरकटलेल दिशाहीन. काय असेल ते? एखादा आदिजीव.
वरच्या पातळीवर पुन्हा तोच गोळा आता मात्र खूपच फिकट झालेला. दिसेल न दिसेल असा.
या पातळीवर बरोबर मध्यात एक गडद काळी, ठसठशीत आकृती. एक त्रिकोण खाली टोक आणि वर बाजू असलेला. आणि त्याच्या वर चिकटलेला तोच तो गोळा, मेंदू सारखा. ही आकृती मात्र बरोबर मध्यात, तिने कशाचा तरी वेध घेतलेली.
रझा उत्पत्तीचा शोध घेतोय.
पुढच्याच वरच्या पातळीवर अशाच दोन आकृत्या. दोन्ही आकृत्या चित्र-मध्यात. त्यांनीही आपली पोजिशन घेतलेली. मात्र आता त्यातला गडदपणा नाहीसा झालेला. ओळख पटू लागलेली. रंग दिसू लागलेले. वरच्या पातळीत पुन्हा दोन आकृत्या. आता रंग अधिक ओळखीचे. नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष.

दर दोन तीन चित्रांच्या मध्ये गळ्यात आय कार्डाच्या रिबिनि अडकवून हात मागे बांधलेले वॉलंटियर उभे होते. मार्टिना नवरातीलोवाच्या मॅच मध्ये उभे असतात तसे. आणि लोक काढताहेत फोटो, चित्रांचे आणि चित्रांसमोर पोज घेवून उभे राहून. रझा पाहल्याचा पुरावा म्हणून. वॉलंटियर मात्र हात बांधून उभे.

एका वॉलंटियरला ओलांडून पुढे गेलो,
पुढे अवतरण एक अतिभव्य उभा कॅनवास. मध्यभागी, थोडा वर एक सूर्य खोल चौकटीतून बाहेर येत असल्यासारखा. चौकटीच्या दोन बाजूंवर उतरंड वेगवेगळ्या रंगांची, संपूर्ण चित्र पिवळ्या उजळ रंगाने माखलेल. सूर्य अजून बाहेर यायचाय तर ही ओजस्विता. मग पुढे काय. . ?

पुढे सत्य.
सत्यमेव जयते पुढचे चित्र.
सत्याचा रंग कुठला?
तो तर नितळ शुभ्र पांढराच असायला हवा. पण पांढर्‍याला ही किती पापुद्रे? किती पदर? 
सगळेच पांढरे. हळुवार पांढरे. काळ्याची छटाच नाही, करडा ही नाही, राखाडी ही नाही. सगळेच पांढरे पण प्रत्येक पांढरा वेगळा. ही रझाची रंगांवरची हुकमत, ती ही पांढर्‍या!


त्या दोघींपैकी एक पांढरकेशी लगबगीने माझ्या समोरून गेली, हात मागे बांधून उभा असलेला मार्टिनाच्या मॅच मधला मुलगा पुढे धावला. पुढच्याच कोपर्‍यातल्या एका भल्या मोठ्या सोफ्यावर एक मध्यमवयीन बाई आणि तिची छोटी पोर विसावली होती. ही दोघे तिच्या कानाजवळ काही पुटपुटली. ती बाई दचकून उठली. म्हणजे त्या खुर्च्या, ते सोफे बसायला ठेवलेले नव्हते तर.


पुढे एक छोटसच चित्र नादबिन्दु आकृतीबंद सत्यमेव जयतेचाच. फक्त रंग वेगळे. ही खास रझाची आकृतीशैली. मध्यभागी एक बिन्दु आणि त्यातून उठणारे तरंग. शांत शीतल जलाशयावर एकदा ठिपका आकाशातून पडावा आणि तो तरंगातून मोठा मोठा होत जावा. तो ठिपका, तो बिन्दु हा खास रझाचा शोध. चित्रकार म्हणून बर्‍यापैकी रूळल्यावर जेव्हा एक रितेपण आले. जसे प्रत्येकच कलाकाराच्या कलायुष्यात येते, तेव्हा रझाचा आत खोल कुठेतरी शोध सुरू झाला नाविण्याचा. या शोधात त्याला सापडलेला हा बिन्दु. कदाचित मध्यप्रदेशातल्या जंगलातल्या एकाद्या तलावात आभाळातून पडलेल्या एकाद्या बिन्दुचे उठलेले तरंग असावेत  ते.

सैयद हैदर रझा साहेबांचा जन्म मध्यप्रदेशातील बाबरीया गावातला. वडील फॉरेस्ट ऑफिसर, त्यामुळे लहानपण प्रत्यक्ष जंगलातच गेलेलं. जे जे मधून शिक्षण घेतल्या नंतर मुंबईत बर्‍यापैकी नाव कमावित असताना चित्रकलेच्या ओढीने रझा फ्रांसला गेला, वॅन गॉगच्या देशात. पुढे तिथेच रझाने जेनीशी लग्न केल. जेनीसुद्धा चित्रकार, शिल्पकार. दोघांनी प्रतिकूल परिस्थितीत घर बनवले, संसार थाटला एक स्टुडिओ उभा केला. मात्र या पाश्चिमात्य संस्कारातही रझाने आपले भारतीयपण कटाक्षाने जपले. मध्यप्रदेशातील ते जंगल, तो निसर्ग आणि त्यातलं अध्यात्म रझाच्या या अॅबस्ट्रॅक्ट शैलीत आजही उमटते. 

बिन्दु आणि तरंग. ह्या आकृतीबंधाला सुरुवात नाही शेवट नाही. हा बिन्दु पुढे रझाच्या चित्राचा अविभाज्य भाग झाला. कधी तो सूर्य झाला, करपलेला काळा, तर कधी पाण्याचा थेंब निळा. रंग बदलले आकृती तीच, पण भाव किती वेगळे. नादबिन्दु’, प्रेमबिन्दु’, निळभ’, सत्यमेव . . सगळ्या आकृत्या सारख्याच फक्त रंग वेगळे.


ये चल ग, आपल्या तर डोक्यावरुन जातय      एक तरुण, बहुदा नवरा असावा.


समोरच्या भिंतीवर एक भव्य आडव चित्र. आकृती तीच. मध्ये बिन्दु मग विलग होत जाणारी वर्तुळं, उठलेले तरंग.   आत्मरस – संपूर्ण चित्र फिकट, मातकट रंगात रंगलेल. सगळे तरंग -

. .

            जेनी गेली. दोन हजार दोनच्या एप्रिल मध्ये पॅरिस मधल्या एका हॉस्पिटलात कॅन्सरशी झुंजताना तिने डोळे मिटले आणि रझा एकटा झाला. जेनी सुद्धा थोर चित्रकार होती. रझा सारखा जगप्रसिद्ध चित्रकार आयुष्याचा भाग झालेला असताना तिने स्वत:च वेगळं अस्तित्व जपल होत आणि मुख्य म्हणजे रझाला साथ दिली होती. लग्न झाल तेव्हा जेनी स्वत:च एक शिल्प होती. अत्यंत रेखीव, कातीव   फ्रेंच चेहर्‍याची जेनी आणि तितकाच रुबाबदार रझा अस हे एकमेकांसाठीच जन्मलेल जोडप शेवटी अशा तर्‍हेने विलग झाले.

. .

                                                                                                 - उदासवाणे. मध्यप्रदेशातल्या त्या जंगलातील तळ्यात एकाद उनाड जनावर घुसून सगळं पाणी गढूळ केल्यासारखे रंग. रंगाची समर्पक योजना हे रझाच वैशिष्ट्य. पण या चित्रात मात्र रझाच्या मनाचेच तरंग दिसत होते, उदासवाणे. चार कोपर्‍यात चार करड्या रंगांच्या शुष्क छटा.

उजवीकडे वळलो आणि चकित झालो. मघापासुन जे शोधत होते ते अवचित पुढे आल. रझाचा बिन्दु. एकोणीसशे अठ्ठयाऐंशी सालातल हे चित्र, जेव्हा रझाला बिन्दु सापडला. जेमतेम तीन फुट बाय तीन फुटाच हे चित्र. अत्यंत आखीव रेखीव. त्या चित्राच्या शेजारी दोन खुर्च्यांचा सेट मांडलेला, मध्ये एक भली मोठी संदूक. जसे एकाद्या श्रीमंत भिंतीवरच ते टांगलय असा भास निर्माण व्हावा. चित्राच्या बरोबर मध्ये तो काळा बिन्दु आणि त्याच्या सभोवती गडद रंगाच्या लाटांसदृश्य जाड आडव्या समांतर रेषा. काळ्या फ्रेम मध्ये बंदिस्त, भान हरपवणारा गडद रंगविष्कार.

आ कलर थोडा डार्क छे
मी चमकलो. रझाच्या चित्रावर इतकी बोल्ड प्रतिक्रिया ?

चित्राच्या शेजारच्या खुर्चीवर तो काळा गॉगलवाला बसला होता. डावा पाय उजव्या पायावर ठेवलेला आणि तो पांढरा शू एका तालात हालत होता. समोर चॉकलेटच्या रंगाची तंग ट्राऊजर घातलेली त्याची बायको उभी.

याss, आय टू फील सो

इससे तो वो चेअर का कलर अच्छा है और कोमफरटेबल भी है.

ट्राऊजरवालीने ओठांचा चंबू केलेला. नवर्‍याबद्दल कोण अभिमान नजरेत दाटून आलेला.

हाऊ मच इज धिस?’

एका पांढरकेशीने एक कटलोग त्याच्या समोर धरला. रझाच्या चित्रांच्या मध्ये काही खुर्च्या आणि सोफ्याची पण चित्रे आणि समोर बारीक अक्षरात काही आकडे लिहिले होते.

ना ना, वही सेट फायनल कर दो  


त्या मधल्या काळ्या बिन्दुच्या आणि आडव्या गडद लाटांच्या बरोबरीने काही नाजुक पांढर्‍या रेषा. त्या बिन्दुचा अपेक्षित विस्तार दर्शविणार्‍या. त्या इतक्या नाजुक की चित्रकाराच्या कुंचल्यावरच्या नियंत्रणाला दाद द्यावी.

काळा गॉगलवाला आता उठून उभा राहिला होता. सगळ्या गॅलेरीवर त्याने एक नजर टाकली. काळ्या चष्म्यातून सुद्धा तिची मग्रुरी जाणवत होती. ह्या काय चित्रविचित्र रंगांच्या फ्रेम भिंतीवर टांगलेल्या आहेत? विकायला बिकायला ठेवल्या असतील तर घेऊन टाकाव्या दोन चार.

मी पुढे सरकतो. पुढे विस्तार’. ज्या नावाने हे प्रदर्शन भरले होते ते चित्र. काहीसं करड्या रंगात पण सूर्यबिन्दु मात्र तोच. काळा करपलेला रंग. एका मोठ्या चित्र चौकटीत काही छोट्या चौकटी. रझाने ही अॅबस्ट्रॅक्टची एक वेगळीच शैली पुढे आणली होती. सहसा अॅबस्ट्रॅक्ट मध्ये आकार किंवा फॉर्म नसतात. किंबहुना चित्रकाराच्या चित्रातले फॉर्म मिटत जावू लागले की तो पूर्ण अबोध होत जातो. पण रझा आकारांची साथ सोडत नाही. मात्र त्यांची रचना आणि रंगांच्या योजनेतून तो बोलत राहतो. ते आकारच त्याचे शब्द बनतात. 

पाठीमागे मूल किंचाळण्याचा आवाज.

व्हेर इज ही? अब्बास किधर है?’

वॉचमन आस्क्ड हिम टु रीमूव द कार 

आय टोल्ड दॅट बास्टर्ड, नॉट टु पार्क देअरss. आगे वन वे भी है

काळ्या गॉगलवाल्याचा आवाज आता चढला होता.
मूल आणखी जोरात रडत होत.
त्या ट्राऊजरवालीला कळत नव्हतं आता नेमकं कुणाला सांभाळाव.

मी पुन्हा पहिल्या चित्रापाशी उभा होतो.
सर्वत्र – त्या मधल्या काळ्या सूर्याची दाट छाया पसरली होती सर्वत्र, चित्रभर. विविध आकार. बहुतेक सगळे त्रिकोण. उलटसुलट रांगेत मांडलेले. गडद रंगाच्या अनेकविध छटा.

आ केम छे?’

ए डेकोरेटीव पीस.

काळ्या गॉगलवाल्याच्या हातात एक चौकोनी सिरॅमिक डिश होती. तिच्या मध्यभागी रझाच एक चित्र छापलेल – 'सूर्यनमस्कार'.

डिश टेबलावर सरकवली आणि तो पुढे वळला. एक उभट कपासारखे काही तरी हातात होते, त्यावर रझाचा एक छोटासा सूर्य.

ये क्या, कॉफी मग है क्या?’    

नो नो, कॅन्डल छे.

केटलो रुप्या

इक हजार

ओह टू कॉस्टली आss’

ती पांढरकेशी उदासवाणी हसली. आता तिला या छोट्या मोठ्या गोष्टीत इंट्रेस्ट राहिला नव्हता. तिच्या दोन खुर्च्या विकल्या गेल्या होत्या रग्गड भावात. 

बाहेर पडलो. जहागीरच्या दरात उभा होतो. गोलाकार पायर्‍यांवर उन्हं उतरली होती. त्यांना पकडत माझी नजर जेव्हा त्याच्याकडे पोहोचली तोही धुरकट, काळपट दिसत होता. रझाच्या चित्रातल्या सारखा.

आता पैसे आले की पहिल्यांदा चश्मा बदलायला हवा.

-    प्रदीप इंदुलकर


 


1 टिप्पणी: