रविवार, ७ जुलै, २०१३

ज्युली


ज्युली


                 आज दुपारी जेवताना सहज टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करीत होतो, मध्येच नदीरा आणि ओमप्रकाश दिसले. पाहतो तर ज्युली. नॉस्टेलजियाचा एक सुखद झटका. इ.स. १९७५ चे ते साल. तेव्हाच्या तरुणाईची बॉबीची धुंदी पुरती उतरलीही नव्हती तोच ज्युलीची पोस्टर्स झळकलेली. त्याकाळची हाताने रंगवलेली पण अत्यंत जीवंत वाटणारी ती पोस्टर्स म्हणजे चित्रसृष्टीची जान. फक्त पोस्टर पाहून पिक्चर चालणार की पडणार हे भाकीत काही रसिक महाभाग तेव्हा वर्तवत असत.
              
             राजेश खन्ना नावाचं एक गारुड बर्‍यापैकी अंमल गाजवत होत आणि अमिताभ नावाचं वादळ दारात येऊन ठेपल होत असा तो भारावलेला काळ. त्या काळात कोणतेही नाव नसलेली, ग्लॅमर नसलेली जोडी घेऊन बॉबी, ज्युली सारखे चित्रपट बनवणे आणि ते यशस्वी करणे हे केवढं मोठ आव्हान. पण तगड्या लेखक आणि पटकथाकारांच्या जादुई कुंचल्याच्या बळावर ते लीलया पेलणारे दिग्गज दिग्दर्शक ही त्या काळच्या चित्रांची खासियत होती.

          विक्रम आणि लक्ष्मी सारखी अगदीच अनोळखी नावे असलेला हा चित्रपट उत्तम पटकथेसाठी जरूर पहायला हवा. खरे तर तो नादिराच्या जबरदस्त अभिनयासाठीही पहायला हवा. पण नादीराबरोबरच मला भावला तो यातला ओमप्रकाशाचा मॉरिस. नादिरा मार्गारेट आणि ओमप्रकाश मॉरिस ह्या भूमिकेसाठीच जन्माला आल्यासारखे ते भूमिका जगले. पण नादिरा केवळ अप्रतिम. रुबी मायरचे एका छोट्या भूमिकेतले दर्शन अत्यंत लोभसवाणे आणि जेमतेम काही वाक्ये असलेली तेव्हाची बाल कलाकार आणि आताच्या हवाहवाई श्रीदेवीला ज्युलीची बहीण म्हणून पाहणे हा ही एक अधिकचा आनंद. ज्युलीवर मनापासून प्रेम करणार्‍या जलाल आगासाठी मात्र शेवटपर्यन्त मन चुकचुकत राहत. उत्तुंग, दिग्गज कलाकारांना तितक्याच तोडीचे लेखक दिग्दर्शक लाभले तर काय होऊ शकते ते म्हणजे – ज्युली.

                  लक्ष्मीचे मोहक दिसणे आणि तितकाच सहज सुंदर अभिनय, तिचे सेक्स अपील आणि पडदा पेटवणारा मोकळा प्रणय. हे सगळं सगळं जरी कथेला आवश्यक होत तरी दिग्दर्शक सेतुमाधवनमुळे आलेल्या दाक्षिणात्य बोल्ड शैलीचाही तो प्रभाव असावा किंवा बॉबीच्या यशातून निर्माण झालेली अपरिहार्यता असावी.

                   पटकथा इंदर राज आनंद, संवाद बलदेव राज आणि मल्याळी दिग्दर्शक सेतुमाधवन यांचा ज्युली हा उत्तर दक्षिण शैलीचा मिलाफ होता. खरेतर जात किंवा धर्माचे प्रेमाच्या आड येणे, त्यातून निर्माण होणारा संघर्ष, (इथे एक नवा आयाम आहे अँग्लो इंडियन) आणि मग गोड शेवट इतक साध सोप कथानक, पण पटकथेच वैशिष्ट्य असे की कुठेही कथानकाचा वेग मनावरची पकड सोडत नाही. प्रत्येकच प्रसंगात पुढे येऊ घातलेल्या संकटाचा गडदपणा व्यापून राहतो आणि तो अधिक गहिरा होतो तो बाप लेकीच्या नातेसंबंधातून. ओमप्रकाश आणि लक्ष्मी – मॉरिस आणि ज्युलीचे एका तरुण, वयात आलेल्या मुलीचे आपल्या बापावरचे प्रेम इंदर राजने ज्या नैसर्गिक रंगाने रंगवले आहे ते पाहत असताना मॉरिसचे जाणे साहजिक होऊन बसते आणि म्हणूनच मनाला चटका लावते. मॉरिसच्या जाण्याची बातमी रुबीआंटी ज्युलीला सांगते तो प्रसंग कलाकार आणि दिग्दर्शक सगळ्यांचीच कसोटी. पण रुबी सारख्या जेष्ठ अभिनेत्रीने या प्रसंगात जे काही केले आहे ते केवळ लाजवाब.
 
                   इ.स. १९७५ चा सुमार भारताला स्वातंत्र्य मिळून जेमतेम पंचवीस वर्षे होत आलेली. इंग्रज भारत सोडून गेले तरी त्यांचा संकर झालेला एक मोठा अँग्लो इंडियन समाज अस्तीत्वात होता जो भारताला आपला देश मानायला तयार नव्हता. धर्माबरोबरच या समाजाचे प्रेमाच्या आड येणे, खलनायक होणे ही पडद्यावर जरी नावीन्यपूर्ण कल्पना असली तरी ते समाजातले वास्तव होते. औध्योगीकरणाची सुरुवात होऊन नुकताच काही काळ लोटलेला. त्याचे प्रतीक म्हणून चित्रपटात रेल्वे येते. रेल्वेची ती प्रचंड धुड, ते वेडेवाकडे रूळ, अवाढव्य लोखंडी पूल ते ओलांडत ज्युलीचे पडद्यावर अवतरणे यातून ती सगळी प्रतीक तो काळ पडद्यावर उभा करतात. ही प्रतिकं सुद्धा चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावत असतात.  टेलिफोन, गाडी ही सगळी प्रतिष्ठेची लक्षणे मानण्याचा तो काळ. याच खोट्या प्रतिष्ठेपायी बायकोला खुश करण्यासाठी मॉरिस एक जुनी सेकंडहँड गाडी घेऊन येतो, मार्गारेटसाठी मात्र त्या गाडीचे इंपोर्टेड असणे महत्वाचे असते. मात्र जेव्हा ती खटारा गाडी रस्त्यात बिघडते तेव्हा सगळं कुटुंब ती ढकलत घरी घेऊन येते. मॉरिस याच खोट्या प्रतिष्ठेचे पडलेले डाग अंगभर वागवित घरात येतो तेव्हा चित्रपट कुठेतरी पुढच्या घटनांची सूचना देत असतो. पुढे बर्‍याच काळानंतर याच रस्त्यावरून मार्गारेट जेव्हा बिघडलेल्या ज्युलीला दुरुस्त करून घेऊन येते, तेव्हा या प्रसंगाची आठवण येते आणि त्या खोट्या प्रतिष्ठेचे ते डाग तिथेही दिसू लागतात.         

                   चित्रपट सगळ्यात जास्त घडतो तो मॉरिसच्या घरात. त्या घरात प्रेम आहे, आपुलकी आहे त्याच बरोबर पराकोटीची भांडणे आहेत. याच घरात ज्युली लहानाची मोठी झालीय. वयात आलीय आणि वयाबरोबर येणारी संकटेही घेऊन आलीय. कुटुंबाबरोबर एकत्र व्हिस्की पिण्याचा प्रसंग, त्यानंतर माय हार्ट इज बिटिंग. . गात सगळं कुटुंब फेर धरून नाचतानाचा प्रसंग असो किंवा बापाला जेवणाचा डबा देत निरोप देण्याचा प्रसंग किंवा ती गरोदर असल्याचे आईला सांगतानाचा प्रसंग, रंग वेगळे असले तरी एक गोष्ट सतत जाणवत राहते ते म्हणजे त्या घरात भरलेले येशूचे अस्तित्व. ते अस्तित्व मग रंग आणखी गडद करते. मुलाला मारण्या ऐवजी जन्म देवून ज्युलीची सुटका करण्याचा पर्याय त्या अस्तित्वाला धरून पटकथेत येण मग साहजिक ठरत आणि ते क्लायमॅक्सला पूरकही  ठरत.

                   इथे जस येशूच अस्तित्व आहे तसच तिथे उत्पल दत्त – भट्टाचार्‍यांच्या घरात कृष्णाच अस्तित्व आहे. तू शाम मेरा साचा नाम तेरा ... या भजनावर ज्युलीचे त्या घरात येणं. अत्यंत तोकड्या स्कर्ट मधून दिसणारे पाय आणि पाठमोरी ज्युली फॉलो करीत कॅमेरा सरकत जाणे आणि मागे तू शाम मेरा .. जवळ जवळ निम्म गाण हे असच फक्त ज्युलीवर चित्रित झालेल. लेखक दिग्दर्शक प्रत्येकच फ्रेम मधून, प्रसंगातून पुढे घडणार्‍या गोष्टींची झलक देत आहेत. तिचे तुळशी वृंदावनापाशी थबकणे आणि घरात गेल्यावर आत देवघरात उषा आणि उषाची आई - रिटा भादुरी आणि अचला सचदेव तू शाम मेरा .. गाताना त्यांच्या आणि ज्युलीच्या मध्ये दिसणारा पातळ झिरझिरीत पडदा खूप काही सांगून जातो. आज तुम्हारे डॅडी के जगह तुम्हारा ममी, हम बोटल खोलेगा म्हणणारी ज्युलीची आई त्या घरात आहे तशी मासिकपाळीत चार दिवस स्वयंपाकघरात न येणारी शशीची आई या घरात आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून लेखकाने त्यांची ही व्यक्तिमत्वे खुबीने उभी केली आहेत. कारण खरा संघर्ष याच संस्कृती आणि खोट्या प्रतिष्ठेचाच आहे.   

                   बलदेव राजचे सहज सोपे संवाद ही सिनेमाची खास जमेची बाजू. अगर हम व्हिस्की मे पानी डालेंगे तो लोग दूध मे कया डालेंगे?’ असले टाळीबाज संवाद असो किंवा नादीरा आणि रुबी मायर मधले भावनिक संवाद असोत त्याला एक नैसर्गिक प्रवाह आहे. पटकथाकाराने आणि संवाद लेखकाने सुद्धा मार्गारेट वर खास मेहनत घेतलेली स्पष्ट दिसते आणि नादिराने त्या मेहनतीचे सोन केलय. पण लक्षात राहते ते उत्पल दत्तचे शेवटचे वाक्य मार्गारेट, सफेद चमडी के साथ तुम्हारा खून भी सफेद हो गया है? लगता है तुम्हारी गाडी स्टेशन मे आ गयी. सिनेमातल शेवटचं वाक्य. संपूर्ण पडद्यावर पाठमोर्‍या नादिराचा क्लोजअप. काही क्षणांचा अवकाश, नादिराचा चेहर पडद्यावर दिसत नाहीय पण त्यावर का भाव असतील ते तिच्या दहबोलीतून जाणवताहेत . . . आणि क्षणात नादिराचे मागे फिरणे.  

                 ज्युलीच्या संगीताबद्धल काय सांगावे? राजेश रोशन, आनंद बक्षी, हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय, लता, आशा, उषा, किशोर आणि प्रीती सागर. संगीताची सगळी टीमच उत्कृष्ट होती. यह राते नई पुरानी.. हे लताने गायलेले सोलो असो किंवा सांचा नाम तेरा . . हे आशा उषाने किंवा त्या प्रणय दृश्यातले भूल गया सब कुछ . . हे लता किशोरचे द्वंद गीत असो. ज्युलीच्या संगीताने तेव्हाच्या तरुणाईची मने जिंकली. प्रीती सागराच्या  माय हार्ट इज बिटिंग. . ने कित्येक प्रेम प्रकरणे सुरू झाली असतील. पण शेवटी मनात गुंजत राहते ते किशोरचे - दिल कया करे . . किशोरचा तो संयत, मऊ मुलायम स्वर आणि त्यामागे राजेश रोशनने वापरलेला ऑर्केस्ट्रा खास करून ते एलेक्ट्रोनिक गिटार. तेव्हा राजेश रोशनचा अरेंजर कोण होता कोण जाणे पण ज्या कुणी ते अरेंज केलय . . हॅट्स ऑफ टु हिम.

                 ह्या गाण्याच्या बोलांविषयी काय बोलावे?

दिल कया करे जब किसीसे किसिको प्यार हो जाए
जाने कहा कब किसिको किसीसे प्यार हो जाए
ऊंची ऊंची दीवारोंसी इस दुनिया की रस्मे
ना कुछ तेरे बस मे ज्युली ना कुछ मेरे बस मे
दिल कया करे . . .

                 ह्या गाण्यावर त्याकाळी ज्यांनी हृदये जिकली, दिली-घेतली, हरवली ती पिढी आता पन्नाशीत असेल पण ह्या गाण्याचे बोल ज्यांनी लिहिले ते हरीन्द्रनाथ चट्टोपाध्याय हे बोल लिहिताना सत्याहत्तर वर्षांचे होते हे आता कुणाला सांगून खरे वाटणार नाही.


****

शनिवार, ६ जुलै, २०१३

रझाचा काळा सूर्य आणि गॉगल घातलेल्या माणसाची गोष्ट




रझाचा काळा सूर्य आणि गॉगल घातलेल्या माणसाची गोष्ट

रिदम हाऊसच्या चौकात गाड्या ओलांडत कसाबसा रस्ता क्रॉस केला आणि दोन चौकांच्या मधून पुढे निघालो. एका चौकाच्या भिंतीवर कुणा एका नगरसेवकाच्या सौजन्याची पाटी लागलेली, त्यावर पानाच्या पिचकारीचे काही शिंतोडे उडालेले. ती पाटी सुद्धा पार करीत मी जेव्हा जहागिरच्या दरात पोहोचलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते.   

जंहागिर मध्ये शिरल्या शिरल्या उजव्या बाजूची एक प्रशस्त गॅलरी.
रझाच प्रदर्शन लागलेल, विस्तार.
मी काचेचा दरवाजा ढकलून आत शिरतो.
समोरच्या कोपर्‍यात एक भला मोठा सोफा, कोर्नर पीस मांडलेला, बाजूला दोन ऊंची खुर्च्या, समोर ज्याला टी पॉय म्हणायला शरम वाटेल अस एक छोट टेबल आणि मागे एक संदूक आणि ह्या सगळ्यावर कुठे कुठे रेळलेले एक कुटुंब.  डोळ्यांवर काळा गॉगल, पायात जिन आणि पावलात पांढरे शूज घातलेला एक तरुण, स्कीन-टाइट ट्राऊजरवर शर्ट घातलेली एक तरुणी आणि दाढीच्या ठेवणीवरून मुस्लिम भासावा असा एक मध्यमवयीन फाटका माणूस आणि त्याच्या हातात एक गोंडस बाळ. हा दाढीवाला बहुदा त्यांचा ड्रायवर किंवा घरगडी असावा आणि लुकलुकत्या डोळ्यांनी इतस्तता सैरभर पाहणारा बहुदा त्यांचा कुलदीपक असावा. केसांचा रंग चेहर्‍यात उतरल्यागत पांढर्‍या फटफटीत दोन मध्यमवयीन बायका. असे पाच, साडे पाच जण मोठमोठ्यानं कुजबुजत होते. ते लुकलुकते डोळे सुद्धा मध्येच किंचाळत होते.

असेच काही ऊंची सोफे प्रत्येक कोपर्‍यात मांडलेले.
म्हटले व्वा, रझाचे एक्झिबिशन म्हणजे काही तास जाणार.
उभ राहून थकायला झालं तर अधून मधून बसता येईल. केवढी मोठ्ठी सोय केलेली ही. शेवटी रझा कुणी साधासुधा कलाकार नाही. त्याच्या दर्ज्याला साजेसच सगळं असणार ना.
  
मी पहिल्या चित्राकडे वळलो. डावीकडच्या भिंतीवरच पहिलच चित्र. सहा फुट लांब आणि चार फुट उंच - सर्वत्र’. बरोबर मध्यावर एका चौकटीत एक मोठ्ठ काळनिळं वर्तुळ. रझाचा तो काळा सूर्य. उरलेल्या चार कोपर्‍यात चार मूलभूत रंग लाल तांबडा, निळा आणि पिवळा तर चौथ्या चौकटीत या सगळ्या रंगांना तोलणारा करडा रंग. हे चौकटीचे कोपरे की सूर्यातून बाहेर पडणारी ऊर्जा किरणे आणि त्या किरणातले ते अदभूत रंग.


ट्रीsss ट्रीss आजूबाजूला कॅमेर्‍याचे आवाज. मधूनच उडणारे फ्लॅश.
एक जण अंगात आल्यासारखा फोटो काढत होता.


त्या मधल्या सूर्य चौकटी पलीकडे त्या मूलभूत रंगातून उतरलेले अनेक रंग त्रिकोण. बरेच काही गडद तर काही फिकट, एक तर पांढरा फटक, अजिबात रंगाचा कण ही न चिकटलेला.

पाठीमागे लुकलुकणारे डोळे मागे किंचाळत होते. त्यांना गप्प करण्याचा दाढीवाल्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता. काळा गॉगलवाला कुठे होता कुणास ठाऊक.

मी पुढच्या चित्राकडे वळलो.
कृती प्रकृती पुन्हा एक भव्य कॅनवस, मात्र उभा. पुन्हा मध्ये एक काळा सूर्याचा गोळा. रझाची ही काळ्या सूर्याची सगळी चित्र आखीव रेखीव एका भव्य चित्र चौकटीत अनेक चौकटी. प्रत्येक चौकटीत अर्थ वेगळा पण तरीही पूर्ण चित्राचा आशय एकच. आतल्या चौकटीतले सूर्य वेगळे, त्यांचे रंग वेगळे त्यातून निघणारे ऊर्जा किरण पुन्हा वेगळ्या रंगाचे दरवेळी सहा पण दरवेळी रंगसंगती वेगळी.

एक्सक्यूज मीss  . . तो अंगात संचारलेला माझ्या पुढे आला. कॅमेरा जणू त्याच्या पंज्याचा भाग बनला होता. आता दोन चित्र दिसत होती. एक भिंतीवर, एक कॅमेर्‍यावर. कृती-प्रकृती

पुढे उत्पत्ति’.  पुन्हा एक भव्य उभी चित्र चौकट. वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये विभागलेली. सगळ्यात खालच्या पातळीवर काहीच नाही. गडद भासेल असा काहीसा किरमिजी निळा रंग, त्यात एक वर्तुळ थोडसं गडद, मात्र नेहमी सारख मध्यात नाही, तर बाजूला काहीसं वाट चुकलेल, भरकटलेल दिशाहीन. काय असेल ते? एखादा आदिजीव.
वरच्या पातळीवर पुन्हा तोच गोळा आता मात्र खूपच फिकट झालेला. दिसेल न दिसेल असा.
या पातळीवर बरोबर मध्यात एक गडद काळी, ठसठशीत आकृती. एक त्रिकोण खाली टोक आणि वर बाजू असलेला. आणि त्याच्या वर चिकटलेला तोच तो गोळा, मेंदू सारखा. ही आकृती मात्र बरोबर मध्यात, तिने कशाचा तरी वेध घेतलेली.
रझा उत्पत्तीचा शोध घेतोय.
पुढच्याच वरच्या पातळीवर अशाच दोन आकृत्या. दोन्ही आकृत्या चित्र-मध्यात. त्यांनीही आपली पोजिशन घेतलेली. मात्र आता त्यातला गडदपणा नाहीसा झालेला. ओळख पटू लागलेली. रंग दिसू लागलेले. वरच्या पातळीत पुन्हा दोन आकृत्या. आता रंग अधिक ओळखीचे. नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष.

दर दोन तीन चित्रांच्या मध्ये गळ्यात आय कार्डाच्या रिबिनि अडकवून हात मागे बांधलेले वॉलंटियर उभे होते. मार्टिना नवरातीलोवाच्या मॅच मध्ये उभे असतात तसे. आणि लोक काढताहेत फोटो, चित्रांचे आणि चित्रांसमोर पोज घेवून उभे राहून. रझा पाहल्याचा पुरावा म्हणून. वॉलंटियर मात्र हात बांधून उभे.

एका वॉलंटियरला ओलांडून पुढे गेलो,
पुढे अवतरण एक अतिभव्य उभा कॅनवास. मध्यभागी, थोडा वर एक सूर्य खोल चौकटीतून बाहेर येत असल्यासारखा. चौकटीच्या दोन बाजूंवर उतरंड वेगवेगळ्या रंगांची, संपूर्ण चित्र पिवळ्या उजळ रंगाने माखलेल. सूर्य अजून बाहेर यायचाय तर ही ओजस्विता. मग पुढे काय. . ?

पुढे सत्य.
सत्यमेव जयते पुढचे चित्र.
सत्याचा रंग कुठला?
तो तर नितळ शुभ्र पांढराच असायला हवा. पण पांढर्‍याला ही किती पापुद्रे? किती पदर? 
सगळेच पांढरे. हळुवार पांढरे. काळ्याची छटाच नाही, करडा ही नाही, राखाडी ही नाही. सगळेच पांढरे पण प्रत्येक पांढरा वेगळा. ही रझाची रंगांवरची हुकमत, ती ही पांढर्‍या!


त्या दोघींपैकी एक पांढरकेशी लगबगीने माझ्या समोरून गेली, हात मागे बांधून उभा असलेला मार्टिनाच्या मॅच मधला मुलगा पुढे धावला. पुढच्याच कोपर्‍यातल्या एका भल्या मोठ्या सोफ्यावर एक मध्यमवयीन बाई आणि तिची छोटी पोर विसावली होती. ही दोघे तिच्या कानाजवळ काही पुटपुटली. ती बाई दचकून उठली. म्हणजे त्या खुर्च्या, ते सोफे बसायला ठेवलेले नव्हते तर.


पुढे एक छोटसच चित्र नादबिन्दु आकृतीबंद सत्यमेव जयतेचाच. फक्त रंग वेगळे. ही खास रझाची आकृतीशैली. मध्यभागी एक बिन्दु आणि त्यातून उठणारे तरंग. शांत शीतल जलाशयावर एकदा ठिपका आकाशातून पडावा आणि तो तरंगातून मोठा मोठा होत जावा. तो ठिपका, तो बिन्दु हा खास रझाचा शोध. चित्रकार म्हणून बर्‍यापैकी रूळल्यावर जेव्हा एक रितेपण आले. जसे प्रत्येकच कलाकाराच्या कलायुष्यात येते, तेव्हा रझाचा आत खोल कुठेतरी शोध सुरू झाला नाविण्याचा. या शोधात त्याला सापडलेला हा बिन्दु. कदाचित मध्यप्रदेशातल्या जंगलातल्या एकाद्या तलावात आभाळातून पडलेल्या एकाद्या बिन्दुचे उठलेले तरंग असावेत  ते.

सैयद हैदर रझा साहेबांचा जन्म मध्यप्रदेशातील बाबरीया गावातला. वडील फॉरेस्ट ऑफिसर, त्यामुळे लहानपण प्रत्यक्ष जंगलातच गेलेलं. जे जे मधून शिक्षण घेतल्या नंतर मुंबईत बर्‍यापैकी नाव कमावित असताना चित्रकलेच्या ओढीने रझा फ्रांसला गेला, वॅन गॉगच्या देशात. पुढे तिथेच रझाने जेनीशी लग्न केल. जेनीसुद्धा चित्रकार, शिल्पकार. दोघांनी प्रतिकूल परिस्थितीत घर बनवले, संसार थाटला एक स्टुडिओ उभा केला. मात्र या पाश्चिमात्य संस्कारातही रझाने आपले भारतीयपण कटाक्षाने जपले. मध्यप्रदेशातील ते जंगल, तो निसर्ग आणि त्यातलं अध्यात्म रझाच्या या अॅबस्ट्रॅक्ट शैलीत आजही उमटते. 

बिन्दु आणि तरंग. ह्या आकृतीबंधाला सुरुवात नाही शेवट नाही. हा बिन्दु पुढे रझाच्या चित्राचा अविभाज्य भाग झाला. कधी तो सूर्य झाला, करपलेला काळा, तर कधी पाण्याचा थेंब निळा. रंग बदलले आकृती तीच, पण भाव किती वेगळे. नादबिन्दु’, प्रेमबिन्दु’, निळभ’, सत्यमेव . . सगळ्या आकृत्या सारख्याच फक्त रंग वेगळे.


ये चल ग, आपल्या तर डोक्यावरुन जातय      एक तरुण, बहुदा नवरा असावा.


समोरच्या भिंतीवर एक भव्य आडव चित्र. आकृती तीच. मध्ये बिन्दु मग विलग होत जाणारी वर्तुळं, उठलेले तरंग.   आत्मरस – संपूर्ण चित्र फिकट, मातकट रंगात रंगलेल. सगळे तरंग -

. .

            जेनी गेली. दोन हजार दोनच्या एप्रिल मध्ये पॅरिस मधल्या एका हॉस्पिटलात कॅन्सरशी झुंजताना तिने डोळे मिटले आणि रझा एकटा झाला. जेनी सुद्धा थोर चित्रकार होती. रझा सारखा जगप्रसिद्ध चित्रकार आयुष्याचा भाग झालेला असताना तिने स्वत:च वेगळं अस्तित्व जपल होत आणि मुख्य म्हणजे रझाला साथ दिली होती. लग्न झाल तेव्हा जेनी स्वत:च एक शिल्प होती. अत्यंत रेखीव, कातीव   फ्रेंच चेहर्‍याची जेनी आणि तितकाच रुबाबदार रझा अस हे एकमेकांसाठीच जन्मलेल जोडप शेवटी अशा तर्‍हेने विलग झाले.

. .

                                                                                                 - उदासवाणे. मध्यप्रदेशातल्या त्या जंगलातील तळ्यात एकाद उनाड जनावर घुसून सगळं पाणी गढूळ केल्यासारखे रंग. रंगाची समर्पक योजना हे रझाच वैशिष्ट्य. पण या चित्रात मात्र रझाच्या मनाचेच तरंग दिसत होते, उदासवाणे. चार कोपर्‍यात चार करड्या रंगांच्या शुष्क छटा.

उजवीकडे वळलो आणि चकित झालो. मघापासुन जे शोधत होते ते अवचित पुढे आल. रझाचा बिन्दु. एकोणीसशे अठ्ठयाऐंशी सालातल हे चित्र, जेव्हा रझाला बिन्दु सापडला. जेमतेम तीन फुट बाय तीन फुटाच हे चित्र. अत्यंत आखीव रेखीव. त्या चित्राच्या शेजारी दोन खुर्च्यांचा सेट मांडलेला, मध्ये एक भली मोठी संदूक. जसे एकाद्या श्रीमंत भिंतीवरच ते टांगलय असा भास निर्माण व्हावा. चित्राच्या बरोबर मध्ये तो काळा बिन्दु आणि त्याच्या सभोवती गडद रंगाच्या लाटांसदृश्य जाड आडव्या समांतर रेषा. काळ्या फ्रेम मध्ये बंदिस्त, भान हरपवणारा गडद रंगविष्कार.

आ कलर थोडा डार्क छे
मी चमकलो. रझाच्या चित्रावर इतकी बोल्ड प्रतिक्रिया ?

चित्राच्या शेजारच्या खुर्चीवर तो काळा गॉगलवाला बसला होता. डावा पाय उजव्या पायावर ठेवलेला आणि तो पांढरा शू एका तालात हालत होता. समोर चॉकलेटच्या रंगाची तंग ट्राऊजर घातलेली त्याची बायको उभी.

याss, आय टू फील सो

इससे तो वो चेअर का कलर अच्छा है और कोमफरटेबल भी है.

ट्राऊजरवालीने ओठांचा चंबू केलेला. नवर्‍याबद्दल कोण अभिमान नजरेत दाटून आलेला.

हाऊ मच इज धिस?’

एका पांढरकेशीने एक कटलोग त्याच्या समोर धरला. रझाच्या चित्रांच्या मध्ये काही खुर्च्या आणि सोफ्याची पण चित्रे आणि समोर बारीक अक्षरात काही आकडे लिहिले होते.

ना ना, वही सेट फायनल कर दो  


त्या मधल्या काळ्या बिन्दुच्या आणि आडव्या गडद लाटांच्या बरोबरीने काही नाजुक पांढर्‍या रेषा. त्या बिन्दुचा अपेक्षित विस्तार दर्शविणार्‍या. त्या इतक्या नाजुक की चित्रकाराच्या कुंचल्यावरच्या नियंत्रणाला दाद द्यावी.

काळा गॉगलवाला आता उठून उभा राहिला होता. सगळ्या गॅलेरीवर त्याने एक नजर टाकली. काळ्या चष्म्यातून सुद्धा तिची मग्रुरी जाणवत होती. ह्या काय चित्रविचित्र रंगांच्या फ्रेम भिंतीवर टांगलेल्या आहेत? विकायला बिकायला ठेवल्या असतील तर घेऊन टाकाव्या दोन चार.

मी पुढे सरकतो. पुढे विस्तार’. ज्या नावाने हे प्रदर्शन भरले होते ते चित्र. काहीसं करड्या रंगात पण सूर्यबिन्दु मात्र तोच. काळा करपलेला रंग. एका मोठ्या चित्र चौकटीत काही छोट्या चौकटी. रझाने ही अॅबस्ट्रॅक्टची एक वेगळीच शैली पुढे आणली होती. सहसा अॅबस्ट्रॅक्ट मध्ये आकार किंवा फॉर्म नसतात. किंबहुना चित्रकाराच्या चित्रातले फॉर्म मिटत जावू लागले की तो पूर्ण अबोध होत जातो. पण रझा आकारांची साथ सोडत नाही. मात्र त्यांची रचना आणि रंगांच्या योजनेतून तो बोलत राहतो. ते आकारच त्याचे शब्द बनतात. 

पाठीमागे मूल किंचाळण्याचा आवाज.

व्हेर इज ही? अब्बास किधर है?’

वॉचमन आस्क्ड हिम टु रीमूव द कार 

आय टोल्ड दॅट बास्टर्ड, नॉट टु पार्क देअरss. आगे वन वे भी है

काळ्या गॉगलवाल्याचा आवाज आता चढला होता.
मूल आणखी जोरात रडत होत.
त्या ट्राऊजरवालीला कळत नव्हतं आता नेमकं कुणाला सांभाळाव.

मी पुन्हा पहिल्या चित्रापाशी उभा होतो.
सर्वत्र – त्या मधल्या काळ्या सूर्याची दाट छाया पसरली होती सर्वत्र, चित्रभर. विविध आकार. बहुतेक सगळे त्रिकोण. उलटसुलट रांगेत मांडलेले. गडद रंगाच्या अनेकविध छटा.

आ केम छे?’

ए डेकोरेटीव पीस.

काळ्या गॉगलवाल्याच्या हातात एक चौकोनी सिरॅमिक डिश होती. तिच्या मध्यभागी रझाच एक चित्र छापलेल – 'सूर्यनमस्कार'.

डिश टेबलावर सरकवली आणि तो पुढे वळला. एक उभट कपासारखे काही तरी हातात होते, त्यावर रझाचा एक छोटासा सूर्य.

ये क्या, कॉफी मग है क्या?’    

नो नो, कॅन्डल छे.

केटलो रुप्या

इक हजार

ओह टू कॉस्टली आss’

ती पांढरकेशी उदासवाणी हसली. आता तिला या छोट्या मोठ्या गोष्टीत इंट्रेस्ट राहिला नव्हता. तिच्या दोन खुर्च्या विकल्या गेल्या होत्या रग्गड भावात. 

बाहेर पडलो. जहागीरच्या दरात उभा होतो. गोलाकार पायर्‍यांवर उन्हं उतरली होती. त्यांना पकडत माझी नजर जेव्हा त्याच्याकडे पोहोचली तोही धुरकट, काळपट दिसत होता. रझाच्या चित्रातल्या सारखा.

आता पैसे आले की पहिल्यांदा चश्मा बदलायला हवा.

-    प्रदीप इंदुलकर


 


सोमवार, १ जुलै, २०१३

सोईच ज्ञान आणि गैरसोयीच अज्ञान


दि. १७ मे रोजी दै. लोकसततेतील गल्लत, गफलत, गहजब या सदरात राजीव सानेंचा एक लेख प्रसिद्ध झाला होता चेटकीण ठरवलेली अणुऊर्जा’.

या लेखात सानेंनी गैरसमजुतीतून काही विधाने केली होती ज्यांचा प्रतिवाद करणे गरजेचे होते. येलो ऑस्करसाठी हाय पावरच्या शो साठी ब्रझिलला जाण्याची गडबड असतानाही गैरप्रचाराचे अणु लेख शेवटच्या क्षणी लोकसत्तेला पाठवला, जो लोकसत्तेने दि. २३ मे रोजी प्रसिद्ध केला.

या लेखाला उत्तर म्हणून एनपीसीआयएलचे कार्यकारी संचालक श्री. शशिकांत धारणे यांचा गैरप्रचार की अज्ञान हा लेख दि. १४ जून रोजी लोकसत्तेत प्रसिद्ध झाला.

या लेखाचा प्रतिवाद मी तात्काळ एक लेख लिहून केला होता, परंतु तो लेख अद्याप प्रसिद्ध झालेला नाही, यापुढे तो प्रसिद्ध होईल याची आता आशा वाटत नाही म्हणून तो अप्रकाशित लेख इथे प्रसिद्ध करीत आहे.


सोईच ज्ञान आणि गैरसोयीच अज्ञान


   
श्री. राजीव साने हे विविध विषयांवर लिहिणारे एक व्यासंगी पत्रकार आहेत, त्यामुळे दि. १७ मेच्या लोकसत्तेत राजीव सानेंनी अणुउर्जेचं समर्थन करताना जी बेधडक विधाने केली त्याकडे एकवेळ दुर्लक्ष करता येईल, परंतु त्याचे समर्थन करण्यासाठी माझ्या दि. २२ मे रोजीच्या अंकातील ‘गैरप्रचाराचे अणु’ या लेखावर छोटीशी टिप्पणी लिहिताना एन.पी.सी.आय.एल.चे कार्यकारी संचालक या वरिष्ठ पदावर काम करीत असलेल्या शशिकांत धारणे यांनी जी विधाने केली आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजीव सानेंनी सर्वसामान्य वाचकांप्रमाणे (बहुदा) एन.पी.सी.आय.एल.च्या पुस्तिकावाचून ‘बॅकग्राऊंड रेडिएशन’ला नैसर्गिक किरणोत्सार म्हणणे समजण्यासारखे आहे, परंतु धारणेसाहेब सुद्धा साळसूदपणे याचे समर्थन करतात हे पाहून खेद वाटला. आज बॅकग्राऊंड रेडिएशन म्हणून जे काही मोजले जाते त्यात नैसर्गिक किरणोत्साराबरोबरच मानवनिर्मित कृत्रिम किरणोत्सारही मोजला जातो. विजेचा शोध लागल्यानंतर मानवाने विविध प्रकारची कृत्रिम किरणे, लहरी निर्माण केल्या. अनेक प्रकारची किरणोत्सरी वैद्यकीय उपकरणे निर्माण केली या सगळ्याचे मोजमाप बॅकग्राऊंड रेडिएशन मध्ये होत असते आणि या बॅकग्राऊंड रेडिएशनमध्ये मानवनिर्मित किरणोत्साराचा वाटा जवळजवळ निम्मा असतो, ज्याची यादी खुद्द धारणेंनीच दिलेली आहे. आजच्या मानवाला सर्वसाधारणपणे जो किरणोत्सार मिळतो त्यातला साधारण १२ टक्के किरणोत्सार हा वैद्यकीय उपकरणातून मिळत असतो. याखेरीज मानवनिर्मित औद्योगिक किरणोत्सार आहे. परंतु या सगळ्याला आपले अणु शास्त्रज्ञ हळूच नैसर्गिक किरणोत्सार म्हणून मोकळे होतात.

आता या मानवनिर्मित किरणोत्साराखेरीज जो ‘आजचा’ नैसर्गिक किरणोत्सार उरतो तो तरी खरा नैसर्गिक किरणोत्सार आहे का? आजवर या पृथ्वीवर झालेले दोन अणुस्फोट आणि गेल्या पन्नास साठ वर्षात शेकड्यांनी अणु चाचण्या करून जी विविध नवनवी किरणोत्सारी मूलद्रव्ये या शास्त्रज्ञांनी वातावरणात सोडली, आज जगभरातील सव्वाचारशे अणु वीज केंद्रातून होणार्‍या गळतीतून, आण्विक प्रदूषणातून आणि अणु कचर्‍यातून जी किरणोत्सारी मूलद्रव्ये वातावरणात मिसळली गेली त्यांनाही आता आपण ‘नैसर्गिक’ म्हणायचे काय? मानवनिर्मित किरणोत्साराबरोबरच या अमानवी किरणोत्सारालाही जर ‘नैसर्गिक’ म्हणायचे तर मुळात अणु विज्ञानात ‘बॅकग्राऊंड रेडिएशन’ अशी संज्ञा करणार्‍याला ‘नॅचरल रेडिएशन’ म्हणता आले असते. पण कुणाचे लक्ष नाही असे पाहून आपले शास्त्रज्ञ हळूच बॅकग्राऊंड रेडिएशनला नैसर्गिक किरणोत्सार, रेप्रोसेसिंगला रीसायकलिंग आणि अणु उर्जेला अक्षय ऊर्जाही म्हणू लागले आहेत.
या सगळ्याचा विचार करता 'आयोनायिझग किरणोत्सार फक्त अणुभट्टीत निर्माण होत असतो. नैसर्गिक किरणोत्सारात ही क्षमता नसते'. हे माझे वाक्य धारणेसाहेबांना चुकीचे वाटणे साहजिकच आहे. आता जर खर्‍या नैसर्गिक किरणोत्साराचे मोजमाप करायचे तर आपल्याला त्या काळात जावे लागेल जेव्हा विजेचा शोध लागला नव्हता, जेव्हा वातावरणाच्या कवचाला तडे गेले नव्हते, लोक विमानात बसून उडत नव्हते, पृथ्वीच्या पोटात असलेले यूरेनीयम पृष्ठभागावर आले नव्हते किंबहुना यूरेनीयम म्हणजे काय हेच माहीत नव्हते त्या काळाचा विचार केला तर तेव्हा निसर्गात मुख्यत्वे दोनच किरणोत्सर्गी मूलद्रव्ये होती यूरेनीयम आणि थोरीयम आणि त्यांची काही डॉटर प्रॉडक्टस जसे रेडियम इ. आणि त्यापासून निघणारा रेडॉन नावाचा किरणोत्सर्गी वायु ज्यांच्या किरणोत्सारामध्ये मध्ये आयोनायजिंग करण्याची क्षमता होती, हे मी माझ्या लेखातही नाकारलेले नाही किंबहुना पुढच्याच वाक्यात मी एका चमत्कारिक नैसर्गिक अणु भट्टीचे उदाहरण दिले आहे. या खेरीज बीटा कण आणि गामा किरणांचे उत्सर्जन करणारे काही कण यांचा सौर वर्षाव होत होता जो वातावरणाचे अखंड कवच मोठ्या प्रमाणात अडवीत होता. मात्र प्रचंड व्याप्ती आणि मात्रा असलेल्या ‘सूर्यप्रकाश’ या नैसर्गिक नॉनआयोनिजिंग किरणोत्साराशी तुलना करता तेव्हाचा नैसर्गिक आयोनायजिंग किरणोत्सार नगण्यच मानावा लागेल. तरीही जगात काही ठिकाणी जसे ब्रझिल किंवा भारतातील केरळ, जादुगुडा येथे (तेथे असलेल्या यूरेनीयम थोरीयमच्या साठ्यांमुळे) स्थानिक पातळीवरील नैसर्गिक बॅकग्राऊंड आयोनायजिंग रेडिएशन जास्त होते.

आता नैसर्गिक, अनैसर्गिक त्यात पुन्हा आयोनायजिंग आणि नॉनआयोनायजिंग किरणोत्सार या सगळ्याने आपण भंडावून गेला असाल, तर इतकेच लक्षात घ्या की किरणोत्सार हा निसर्गात असतोच. किरणोत्साराखेरीज जीवसृष्टीची कल्पना करता येणार नाही. किरणोत्सार हा ऊर्जा वाहक आहे जी जीवसृष्टीस आवश्यक आहे. ती ऊर्जा धारणेंनी सांगितल्याप्रमाणे ग्रे या एककात मोजली जाते, मात्र या किरणोत्सारात त्याच्या ऊर्जावाहकतेनुसार कमी धोकादायक आणि अतिधोकादायक असा भेद होतो. किरणोत्सारामध्ये आयोनायजिंग करण्याची क्षमता असणे हे त्याचे धोकादायक असण्याचे एक लक्षण आहे आणि हे लक्षण त्या किरणांच्या गुणधर्मावर अवलंबून आहे. आता सजीवसृष्टीस यातून नेमका धोका काय आहे? काही ठिकाणी बॅकग्राऊंड रेडिएशन जास्त, तेही आयोनायजिंग स्वरूपाचे असून सुद्धा तिथे वर्षानुवर्षे माणसे कशी जगली? यूरेनीयम, पोटॅशियम आणि कार्बनसारखी किरणोत्सारी मूलद्रव्ये आपल्या शरीरात असूनही आपल्याला काहीच कसे होत नाही? आणि असे सगळं आलबेल असताना काही मूर्ख माणसे अणु प्रकल्पांना मात्र विरोध का करतात? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील.

याच साध उत्तर असं आहे की, निसर्गात आयोनायजिंग किरणोत्सार करू शकणारे मुख्यत्वे तीन घटक असतात. अल्फा, बीटा कण आणि गामा किरणे. यापैकी जो किरणोत्सार मोजला जातो तो मुख्यत्वे गामा किरणांचा असतो, कारण पृथ्वीच्या पोटात असलेल्या किरणोत्सारी मूलद्रव्यातील अल्फा कण शोधणे ही कठीण असते तर ते मोजणे तर दूरच, कारण अल्फा कण पातळ कागदाचा अडथळा सुद्धा पार करू शकत नाहीत, समझा अडथळा नसला तरी ते चार सेंटीमीटर हवेचा स्तंभसुद्धा पार करत नाहीत त्यामुळे ते मापन यंत्राच्या संवेदकापर्यन्त पोहचतही नाहीत. त्यामुळे त्याच्या बरोबरीने होणार्‍या इतर किरणोत्साराशी त्याची सांगड घालून त्याचे अंदाजे मोजमाप केले जाते. त्यामुळे जो मोजला जातो आणि जो आयोनायजिंग स्वरूपाचा असतो तो मुख्यत्वे गामा किरणोत्सार असतो. हा किरणोत्सार धारणे म्हणतात त्या प्रमाणे सर्वत्र अगदी तुमच्या घरादारातून पार होत तुमच्या पर्यन्त पोहोचत असतो. ही किरणे अगदी तुमच्या शरीरतूनही पार होतात. ती पार होत असताना आयोनायजिंग ही घडवत असतात आणि गेली कोट्यावधी वर्षे हा किरणोत्सार सुरू आहे आणि पुढेही सुरू राहणारच आहे. खरी गोम यातच आहे. हा किरणोत्सार आयोनायजेशन घडवतो म्हणजे त्या किरणांमधील ऊर्जा अणूमधील एखादा इलेक्ट्रॉन त्याच्या कक्षेतून बाहेर फेकते. मानवावर किंवा एकंदरीत सजीव सृष्टीवर हा किरणोत्सार या उर्जेमुळे जो प्रभाव पाडतो, आणि आयोनायजेशन घडवतो तो त्या साजिवातील अतिसूक्ष्म पेशींमध्ये घडवित असतो. त्यामुळे पेशी मरत असतात. या मेलेल्या पेशींची संख्या पुन्हा भरून काढण्याची एक यंत्रणा आपल्या शरीरात असते आणि ती यंत्रणा सजीवांच्या उत्क्रांती बरोबरच विकसित झालेली असल्याने त्यात या किरणोत्साराने मरणार्‍या पेशींच्या संखेचाही समावेश असतो. कारण हा सर्वसाधारण नैसर्गिक किरणोत्सार गेली कोट्यावधी वर्षे निसर्गात आहे आणि सजीवांच्या उत्क्रांतीत त्याच मोठं योगदान आहे. मात्र मानवाला यूरेनीयमचा शोध लागल्यापासून आजवर अणु विज्ञान आणि तंत्रज्ञानात जो विकास झाला त्याने भूगर्भात खोलवर खडकांमध्ये दडलेले यूरेनीयम वर काढले गेले. त्याचे अणु फोडून त्यातून अनेक वेगवेगळी नवीन उच्च किरणोत्सारी मूलद्रव्ये तयार केली गेली, नवे किरणोत्सारी वायु निर्माण झाले. हे सगळं फक्त अणुभट्टीतच निर्माण होऊ शकतं. मुळ निसर्गात ते नव्हते. अणुस्फोट, अणु चाचण्या, अणु अपघात, अणु कचरा यातून ही नवी किरणोत्सारी मूलद्रव्ये निसर्गात उघड्यावर आली. त्यामुळे ती आता थेट तुमच्या माझ्या शरीरात जाण्याची भीती निर्माण झाली, किंबहुना ती एव्हाना गेली ही असतील. अणु प्रकल्पाशेजारी राहणार्‍या लोकांना सगळ्यात जास्त धोका या आण्विक प्रदूषणाचा आहे. कारण बॅकग्राऊंड किरणोत्सार म्हणून जो मोजला जातो तो किरणोत्सार मुख्यत्वे बाहेरून तुमच्या शरीरावर प्रभाव टाकत असतो, परंतु हे आण्विक प्रदूषण ज्यात अल्फा कणांचा मोठा वाटा असतो आणि ह्या अल्फा कणांची आयोनाजिंग क्षमता तीव्र समजल्या जाणार्‍या गामा किरणांपेक्षा वीस पट अधिक असते, असे कण प्रक्षेपित करणारी प्लूटोनियम सारखी नवनवी मूलद्रव्ये जेव्हा थेट मानवाच्या शरीरात जातात तेव्हा हे अतितीव्र किरणोत्सारी कण तुमच्या माझ्या शरीरातील संवेदनशील अवयवांच्या थेट संपर्कात येतात आणि तेथे आपला प्रभाव टाकतात. ही मूलद्रव्ये, हा किरणोत्सार या जीवसृष्टीला नवा आहे, अनोळखी आहे. आपले शरीर ही नवी किरणोत्सारी मूलद्रव्ये, हा किरणोत्सार ओळखू शकत नाही. मात्र हा किरणोत्सार स्थानिक पातळीवर प्रचंड परिणाम करू शकतो. या परिणामाने मेलेल्या पेशी पुन्हा निर्माण करण्याची क्षमता प्रत्येकाच्या शरीरात असेलच असे नाही. यातून मग वेगवेगळे विकार निर्माण होतात.

नैसर्गिक किरणोत्सार म्हणून मानवनिर्मित किरणोत्सारही मोजायचा आणि त्याचे मोठमोठे आकडे समोर मांडायचे आणि त्या तुलनेत आमचा किरणोत्सार किती कमी? असे भासवायचे, हे म्हणजे आपली रेषा छोटी करण्यासाठी बाजूला एक मोठी रेषा काढण्यासारखे आहे.

आता अपघातांबाबत. कोणताही अपघात झाल्यावर एक प्रश्न सहज विचारला जातो, “किती माणसं मेली?” हा अत्यंत भावनिक प्रश्न आहे. आपण इथे काही शास्त्रीय चर्चा करतोय. छोट्या मोठ्या औध्योगिक अपघातांचे परिमाण अणु अपघातला लागू शकत नाहीत. त्यात फुकुशिमासारखा अपघात हा अपघात नव्हे उत्पाद आहे, डिझास्टर आहे. किती मनुष्यबळ वाया गेले हा निकष त्याला कसा लावणार? फुकुशिमा चेर्नोबिल तर दूर पण भोपाळचा अपघात आपल्या समोर झाला त्याचे मनुष्यबळ कसे काढणार? अणु तंत्रज्ञानात अणु भट्टी वितळणे ही अणु अपघाताची सर्वात वरची पायरी आहे त्यात माणसे मेली की नाही हा निकषच नाही. “व्यवस्थापनाने आणि जपानी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करून अनर्थ टाळला.” या वाक्यातच धारणेंनी योग्य उत्तर दिले आहे. जर तसे केले नसते तर काय ‘अनर्थ’ घडला असता याची पूर्ण कल्पना धारणेना आहे.

आता राहिला मुद्दा डॉ. अनिल काकोडकरांवरील आरोपांचा. डॉ. काकोडकर हे भारताचे श्रेष्ठ अणु शास्त्रज्ञ आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाचा आणि अधिकाराचा मला आदरच आहे. परंतु त्यांना प्रतिप्रश्न करायचाच नाही, त्यांच्यावर टीका करायचीच नाही, ते जे म्हणतील ते ब्रह्मवाक्य समजायचे ही अंधश्रद्धा झाली. मी डॉ. काकोडकरांबाबत जे विधान केले त्याचा संदर्भ राजीव सानेंच्या मुळ लेखातूनच घेतलेला आहे. ज्या पॅसिव्ह सिस्टमचा उल्लेख धारणे करतात ती पॅसिव्ह सिस्टम जगभर किती ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली, जगभर इतरत्र तर सोडाच पण ज्या प्रकल्पाच प्रमुखपद धारणे भूषवितात त्या जैतापूर प्रकल्पात तिचा अंतर्भाव आहे का आणि तिला किती खर्च येणार आहे याची माहिती त्यांनी द्यायला हवी होती. यापुढील युगात अणु प्रकल्पांच अर्थकारण हा कळीचा मुद्दा ठरणार आहे किंबहुना अणुपर्वाची ती मृत्यूघंटाच आहे, कारण सौर ऊर्जा झपाट्याने स्वस्त होतेय. तेव्हा आता एन.पी.सी.आय.एल.ने आपल्या पुस्तिकामध्ये बदल करावा किंवा करू नये परंतु किमान इथून पुढे बॅकग्राऊंड रेडिएशनला नैसर्गिक किरणोत्सार तरी म्हणू नये.
_____________